shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा. शरद पवार आणि ना. नितीन गडकरी यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात“डॉक्टर ऑफ सायन्स”प्रदान..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार,29 ऑक्टोबर , 2021

"महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा पस्तीसावा पदवीदान समारंभ संपन्न...
संकल्प निश्चित करुन कृषि पदवीधरांनी प्रगतीची वाटचाल करावी- मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी"
 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ : पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण संशोधन करण्यासाठी प्रयत्न करा. या संशोधनातून उद्योजकतेची निर्मिती होवून रोजगाराच्या संधी निर्माण होवू शकतील. यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला संकल्प समोर ठेवून शेतकर्यांचा आणि देशाचा उद्धार करावा. विश्वात असलेले सर्व चांगले विचार आत्मसात करा. इंग्रजीला प्राधान्य देण्याबरोबरच सर्वांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान करावा असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पस्तीसावा पदवीदान समारंभात स्नातकांना उद्देशून अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रतिकुलपती तथा मंत्री, कृषि आणि माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य ना. दादाजी भुसे, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड हे प्रमख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या प्रसंगी माजी केंद्रीय कृषि मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली आणि राज्यसभा सदस्य खा. शरद पवार आणि केंद्रीय मंत्री, रस्ते, वाहतूक आणि परिवहन, भारत सरकार, ना. नितीन गडकरी, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार उपस्थित होते.
 

राज्यपाल पुढे म्हणाले की, शेतकर्यांनी जी.आय. मानांकनाचा वापर करुन जास्तीत जास्त पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करावा ज्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनांना अधिकचा बाजारभाव मिळून त्यांचा फायदा होईल. पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी म्हण प्रचलीत होती. ती कोरोनाच्या जागतीक महामारीत सिध्द झाली. औद्योगीक क्षेत्रासह सर्व काही बंद असतांना फक्त शेती व शेती क्षेत्राशी संबंधीत उद्योग चालू राहून खर्या अर्थाने शेतकर्यांनी सर्वांना आधार दिला. त्यामुळे शेतकर्यांचे हे योगदान न विसरण्यासारखे आहे.
 

यावेळी कृषिमंत्री ना. दादाजी भुसे आपल्या भाषणात म्हणाले कृषिची पदवी मिळविल्यानंतर त्यातील फक्त 10 ते 15 टक्के विद्यार्थी कृषिशी संबंधीत क्षेत्रात कार्यरत राहतात. विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले क्षेत्र कुठलेही निवडा परंतु ज्या कृषिचे शिक्षण तुम्ही घेतले त्या कृषि क्षेत्राशी तसेच शेतकर्यांशी प्रामाणिक राहुन शेतकर्याला संपन्न बनविण्यासाठी तुमचे सर्वोच्च योगदान द्या. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नरेंद्र सिंह राठौड आपल्या दीक्षांत भाषणात म्हणाले की कृषि शिक्षण हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी पदवी मिळविल्यानंतर उद्योजक होऊन रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. कृषि शिक्षण अभ्यासक्रमात औद्योगिक क्षेत्रातील गरज लक्षात घेवून त्याप्रमाणे बदल करणे गरजेचे आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले विद्यापीठ विविध विषयांमध्ये पदविका, कृषि पदवी, पद्व्युत्तर आणि आचार्य पदव्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. गेल्यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे नऊ वाण, तीन कृषि यंत्रे व औजारे आणि एकूण 63 तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकर्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विस्तार शिक्षण क्षेत्रात देखिल विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
राज्याचे राज्यपाल आणि कृषि विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. तसेच यावेळी 104 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 628 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 10,736 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 11,468 पदव्या प्रदान करण्यात आल्या. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शुभहस्ते सन 2019-20 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. हर्षदा देसले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. सोनाली माने, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला मृणाल मारणे तसेच सन 2020-21 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. प्रेरणा खोत, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेला ऋषिकेश भवर, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला आदित्य जोशी यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

समारंभाला नगरविकास व उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, खा. सुजय विखे पाटील, खा. सदाशीव लोखंडे, साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे, माजी आ. शिवाजी कर्डिले, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. नरेंद्र दराडे, आ. किशोर दराडे, दत्तात्रय उगले, दत्तात्रय पानसरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्री घुले, विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सदस्य, दापोली कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, विद्या शाखेचे उपकुलसचिव विजय दाभाडे, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापुसाहेब भाकरे आणि डॉ. भगवान देशमुख यांनी केले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close