-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी:- राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या मेगा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे साळेगाव जवळ दुचाकींचा अपघात होऊन एकजण जखमी झाला आहे. घडले असून या प्रकरणी मेगा विरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायं ७:१५ वा. च्या दरम्यान केज-कळंब या खामगाव ते सांगोला महामार्ग क्र. ५४८-सी वर साळेगाव येथे विष्णू तेलंग यांच्या शेता जवळ दुचाकींचा क्र (एम एच-१२/ डी एफ-१२९६) अपघात झाला आहे. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकलेले नाही. या रस्त्यावर रस्ता दुरुस्तीचे अनेक टप्प्यात काम सुरू आहे. मात्र रस्ता बांधणी व दुरुस्तीचे काम करणारी कंपनी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी सुरक्षित व विना अपघात वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी कामाच्या ठिकाणी रस्त्यावर स्पष्ट दिसणारे सूचना फलक, बॅरिकेट्स, रात्री अंधारात चमकणारे रेडियम, विद्युत दिवे किंवा सुरक्षेची उपाय योजना केलेली नाही. यामुळे एकाच आठवड्यात दुचाकी, हलकी व अवजड वाहानांचे अपघात झाले आहेत.
या मुळे महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांना रिपाइंच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनात अपघातामुळे झालेली जिवीतहानी व आर्थिक नुकसान प्रकरणी मेगा कंपनी व केबल गाडणारे गुत्तेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइंचे रविंद्र जोगदंड आणि गौतम बचुटे यांनी केली आहे.

