राहाता । प्रतिनिधी (संजय महाजन):- आदिवासी म्हणजे देशातील प्रथम चे रहिवाशी. भारतीय संस्कृती कोश खंड १ व ६ पान नं.४२९ व ५२९ नुसार कोळी एक आदिवासी जमात असून प्रोटोऑस्ट्रलाईड लोकांचे भिल, कोळी व शबर हे वंशज होते, असे मानववंश शास्त्रज्ञांचे प्राचीन कालीन संशोधन आहे.
आदिवासी कोळी जमातीच्या कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार या मूळ शाखा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या आदिवासींच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला आहे. हे गट भिन्न नावाने ओळखले जात असले तरी त्यांची भाषा, पेहराव, संस्कृती, रहन सहन, चालीरीती, रूढी, परंपरा धार्मिक आणि सांस्कृतिक विधि सारखेच आहेत. आदिवासी अडाणी व अज्ञानी असल्यामुळे या आदिवासींची निश्चित झालेली एक संस्कृती आहे. आदिवासींचे सण-उत्सव यात संस्कृतीचा भाग आहे.
या आदिवासींचा गावबांधणी हा अत्यंत महत्त्वाचा पारंपारिक सण आहे. या सणामागे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. आदिवासी हा उत्सव प्रिय असल्यामुळे जुन्या आणि जाणत्या पिढीकडून उगवत्या पिढीला माहिती देतात आणि हे चक्र पुढे चालू राहते. गावबांधणी करणे म्हणजे गावाची बांधणी करून गावाचे/पाड्याचे रक्षण करणे होय. दसऱ्याला हे आदिवासी डफ वाजून गाव बांधणीच्या सण साजरा करतात. गावातले सर्व आदिवासी एकत्र येतात. भेटीगाठी घेतात. रोजच्या साचेबद्ध आयुष्यातून बाहेर पडून आनंद साजरा करण्याचा काळ म्हणजे गाव बांधणीचा उत्सव. या आदिवासी जमातीत दसऱ्याच्या दिवशी ढोर (रेडा/ हेला) मारण्याची पद्धत रूढ होती. तलवारीचा एका वाराने रेडा मेला पाहिजे. असा त्यांचा अलिखित नियम होता. ढोर मारल्यावर त्याचे रक्त एका ताम्हणात घेऊन वाळूमिश्रित करून ती वाळू गावा/ पाड्या भोवती फेकत जेणेकरून पांढरी शांत राहील व कोणालाही भूतबाधा होणार नाही अशी आदिवासींची समजूत होती. ढोर (हेला/ रेडा) मारण्याचा मान फक्त शूरवीर आदिवासी कोळी जमातीला होता.
ढोर मारणे, गुरढोर पाळणे या व्यवसायावरून आदिवासी कोळी जमातीला कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी असे नाव पडले. खानदेशात अहिराणी भाषेत रेड्याला हेला असे म्हणतात. म्हणून कोळी ढोर यांना कोळी हेलमार असे म्हणतात. दसऱ्याला हेला मारत असल्यामुळे हेलान मरण दसराले चुकत नाही. ही म्हण आजही खानदेशात रूढ आहे.
या आदिवासींनी स्वयंशिस्तीने पशुहत्या बंद केली आहे. त्याऐवजी भोर कोये /कोहळा कापून सण साजरा करतात. सर्व आदिवासींनी संस्कृतीचे वारसदार व्हावे आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून व्हिडिओ काढून या सणाची माहिती आणि महत्त्व सर्वान पर्यंत पोहोचवावे. प्रत्येक गावात/ पाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आव्हान आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, आदिवासी विकास संघाचे आंदोलन प्रमुख व वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे नेते मा. आप्पासाहेब नामदेव येळवे, सल्लागार एडवोकेट गणेश सोनवणे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका अध्यक्ष प्रा. संदीप तवर, कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी, कमलेश मगरे, हेमंत सोनवणे, अशोक काकुळदे इ. केले आहे.

