प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
दिवाळीचा सण अवघ्या आठ ते दहा दिवसांवर आला असल्याने खरेदीची धामधूम सुरू झाली आहे . दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाचे विविध पदार्थ तयार केले जातात . तर गेल्या काही दिवसांपासून रेडिमेड फराळालाही पसंती दिली जात आहे ; परंतु यावेळी फराळाच्या या पदार्थांचे दर गतवर्षीपेक्षा किलोमागे शंभर रुपयांनी वाढल्याने दिवाळी बजेट यावेळी वाढवावे लागणार आहे .
नवरात्रोत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत . दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील , पणत्या कपडे , फराळाचे साहित्य अशा अनेक विविध वस्तूंची आवक झाली आहे . यात फराळ म्हणजे अविभाज्य घटक . हे पदार्थ बनवण्यासाठी महिलांचा आठवडा जातो ., दिवाळीसाठी हरभरा डाळ , तांदूळ , साखर , रवा , मैदा ड्रायफूट , तेल इत्यादीची मोठ्या प्रमाणात खरेदी होते .
मात्र , सध्या फराळाचे सर्व साहित्याचे भाव वाढल्याने रेडिमेड फराळाचे दरही वाढवण्यात आले आहेत . चकली गतवर्षी चारशे रुपये किलो दराने मिळत होती . ती आता पाचशे रुपयांवर गेली आहे . तसेच करंजी ३८० ते ४२० पूर्वी आता ४५० ते ५०० , बेसन लाडू ४२० रुपये किलो होते , आता ५०० रुपये किलो आहेत . सध्या फराळाच्या ऑर्डर बुकिंगचे काम सुरू असल्याने हळूहळू प्रतिसाद वाढेल असे व्यावसायिकांनी सांगितले . तसेच आता पारंपरिक पदार्थांबरोबरच मिठाई , चॉकलेट , ड्रायफ्रुट अशा प्रकारातही मागणी होत आहे . याबरोबरच तेलाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांना कमी पसंती मिळत आहे . इंधनाच्या दरवाढीचा परिणामही बाजारपेठेवर झाल्याचे अतुल बाहेती यांनी सांगितले .
तेल व डाळीचे भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच पदार्थचे भाव वाढले आहेत . यामध्ये मोतीचूर १८० रुपये किलो , बालूशाही १५० रुपये किलो , शंकरपाळे १५० रुपये किलो , पोहा चिवडा १८० रुपये किलो , मलाई बर्फी ३०० रुपये किलो , खारी बुंदी १८० रुपये किलो असे भाव असल्याचे व्यापारी यांनी सांगितले . तर भाजीपाल्यासह जिरे मोहरीचेही भाव वाढल्याने आर्थिक अडचणी असल्याचे गृहिणी राजेश्री प्रकाश मुंडे यांनी सांगितले ...

