shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(९१)..! शमी Prosopis cineraria


पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करत धनिष्ठा या नक्षत्राचा आराध्यवृक्ष शमी हा आहे. महाराष्ट्रात सौंदंड असेही म्हणतात तर पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरातमध्ये खेजडी असे म्हणतात.

दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांबरोबर शमीची पाने घेऊन शमी शमते पापम् असे म्हणतात. याच वृक्षाच्या ढोलीत पांडवांनी अज्ञातवासात जाताना आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. राजस्थानमध्ये बिशनोई समाजाने ही वृक्ष जाती प्राणपणाला लावून जगवली. महाराष्ट्राच्या कोरड्या व मध्यम पर्जन्यमानाच्या क्षेत्रात हा सदाहरित काटेरी वृक्ष काळ्या, वालुकामय, शाडवट अशा सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो .

या झाडाची साल राखाडी खडबडीत व चवीला गोड असते. दुष्काळात याचे पीठ करून खातात. या झाडाची पाने खैर बाभूळ यासारखी लहान, थंडीत गळून पडणारी व पुन्हा येणारी अशी असतात. फुले सुगंधी पाच ते तेरा सेंटीमीटर लांबीची पांढरट, पिवळी मार्च-मे महिन्यात येतात. 

दहा ते तेवीस सेंटिमीटर लांब ज्यामध्ये दहा ते पंधरा काळ्या चकाकणाऱ्या बिया असणाऱ्या शेंगा एप्रिल-मे महिन्यात येतात व जून ऑगस्ट पर्यंत पिकतात. 
शमी वृक्षाच्या मुळावरील गाठीत नत्र साठवण्याची क्षमता असल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास हा वृक्ष उपयुक्त आहे. याचा पाला जनावरे खातात. मे-जूनमध्ये डिंक येतो हा खाण्यासाठी  उपयुक्त असतो. विशेष म्हणजे या झाडाची पाने दिवसा मिटलेली असतात त्यामुळे शेताच्या बांधावर लावले तरी पिकाला  सूर्यप्रकाश मिळतो. या झाडाचे लाकूड अत्यंत टणक, कठीण, टिकाऊ असते या झाडाची मुळे शंभर ते दीडशे फूट खोल पर्यंत जाऊन पाण्याचा शोध घेतात. शमीचा डिंक पित्तशामक आहे. रक्तपित्त आमवातावर उपयोगी आहे. शमीच्या सालीचा लेप विंचूदंशावर लावतात. शमीच्या फुलांचे चूर्ण साखरेबरोबर दिल्यास गर्भधारणा होऊन गर्भपात होण्याचा धोका टळतो. 

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close