युएईमध्ये सुरू असलेली सातवी टि ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धा सुरु झाल्यानंतर सर्वांना भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता होती. त्या सामन्यात भारत, पाकिस्तान विरूद्ध विश्वचषकात अपराजित राहण्याची परंपरा अखंडीत राखण्यात असमर्थ ठरला. पाकिस्ताने भारताविरूध्द विश्वचषकात यापूर्वी झालेल्या सामन्यांचा इतिहास बाजूला ठेवत आपले मनोधैर्य कमी होऊ न देता विजयश्री खेचून आणली. कट्टर दुश्मन भारतावरील अकल्पीत विजयाने पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला.
भारतावरील विजयानंतर पाकिस्तानचा सामना त्यांचा नवा दुश्मन न्यूझिलंडशी होता. आपल्याला माहिती आहेच की, मागच्या महिन्यात न्यूझिलंडचा संघ पाकिस्तानमध्ये तीन वनडे व पाच टि२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला असता पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी न्यूझिलंड संघाला त्या दौऱ्यात " धोका " होण्याची माहिती असल्याचा संदेश मिळाला. त्यामुळे न्यूझिलंडने पाकविरूध्द कुठलाही सामना न खेळता पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. न्यूझिलंडने दौरा रद्द करू नये या साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी ) पासून सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न झाले. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी न्यूझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांच्याशी संपर्क केला. तरीही न्यूझिलंड आपल्या निर्णयावर ठाम राहीले व पाकिस्तानमधून न्यूझिलंडचा संघ निघून गेला.
मागील दहा वर्षांपासून परदेशी संघ सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानमध्ये जात नव्हते. त्यातच न्यूझिलंड संघ अठरा वर्षानंतर पाकमध्ये जात असल्याने तेथे उत्साहाचे वातावरण होते. पाकच्या जबाबदार सुत्रांच्या हवाल्यानुसार न्यूझिलंड संघाला राष्ट्रपती व पंतप्रधानांना देतात ती झेड प्लस सुरक्षा दिली होती. तरी न्यूझिलंड पाक मध्ये खेळायला तयार झाले नाही. यामुळे पाकिस्तानमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात होता. पाकिस्तानने यासाठी भरपूर खर्चही केला होता व या दौऱ्यातून पाकला करोडो रुपयांचा आर्थिक लाभ होणार होता. तो फायदा बुडाल्यामुळे समस्त पाकिस्तानचे पित्त खवळले.
न्यूझिलंड दौऱ्यानंतर इंग्लंड संघ पाकिस्तान विरूध्द दोन टि ट्वेंटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता. परंतु त्यांनीही सुरक्षेच्या व खेळाडूंच्या फिटनेसच्य कारणामुळे पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.
यावर पाकिस्तानने त्यांच्या खास सवयीनुसार न्यूझिलंडने पाकिस्तान मधून निघून जाण्यासाठी व इंग्लंडने दौऱ्यावर न येण्याचा निर्णय घेण्यामागे भारतच असल्याचा राग आळवला. त्यानंतर पाकिस्तानने थोडयाच दिवसांनी होऊ घातलेल्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, न्यूझिलंड व इंग्लंड यांना हरविण्याचा चंग बांधला. सुदैवाने भारत व न्यूझिलंड हे दोन्ही संघ त्यांच्याच गटात असल्याने त्यांचा लगेच बदला घेण्याचा कट शिजला. इतकेच नाही तर त्यांनी मागील कित्येक स्पर्धात भारताविरूद्ध खेळताना होणाऱ्या चुकांवर अभ्यास करून भारताला चारीमुंडया चित केले.
न्यूझिलंड व इंग्लंडने केवळ भारताच्या इशाऱ्यावर पाकचे दौरे रद्द केल्याची मोठी खुन्नस धरून पाकिस्तानने या विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघातील सर्व मतभेद, हेवेदावे, वादविवाद बाजूला ठेवून झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचा ठाम निश्चय केला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी प्रथम कट्टर वैरी भारताला एकजूट करून हरविले व मंगळवारी शारजाच्या मैदानावर न्यूझिलंडचाही पाच गडी राखून आरामात फडशा पाडला व आपला राग काहीसा शांत केला आहे.
भारत व न्यूझिलंड या ब गटातील प्रतिस्पर्ध्यांना लिलया लोळविल्या नंतर अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबीया या तुलनेने हलक्या संघांना पाकिस्तान हरवून गटात अव्वल क्रमांक मिळविण्याची शक्यता असून त्यांचे पुढचे टार्गेट इंग्लंडलाही हरवून विश्वकरंडक जिंकण्याचे आहे.
वाढलेला राग व आत्मविश्वास कदाचित पाकिस्तानचे उद्दीष्ट सफलही करील. पण यानंतर भारत, इंग्लंड व न्यूझिलंड यांच्याशी संबंध सुरळीत होतील अशी पाकिस्तानची धारणा असेल तर तसे होण्याची सुतराम शक्यता दिसत नसून उलट आंतरराष्ट्रीय सरावर पाकिस्तानला आणखी मोठया विरोधाचा सामना करावा लागणार आहे, हे पाकिस्तानला कदाचित ठाऊक नसावे.
पाकिस्तान हि विश्वचषक स्पर्धा जिंकेलही पण त्यांचे पुढील भविष्य अंधःकारमय असेल एवढे मात्र निश्चित !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

