shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हार्दिक पांड्याच्या तंदुस्तीचा प्रश्न कधी सुटेल ?




               

हार्दिक पांड्या हा २८ वर्षीय गुजरात राज्यातील भारताकडून खेळणारा तथाकथीत अष्टपैलू खेळाडू. काहीसी आक्रमक फलंदाजी व बऱ्यापैकी मध्यमगती गोलंदाजी हे त्याचे क्रिकेटमधील भांडवल.  दि ग्रेट कपिलदेव नंतर भारताला फलंदाजी करू शकणारा वेगवान गोलंदाज न मिळाल्यामुळे पांड्याचा रूपात तो अष्टपैलू खेळाडू शोधला जात होता. त्याच आशेपोटी मागील पाच वर्षात त्याला त्याच्या लायकीपेक्षाही भरमसाठ संधी दिली गेली. मात्र त्याच्या कडून सातत्यपूर्ण कामगिरी कधीच झाली नाही. उलट त्याच्या तंदुरूस्तीने वेगळाच प्रश्न बीसीसीआय समोर उभा राहीला. तो संघात हवाच परंतु गोलंदाजी करणार नाही. अशी इमोशनल ब्लॅक मेलिंग त्याच्याकडून सुरू आहे. भारताकडे फलंदाजी करू शकणारे गोलंदाज नाहीत असेही नाही. परंतु हार्दिकवर बीसीसीआयने फार मोठी गुंतवणुक केली असल्याने ते त्याला सोडून देण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशात टि२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर येऊन उभी ठाकल्याने बीसीसीआयला निर्णय घ्यावाच लागणार आहे.

                  

हार्दिकला संघातून एका एक काढून टाकणे या क्षणी चुकीचे ठरू शकते म्हणून बीसीसीआयनेही सावध पण आश्वासक पावले उचलल्याचे दिसते. भारतीय संघात शार्दूल ठाकूर हा चांगल्या पैकी फलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या या अष्टपैलू खेळाचा नजराना त्याने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये कसोटी सामने जिंकून देऊन पेश केला आहे. तर वनडे व टि२० तही शार्दूलने त्याच्यातील अष्टपैलूत्वाची चुणूक दाखविली असल्याने तो वर्ल्ड कपच्या संघात राखीव खेळाडू म्हणून सामील आहे.

                   

ठाकूर प्रमाणेच फलंदाजी बरोबरच वेगवान गोलंदाजीत आपले कौशल्य सिध्द करून दाखविणारा दिपक चहारही भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात राखीव खेळाडू म्हणून समाविष्ठ असून श्रीलंकेत त्याने त्याच्यातील चांगला फलंदाज सर्वांना दाखवून दिलाच, शिवाय टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका सामन्यात सर्वाधिक सहा बळी घेण्याचा विश्वविक्रमही त्याच्याच नावावर आहे.

                     

                    

त्याचबरोबर या आयपीएल सत्रात भारतात खेळलेल्या पहिल्या पर्वात अतिशय खराब कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचे भाग्य बदलविणारा सलामीचा फलंदाज व चांगल्या पैकी मध्यमगती गोलंदाजी करणारा नवोदित व्यंकटेश अय्यर सध्या बीसीसीआयच्या रडारवर असून हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून त्याला बीसीसीआय वर्ल्ड कपच्या भारतीय संघात ठेवण्याच्या विचारात असून कदाचित हा लेख आपल्या हाती येईपर्यंत ती गोड बातमी आपल्या कानी आलीही असेल.

                 

चार्टर्ड अकौंटट असलेल्या व्यंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये पदार्पण करतानाच नुसातच धडाकेबाज खेळ केला नाही तर आपल्या उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीने केकेआरच्या गोलंदाजीतही जाण आणली. त्यामुळे केकेआरच्या इतर खेळाडूंमध्येही वेगळळीच उर्जा संचारली. केकेआरने उत्कृष्ठ धावगतीच्या आधारे गतविजेत्या मुंबईला मागे सारत प्ले ऑफ मध्ये स्थान मिळविले. यामध्ये व्यंकटेशने ८ सामन्यात ३७.८५ ची सरासरी व १२३.२५ च्या स्ट्राईक रेटने २६५ धावा जमविल्या तसेच गोलंदाजीतही उपयुक्त कामगिरी करताना ८.५३ च्या इकॉनॉमी रेटने ३ फलंदाज बाद केले. 

              

तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची पूर्ण मदार असलेल्या हार्दिक पांड्याने गतविजेत्या मुंबईला सर्वच क्षेत्रात निराश केले. १२ सामन्यात १२७ धावा ही त्याची ढेपाळलेली आकडेवारीच बरेच काही बोलून जाते. शिवाय शारिरीक दृष्टया पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याने एकही षटक गोलंदाजी केली नाही. त्यामुळे मुंबईचे पुर्ण सांघिक संतुलन बिघडले. त्याचा फटका मुंबईला इतका बसला की गतविजेता मुंबई संघ साखळीतच गारद झाला.

                  

वास्तविक हार्दिक शारिरीक दृष्टया फिट नाही. त्याचे मानसिक संतुलनही व्यवस्थित दिसत नाही. तरीही त्याला वर्ल्ड कप सारख्या महत्वाच्या स्पर्धेत अवाजवी महत्व देणं संघासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे त्याला सध्या तरी मुख्य संघातून बाजूला ठेवून व्यंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर व दिपक  चहार यापैकी कुणालाही मुख्य संघात संधी दिली तर भारताचा फायदाच होईल.

                  

हार्दिकने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर ती फार प्रभावी ही दिसत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी वेळ वाया घालविणे संघा हिताचे अजिबात दिसत नाही.

                       

हार्दिक पांड्या मागील पाच वर्षात केवळ ११ कसोट्या खेळला. त्यामध्ये ५३२ धावा व १७ बळी अशी माफक कामगिरी त्याने केली आहे. तर ६३ वनडेत १२८६ धावा व ५७ बळी ही निराशजनक आकडेवारी त्याने नोंदविली आहे. शिवाय ४९ टि २० सामन्यात केवळ ४८४ धावा व ४२ बळी हि आकडेवारी त्याच्या अष्टपैलूत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते.

                       

खरं तर हार्दिक पांड्या क्रिकेटपेक्षा इतर गोष्टीतही वादग्रस्त राहिल्याने त्या क्रिकेटमधील कामगिरीवरही बराच परिणाम झाला आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या रियॅलिटी शोमध्ये महिलांविषयी अभद्र टिपण्णी करणे किंवा भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेताल वक्तव्य करणं त्याच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे होते. त्याचबरोबर त्याचे इतरही वागणे त्याचा लौकीक वाढविणारे नक्कीच नाही.

                      

त्यामुळे बीसीसीआयनेही त्याचे अतिरिक्त लाड न पुरवता त्यापेक्षाही सरस खेळ करणाऱ्या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना संधी देण्यातच भारतीय संघाचं हित असेल.

लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close