८५ हजार रु. चा गैरव्यवहार उघडा पडताच ६० हजारात खाजगीत प्रकरण मिटले..!!
------------------------------------------------------
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यात एका किराणा दुकानदाराने तीन वर्षां पासून एकाचे एटीएम कार्ड वापरून त्या आधारे पैसे काढून एटीएम कार्डचा गैरवापर केला. त्याने वेगवेगळ्या एटीएम केंद्रातून बचत खात्यातील सुमारे ८५ हजार रु. काढून गैरव्यवहार केला. हा प्रकार खातेदाराच्या निदर्शनास आल्या नंतर पोलिसांत तक्रार दाखल होण्या पूर्वीच आपसात तडजोड करून ६० हजार रु देण्याचे कबूल करून प्रकरण मिटवून घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील अरुण जाधव यांनी तीन वर्षा पासून साळेगाव येथील किराणा दुकानदार यांच्याकडे त्यांचे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड स्वाईप मशीनद्वारे पैसे काढण्यासाठी दिले होते. त्या कार्डचा पासवर्ड देखील सांगितला होता. त्याचा गैरवापर करून त्या दुकानदाराने एसीबीआय बँकेच्या जनधन बचत खात्यातून (खाते नं. ३८५४ ९ ००५६३९) मधून ८५ हजार रु. कमी झाल्याची माहिती होताच अरुण जाधव यांनी बँकेतून बँक खात्याच्या स्टेटमेंट आधारे सविस्तर नोंदीची माहिती घेतली. त्या वरून ते पैसे एटीएम आधारे काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या नंतर मग त्यांनी त्या किराणा दुकानदारांची भेट घेऊ याचा जाब विचारला. अरुण जाधव यांनी फसवणुकीची हे सायबर पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती दिली.
नंतर अरुण जाधव हे केजला पोलीस ठाण्यात गेले असल्याची माहिती मिळताच कार्यवाही टाळण्यासाठी त्या दुकानदाराने मध्यस्थांच्या मदतीने अरुण जाधव यांना ६० हजार रु. देऊन प्रकरण आपसात मिटवून घेण्याचे ठरले. त्या नुसार नगदी ५० हजार रु. व १० हजार रु नंतर काही दिवसांनी देण्याचे ठरवले होते. या आपसातील तडजोडी बाबत त्यांनी १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर सरकारी नोटरी समक्ष नोटरी करून करारनामा लिहून घेतला आहे. त्यावर करारनामा लिहून देणार व घेणार यांच्यासह नोटरी आणि दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र अशा प्रकारे एटीएम कार्डचा गैरवापर करून फसल्याचे प्रकार नवे नसून अनेक वेळा आशा घटना घडत असतात. त्या टाळण्यासाठी एटीएम कार्ड कुणालाही देऊ नये किंवा त्याचा पासवर्ड कुणाला सांगू नये. तसेच एटीएम कार्ड हरवल्यास टोलफ्री नंबरला कळवून एटीएम कार्ड बंद करता येते. म्हणजे त्याचा गैरवापर होणार नाही.

