शिर्डी । प्रतिनिधी:-
सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांवर वेगवेगळ्या क्षेत्रातून दबावतंत्र वापरून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होत आहे. असाच अन्याय शिर्डी येथील पत्रकारावर साई संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून झाला आहे.
येथिल पत्रकार जितेश लोकचंदानी यांच्यावर पोलीस स्टेशनला दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा. म्हणून शिर्डीतील विविध संस्थेचे पदाधिकारी, संघटना व पक्ष कार्यकर्त्यांनी वेगवेगळे शिष्टमंडळ जाऊन शिर्डी चे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव तसेच पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदने देऊन यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून मागणी केली आहे. तसेच या संदर्भात शिर्डीतील पत्रकारांनीही पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.
शिर्डी येथील पत्रकार जितेश
लोकंचंदानी यांनी आपल्या वृत्तपत्रात अन्यायाला वाचा फोडणारे वृत्त नेहमीच प्रसिद्ध केले. साईभक्तांच्या समस्या अडचणी मांडल्या. भक्तांच्या तक्रारही पुरावे असल्याने छापल्या. त्याचप्रमाणे संस्थांनच्या जनसंपर्क अधिकारी यांनी मुंबई व आसाम येथील साईभक्त महिलेला अश्लील फोटो पाठवल्या प्रकरणी पुरावे घेऊन तदनंतर त्यासंदर्भात आपल्या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधित जनसंपर्क अधिकारी यांना त्याचा राग येऊन त्यांनी पोलिस स्टेशनला येथील पत्रकार जितेश लोकचंदानी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. हा प्रसिद्धी माध्यमांवर, पत्रकारांवर होणारा अन्याय असून हा खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा व असे यापुढे प्रसिद्धी माध्यमांवर, पत्रकारांवर कोणीही विनाकरण चिखलफेक करू नये. सत्य काय आहे हे प्रथम पाहिले जावे. असे शिर्डीतील विविध संघटनांनी आपले शिष्टमंडळ घेऊन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे.
यापुढे असा पत्रकारांवर अन्याय झाला तर पत्रकार व प्रसिद्धी माध्यमे शांत बसणार नाहीत. त्याचप्रमाणे आम्हीही त्या विरोधात आवाज उठवू . असा इशाराही यावेळी बोलताना अनेक संघटना व पक्ष पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनला व संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

