shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे महानगरपालिकेतील शिक्षण-सेवकांची दिवाळी यंदा रेल्वेस्टेशनवर.!

पुणे:- अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांचा कार्यालयीन आदेश जा.क्र. ६२९८ दि.२०/१०/२०२१ नुसार महानगरपालिकेतील १६ शिक्षण-सेवकांना रेल्वे प्रवासात 'युनिव्हर्सल पास' देणेकामी शिवाजीनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे कोविड ड्युटी देण्यात आली आहे. सध्या शिक्षकांचे शाळेमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापन प्रक्रिया चालू आहे.

विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरू असून परीक्षेनंतर शिक्षकांना मूल्यमापनाचेही काम करावे लागणार आहे. अशातच शिक्षण-सेवकांना कोविड ड्युटी दिल्याने *विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान* तर होणार आहेचं याशिवाय शिक्षण-सेवकांची दिवाळीही रेल्वेस्टेशनवर जाणार आहे.

पुणे महापालिकेसह राज्यातील शिक्षण-सेवकांना *तीन वर्षांसाठी* फक्त *मासिक सहा हजार* इतके तुटपुंजे मानधन दिले जाते, याशिवाय त्यांना वर्षभराच्या *फक्त 12 किरकोळ रजा* असतात, 12 रजांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त रजा घेतल्यास संबंधित शिक्षण-सेवकाचे वेतन कपात केले जाते व सदर शिक्षकाचा 'शिक्षण-सेवक' कालावधीही पुढे ढकलला जातो, त्यामुळे शिक्षण-सेवकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

कोविड ड्युटीबाबत शिक्षण-सेवकांना पुणे महानगरपालिकेकडून कोणत्याही पद्धतीच्या सेवा-सुविधा दिल्या जात नसल्याने शिक्षण-सेवकांचा हवा तसा वापर करणे महापालिकेने सुरू केले आहे अशी भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

शिक्षण-सेवकांनी आपले गाऱ्हाने लेखी स्वरूपात प्रशासकीय अधिकारी श्रीमती मीनाक्षी राऊत यांचेकडे मांडले परंतु त्यांनी शिक्षण-सेवकांच्या प्रश्नांची दखल न घेता शिक्षण-सेवकांना ऑर्डर रद्द करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला. सद्यस्थितीला शिक्षण-सेवक आर्थिक अडचणीत असून अनेक शिक्षण-सेवक कर्जबाजारी देखील झाले आहेत. फक्त सहा हजार पगारात पुण्यासारख्या ठिकाणी सहकुटुंब राहणे शक्य नसल्याने, जवळपास सर्वच शिक्षण-सेवक आपल्या कुटुंबियांपासून दूर राहतात. त्यामुळे शिक्षण-सेवक बांधवांची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थितीचा महानगरपालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे शिक्षण-सेवकांचे म्हणणे आहे.


निवडक प्रतिक्रिया

1) "राज्यभरात विविध आस्थापनांनी शिक्षण-सेवकांची कोरोना ड्युटी रद्द केली असतांना पुणे महापालिकेतील शिक्षण-सेवकांना वेगळा न्याय का? पुण्यातील पूर्ण पगारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या देऊन फक्त सहा हजार पगार मिळणाऱ्या शिक्षण-सेवकांना राबविणे पुणे महापालिकेने थांबविले पाहिजे".
श्री.संतोष आनंदराव मगर.
अध्यक्ष: डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशन.

2) "पुणे महानगरपालिकेचे शिक्षण-सेवकांना दिलेली ड्युटी तूर्तास रद्द करून ती दिवाळीनंतर देण्यात यावी, जेणेकरून बाहेरगावी राहणाऱ्या शिक्षण-सेवकांना किमान चार दिवस आपल्या कुटुंबियांसोबत राहता येईल. शिक्षण-सेवकांनी प्रशासकीय अधिकारी श्रीमती मीनाक्षी राऊत मॅडम व अतिरिक्त आयुक्त श्री.रवींद्र बिनवडे साहेब यांना निवेदन दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या मागणीचा संवेदनशीलपणे विचार करावा अशी आमची विनंती आहे."
श्री.वैभव साहेबराव फटांगरे.
(पदवीधर शिक्षण-सेवक, पुणे मनपा)

3) "पुणे महानगरपालिकेने शिक्षण-सेवकांचे मानसिक खच्चीकरण थांबवावे, सहा हजार पगार घेणाऱ्या शिक्षण-सेवकांना आणखी किती दिवस वेठबिगार पद्धतीने राबविणार.? यापूर्वी शिक्षण-सेवकांनी साडेतीन महीने कोविड ड्युटी केली आहे. यावेळी महापालिकेने शिक्षण-सेवकांच्या बदल्यात पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था करावी."
श्री.राम सिताराम जाधव
(सरचिटणीस, डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशन)


4) "सणासुदीच्या काळात आपल्या गावापासून शेकडो किलोमीटर दूर राहणाऱ्या शिक्षण-सेवकांची रेल्वे स्टेशनवरील कोवड ड्युटी रद्द करून पुणे महापालिकेने माणुसकीचे दर्शन घडवावे".
श्री.संदीप कांबळे.
उपाध्यक्ष: डीटीएड,बीएड स्टुडंट्स असोसिएशन.


close