आयपीएल -२०२१ चे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यात आले असून प्ले ऑफ मध्ये खेळण्यासाठी तीन संघ निश्चित झाले असून चौथा संघही येत्या चार दिवसात स्पष्ट होईल. चेन्नई व दिल्ली बारा पैकी प्रत्येक ९ सामने जिंकून गुणतालिकेत प्रथम व द्वितीय क्रमांकावर विराजमान आहेत तर तितक्याच सामन्यात ८ विजयांसह आरसीबीनेही आपली प्ले ऑफ सिट पक्की केली आहे.
रवीवारी पहिला सामना पक्के दोस्त असलेल्या के एल राहुल व विराट कोहलीच्या पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या दरम्यान झाला. प्रथम खेळताना आरसीबीच्या खात्यावर ७ बाद १६४ अशा मजबूत धावा दिसत असल्या तरी त्या अपेक्षेपेक्षा फार कमी होत्या. त्यामागे पंजाबच्या गोलंदाजांची मोठी मेहनत होती.
केएल राहुल व मयंक अग्रवालने नेहमी प्रमाणे झंझावाती सुरूवात करुन दिल्यानंतर शेवटच्या १० षटकात पंजाबच्या ९ फलंदाजांना ५९ धावा करता आल्या नाहीत व सहा धावांनी पंजाबने सामना गमावला. वास्तविक बघता पंजाबने या स्पर्धेत पाच सामने जवळ जवळ जिंकले असताना गमावले आहेत. त्यामुळे जो पंजाबचा संघ प्ले ऑफ मध्ये पाहिजे होता तो वाऱ्यावर भरकटत आहे.
पंजाबची फलंदाजीची पुरी भिस्त केएल राहुल व मयंक अग्रवाल या दोघांवरच आहे. ते दोघेही त्यांच्यापरीने अतोनात मेहनत घेत आहेत परंतु उर्वरीत फलंदाज त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी सोडताना दिसत आहे. द. आफ्रिकेचा एडन मार्करम व विंडीजचा निकोलस पुरन हे नावाजलेले फलंदाज पंजाबकडे असूनही त्यांनी आपल्या लौकीकाप्रमाणे खेळ न केल्याने पंजाबला नामुष्की पत्करावी लागत आहे.
आयपीएलच्या इतिहासात पंजाबकडून खेळणाऱ्या अनेक फलंदाज व बऱ्याच गोलंदाजांनी स्पर्धेत सर्वाधिक धावांसाठी असलेली ऑरेंज कॅप व सर्वाधिक बळींसाठी असलेली पर्पल कॅप पटकविली आहे. विशेष म्हणजे आजमितीला पंजाबची गुणतालिकेत वाताहत दिसत असली तरी पंजाबचाच केएल राहुल हा लेख लिहिला जात असे पर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावांसाठी असलेली ऑरेंज कॅप स्वतःच्या शिरावर घेऊन मिरवत होता.
काही महाभाग पंजाबच्या या खराब प्रदर्शनाला कर्णधार राहुल व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना जबाबदार धरत आहेत. परंतु पुर्वाश्रमीच्या किंग्ज इलेव्हन पंजाब व नामांतरानंतरच्या आजच्या पंजाब किंग्जच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर आज जे प्रदर्शन हा संघ करत आहेत. तसेच प्रदर्शन पूर्वीपासूनच होत आहे. याला इतिहास साक्षीला आहे. कित्येक नावाजलेले खेळाडू पंजाबकडून खेळले, अनेक मातब्बर कर्णधारांनी पंजाबचे नेतृत्व केले. कित्येक रथी महारथी प्रशिक्षक या संघाचे राहीले. परंतु आयपीएल मधील सर्वात बेभरवशाचा संघ म्हणून पंजाबकडे आजही त्याच नजरेने बघीतले जात आहे.
आयपीएल मध्ये आतापर्यत अनेक मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंगचे प्रकरणं प्रकाशझोतात आले. गुन्हे नोंदले गेले, खटले भरले, न्यायालयीन प्रक्रिया झाल्या, खेळाडूंना, संघ मालकांना शिक्षाही झाल्या. पुढे जात न्यायालयात ते निर्दोषही सुटले. कालांतराने क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात परतही आले.
आयपीएलमध्ये संघ मालक आपल्या खेळाडूंवर, प्रशिक्षकांवर कोट्यावधी रूपयांची उधळण करतात. मात्र प्राईज मनीच्या नावावर यांना किती पैसे मिळतात याची आकडेवारी बघीतली तर ती आपल्याला अतिशय किरकोळ दिसेल. मग खर्च झालेल्या पैश्यांपेक्षा मिळणारा मोबदला कमी असेल तर जगातला कोणता व्यवसायिक स्वतःचं नुकसान होईल असा घर घालून धंदा करेल ?
उद्योजक नेस वाडिया व अभिनेत्री प्रिती झिंटा हे या संघाचे पक्के व्यावसायिक असलेले मालक आहेत. मग ते आपल्या डोळ्यादेखत एवढा मोठा घाटा खरंच सहन करतील ? दरवेळेस जिंकत आलेला सामना हाच संघ सर्वाधिक वेळा हारतो कसा ? हा डोक चक्रावणारा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असणार ? आता तुम्हीच ठरवा या पराभवामागे खराब खेळणारे खेळाडू आहेत ? गचाळ नियोजन करणारे प्रशिक्षक आहेत ? का चुकीचे नेतृत्व करणारे कर्णधार आहेत ? कि अचूक आर्थिक नियोजन करणारे संघ मालक आहेत ? त्यामुळे पंजाबने जिंकत आलेलेले सामने हरण्यामागचे खरे गौडबंगाल काय ?हा प्रश्न जगभरातील तमाम क्रिकेट रसिक व पंडितांना पडला आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

