आयपीएल २०२१ च्या बावन्नाव्या सामन्यात स्पर्धेतील आव्हान संपलेल्या सनरायझर्स हैद्राबादचा सामना प्लेऑफमध्ये स्थान मिळविलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या दरम्यान झाला. वास्तविक या सामन्याचा निकाल हैद्राबादच्या स्पर्धेतील स्थानावर कोणताही परिणाम करणार नसला तरी आरसीबीचा विजय त्यांना गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकात आणून ठेवण्यात मदत करणार होता. आपल्याला माहिती आहेच की, गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांना अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दोन संधी उपलब्ध करून देत असते.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून हैद्राबादला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. हैद्राबादने २० षटकात ७ बाद १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी पूर्ण वीस षटके खेळून सहा बाद १३७ धावाच काढू शकली. परिणामतः आरसीबीला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे ३६० डिग्री अँगल मध्ये कुठेही चेंडू टोलावण्याची क्षमता असलेला जगविख्यात आफ्रिकन टायगर एबी डिव्हीलर्स मैदानात असताना शेवटच्या षटकात १३ धावा त्याला फटकावता येऊ नये ही अतिशय नामुष्कीजन्य घटना घडली. त्यामुळे आरसीबीला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर जाण्याची संधी गमवावी लागली त्याचबरोबर प्ले ऑफचे सामने खेळण्यास जाण्यापूर्वी सकारात्मक मानसिकता घेऊन जाण्याचीही ! या सामन्यातील विजयाने हैद्राबादच्या स्पर्धेतील स्थानावर काही एक फरक पडला नाही परंतु आरसीबीची प्रतिमा मात्र मलिन करून गेला.
हैद्राबादचा खेळ या संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या लौकीकाच्या विपरीत झाल्याने त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे स्पर्धेत सहभागी इतर संघांसमोर त्यांची इमेज काहीशी खराब झाली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ त्यांना कमी लेखणे साहजिकच होते, आणि या सामन्या दरम्यान काहीसे तसेच झाले. हैद्राबादच्या १४१ धावा आरसीबीजवळ असलेल्या फलंदाजांच्या ताफ्यासाठी किरकोळ होत्या. शिवाय या स्पर्धेत हैद्राबादच्या गोलंदाजांनीही विशेष अशी कोणतीच करामत न केल्यामुळे आरसीबीने त्यांना हलक्यात घेतले.
विजयासाठीच्या १४२ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सलामीवीर कर्णधार कोहली ५, डॅनियल ख्रिश्चन १ व यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत १२ हे स्वस्तात परतले. मात्र त्यानंतर दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल ४१ व जोरदार फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेल २५ चेंडूत ४०, यांच्यातील चौथ्या बळीसाठीच्या ५४ धावांच्या भागीदारीने सामना आरसीबीच्या नियंत्रणात आला होता. मात्र त्याच वेळी एक नसलेली धाव घेण्याचा या जोडीचा अघोरी प्रयत्न सन रायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनच्या अफलातून फेकीने हाणून पाडला व सामन्यावरची आरसीबीची पकड ढिली झाली. तरीही एबी डिव्हीलर्स मैदानात असल्यामुळे त्यांच्यासाठी काहीही अशक्य नव्हते. मात्र त्याच वेळेस हैद्राबादच्या गोलंदाजांनी धारदार व नियंत्रीत गोलंदाजी करून आरसीबीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.
शेवटचे षटक भारताचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार टाकत होता मात्र एबीडी समोर असल्याने भुवनेश्वर आपल्या कुवतीला किती न्याय देतो याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु चौथ्या चेंडूवर एक षटकार सोडल्यास भुवनेश्वरने डिव्हीलर्सला हात खोलण्याची संधीच दिली नाही. सनरायझर्स हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, सिध्दार्थ कौल, राशिदखान व उमरान मलिकने प्रत्येकी एक फलंदाज बाद करून आरसीबीला चांगलाच धडा शिकविला.
मागील सामन्यात सन रायझर्सकडून आपले आयपीएल पदार्पण करणाऱ्या जम्मू काश्मिरच्या उमरान मलिकने ताशी दिडशे कि मी.पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकून सर्वांनाच प्रभावित केले तर त्याने एका षटकात ४ चेंडू १५० च्या वर वेगाने फेकले. १५३ कि मी वेगाने त्याने फेकलेला चेंडू या सत्रातील सर्वात वेगवान चेंडू ठरला असून सध्या उज्वल भवितव्य असलेल्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात ही तोफ लवकरच सामील होऊ शकते.
आपणास आठवत असेलच मागे याच लेखमालेत मी लिहीले होते की, या स्पर्धेतील आव्हान संपलेल्या हैद्राबादचा एक एक विजय इतर संघाच्या नियोजनावर पाणी फेरू शकतो. अगदी तसाच कारनामा सनरायझर्सने आरसीबीसोबत केला असून आठ ऑक्टोबरला स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात हैद्राबादवर मोठा विजय मिळवून प्ले ऑफ फेरी गाठण्याच्या मुंबई इंडियन्सच्या स्वप्नांना हैद्राबाद तडा तर देणार नाही ना ?
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

