आयपीएलच्या इतिहासात सन २०२० मध्ये प्रथमच चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले तेंव्हा धोनीच्या संघाला अनेकांनी " म्हाताऱ्यांची टोळी " म्हणून हिणवले होते. परंतु त्याच अनुभवी धोनीने याच संघात एक वेगळी जान ओतली आणि यंदाच्या सत्रात काय चमत्कार घडला आपण उघडया डोळ्यांनी अनुभवला आहे.
सन २०१०, ११, १८ या तीन सत्रात विजेतेपद, सन २००८, १२, १३, १५, १९ या पाच सत्रात उपविजेतेपद अशी नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने दि ग्रेट एम एस डीच्या नेतृत्वाखाली चौथ्या विजेतेपद मिळविण्यासाठीच चौदाव्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. रविवारी झालेल्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी व दोन चेंडू राखून पराभव केला. धोनीच्या संघाची हि कामगिरी वरकरणी अतिशय सोपी दिसत असली तरी त्यामागे फार मोठी तपश्चर्या आहे.
कोरोना संक्रमामुळे त्रस्त झालेल्या संघांपैकी एक असलेल्या सीएसकेने यंदाच्या सत्राच्या पहिल्या पर्वात भारतात सातपैकी पाच व दुसऱ्या पर्वात युएईत ७ पैकी चार सामने जिंकले. एकूण १४ सामन्यात १८ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले. क्वॉलिफायर सामन्यापूर्वी झालेल्या सलग तीन सामन्यात पराभव झाल्यामुळे चेन्नईला काही महाविचारवंत हलक्यात घेऊ लागले होते. परंतु प्रत्यक्ष सामन्यात दस्तुरखुद्द म्हातारा म्हणून हिणवले गेलेल्या धोनीने तरूण तुर्कांना आस्मान दाखविले तेंव्हा प्रत्येकाने आनंदाने टाळ्याच वाजविल्या.
मागच्या वर्षाच्या अपयश व चुकांवर योग्य ते काम करत धोनी व कंपनीने संघात सरसकट बदल न करता लिलावाच्या टेबलवर योग्य नियोजन करत मोईन अली, कृष्णप्पा गौतम व रॉबिन उथप्पाला आपल्याकडे खेचले. पहिल्या टप्प्यात मोईनने आपल्या अष्टपैलू खेळाने विजय मिळवून दिले. तर दुसऱ्या पर्वात ऋतूराज गायकवाड, फाफ ड्यू फ्लेसिस, रॉबिन उथप्पा व रविंद्र जडेजाने सर्वांगसुंदर खेळत करत चेन्नईला ईप्सित ध्येयापर्यंत पोहोचविले.
गोलंदाजात शार्दूल ठाकूर, दिपक चहार, जोश हेजलवूडने चांगली कामगिरी केली. तसेच संघ प्रबंधनाने धोनीसह, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर, सुरेश रैना, अंबाती रायडू रविंद्र जडेजा व ड्यू फ्लेसिस यांचे कोरोमंडल कायम ठेवले.
आपल्या सहकारी खेळाडूंना वाईट काळात पाठबळ देण्यात धोनी नेहमी अग्रेसर असतो. हेच बघा ना, मागच्या सत्रात सुरुवातीच्या काही सामन्यात ऋतूराज गायकवाड अपयशी ठरत असताना धोनीने त्याची पाठराखण करत सातत्याने खेळविले. आज त्याचे फलित सर्वांसमोर आहे. तोच ऋतुराज चेन्नईच्या यशाचा निव्वळ शिल्पकारच बनला नसून सर्वाधिक धावा बनविणाऱ्यांसाठी असलेली मानाची ऑरेंज कॅप तो पटकविण्याची शक्यता आहे. सध्या ऋतूराजच्या ६०३ धावा असून त्याच्या पुढे असलेल्या केएल राहुलच्या ६२६ धावा आहेत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राहुलचे सामने संपले असून चेन्नई अंतिम सामना खेळणार असून त्यामध्ये ऋतूराज शंभर टक्के खेळणार आहे.
खेळाडूंचा फॉर्म व खेळण्याचे तंत्र ह्या दोन अशा बाबी आहेत की ज्यामध्ये वेळोवळी बदल होऊ शकतो. परंतु आत्मविश्वास ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ती खेळाडूंना सतत चांगले करण्याची प्रेरणा देत असते मागच्या सत्राचंच बघा ना अतिशय वाईट प्रदर्शनानंतरही संघ प्रबंधनाने आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास तुटू दिला नाही. त्यांनी कर्णधार धोनी व संघावर पुर्ण विश्वास दाखविला. तेच त्यांच्या आजच्या यशाचे खरे गमक आहे.
मागच्या वर्षी चेन्नईच्या अपयशाचे मुळ कारण म्हणजे फलंदाजांचे अपयश होते. सलामीवीर शेन वॉटसन व सॅम करन अपयशी ठरले. धोनीही लौकीकाप्रमाणे खेळला नाही. ड्यू फ्लेसिस ४४९ व रायडू ३५९ हेच काय बऱ्यापैकी खेळले होते तर स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ऋतूराजने तीन अर्धशतके ठोकली होती.
मात्र या सत्रात सर्वच फलंदाज जबाबदारीने खेळले. ऋतूराज ६०३, फाफ ५४७, मोईन ३२०, रायडू २५७ यांनी सरस खेळ केला तर अंतिम टप्यात जडेजा व धोनीही चमकले. एकीकडे फलंदाज आपले कर्तव्य बजावत असताना चेन्नईचे गोलंदाजही मागे नव्हते. दिपक चहार व शार्दूल ठाकूरने प्रतिस्पर्धी फलंदाजांना सातत्याने सतावलं. दिपकने पॉवर प्लेमध्ये बळी टिपले तर शार्दूलने आपला गोल्डन आर्मचा वापर करत संघाला हवे तेंव्हा बळी मिळवून दिले. तर जोश हेजलवूड व रविंद्र जडेजाने बळी मिळवितानाच विरोधी फलंदाजांना जखडून ठेवण्याचे कामही केले त्याचबरोबर ड्वेन ब्राव्होने डेथ ओव्हर्समध्ये अचूक टप्पा, सटीक यॉर्कर व स्लोअर वनचा प्रभावी उपयोग केला. त्यामुळे चेन्नईचा अंतिम फेरीपर्यंतचा मार्ग सुकर झाला.
चेन्नईच्या यशात व जडणघडणीत सर्वात महत्वाची भूमिका जर कोणी वठवली असेल तर ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ! भले धोनी आज ४० वर्षांचा असेल. वाढत्या वयोमानानुसार पूर्वीसारखा जोर त्याच्या फलंदाजीत राहीला नसेल, पण यष्टीरक्षक म्हणून तो आजही अतिशय चपळ आहे, परंतु त्याही पेक्षा एक कर्णधार म्हणून तो चाणाक्ष आहे. कोणती चाल कधी रचायची, कोणाला कोणता सापळा टाकायचा याचा अचूक निर्णय घेण्यात धोनी इतका धूर्त कर्णधार आज तरी कोणताच कर्णधार क्रिकेट जगतात दिसत नाही. यशाचे श्रेय तो इतरांना देतो तर अपयशाचे धनी स्वतः बनतो. यामुळेच सीएसके यशस्वी ठरतेय. अंतत: हेच सगळे सीएसकेच्या यशाचे रहस्य असल्याचे स्पष्ट होते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

