*इंदापूर महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हर्षवर्धन पाटील यांनी केले स्वागत*
-विद्यार्थ्यांचे औक्षण व रोपटे देऊन तसेच नवरात्री निमित्त नऊ दुर्गांचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने स्वागत
इंदापूर प्रतिनिधी-
तब्बल दीड वर्षाच्या कालखंडानंतर महाविद्यालय सुरू होत असून आज येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालययामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले तसेच युवतींचे औक्षण करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे गेली दीड वर्ष महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती मात्र नुकतेच आजपासून वरिष्ठ महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इंदापूर महाविद्यालयामध्ये येऊन त्यांचे स्वागत केले, त्यांच्याशी संवाद केला.
छोटेखानी झालेल्या कार्यक्रमामध्ये कोरोनामध्ये जीव गमावलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच कोरोना योद्ध्यांचे यावेळी कौतुक देखील करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' तब्बल दीड वर्षानंतर शिक्षणाचे द्वार आपल्यासाठी खुले झाल्याने सुरुवातीला सर्वांचे स्वागत. गेली दीड वर्ष कोविडमुळे शासनाच्या नियमाप्रमाणे महाविद्यालय बंद होती. सरकारने महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दीड वर्षाचा शिक्षणाचा गॅप पडला आहे. शिक्षणासंदर्भात फिजिकल कम्युनिकेशन उपलब्ध होऊ शकले नाही. हा सर्व गॅप आपल्याला आता भरून काढावा लागणार आहे. गुणात्मक शिक्षणासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. नवीन पिढी घडवण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे. सर्वांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. वाचन, हस्ताक्षर चांगले पाहिजे तसेच सुसंवाद सादरीकरणासाठी आपण प्रयत्नशील असावे. अष्टावधानी असले पाहिजे. कोणताही एक खेळ आपण दररोज खेळायला पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छतेची कास धरली पाहिजे.खूप शिका मोठे व्हा, कुटुंबाचे तालुक्याचे समाजाचा नावलौकिक वाढवा.'
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा अनुभव आपण घेतला असून आज महाविद्यालय सुरू होत असून नियमित तासिका सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आभार क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी मानले.
विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष वर्गातले शिक्षण उपलब्ध होणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवला.

