shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्ले ऑफ मध्ये अंतिम चार संघात यंदा मुंबई नसणार ?


                जगातील सर्वात मोठी, लोकप्रिय व यशस्वी लिग क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलचे विक्रमी पाच विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदा विजेतेपदाची हॅट्रीक साधण्याची सुवर्ण संधी आहे. परंतु हि स्पर्धा जशी सुरू झाली तशी मुंबईच्या खेळात गंभीरता दिसत नाही. भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यातील सातपैकी चार सामने जिंकले तर ३ गमावले. त्यानंतर युएईत सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात पाच पैकी चार सामने त्यांनी गमावले तर केवळ एका सामन्यात विजय मिळविला.  तरीही त्यांची पलटवार करण्याची खासीयत बघता जगभरातील तमाम क्रिकेट रसिक, पंडित अजूनही मुंबईच विजेतेपद मिळविल अशी आशा धरून आहेत. परंतु सध्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची देहबोली, फलंदाजांचा फॉर्म व कर्णधार म्हणून रोहीत शर्माची तडफ यावरून मुंबईला विजेतेपद मिळविण्यात रस नसल्याचेच चित्र दिसत आहे.
                
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी नेहमी जोरदार राहिली असली तरी ते मजबूत फलंदाजीसाठीच जास्त प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या या मजबूत फलंदाजीचे वैशिष्टये म्हणजे संकटसमयी प्रत्येक वेळी कोणी ना कोणी त्यांचा बुरूज यशस्वीरित्या सांभाळला आहे. परंतु विद्यमान आयपीएल सत्रात एकही फलंदाज आपल्या लौकीका प्रमाणे खेळताना दिसत नाही. त्यामुळेच तर सारी पंचाईत झाली आहे.
                 
कर्णधार रोहीत शर्मा युएईतील पहिल्या तीन सामन्यात बऱ्यापैकी लयीत होता. परंतु मागील दोन सामन्यात तो सुध्दा आपला सूर हरवून बसला आहे. तर त्याचा सलामीचा साथीदार क्विंटन डिकॉकच्या खेळातही सातत्य दिसत नाही. ज्या सुर्यकुमार यादवच्या खेळाच्या सातत्याची प्रत्येक जण ग्वाही देत होते त्याचाही जोर ओसरल्याने मुंबईसाठी नव्हेच तर भारतीय संघासाठीही चिंता वाढली आहे. कारण आयपीएल नंतर लगेच सुरू होणाऱ्या भारतीय संघाचा तो प्रमुख फलंदाज आहे.
               
मागील आयपीएल व भारताकडून काही आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळाल्यानंतर चांगल्यापैकी कामगिरी केल्यानंतर थेट भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळालेल्या ईशान किशन व राहुल चहर यांना खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सच्या संघातूनही स्थान गमवावे लागल्यामुळे भारताच्या संघातील त्यांच्या स्थानावरही संक्रांत येण्याची शक्यता आहे. तर हार्दिक पांड्या ना धड गोलंदाजी करत आहे ना फलंदाजीत अपेक्षीत यश मिळवित आहे. त्यामुळे त्यालाही विश्वचषक संघातून वगळले तर कोणी आश्चर्य व्यक्त करू नये.
                 
मुंबईचे फलंदाज झालेल्या चुकांतून व आलेल्या वाईट अनुभवातून काहीच बोध घेत नसल्याने त्यांची प्ले ऑफ फेरी धोक्यात आली आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरूध्दच्या करो वा मरो सामन्यात तर त्यांच्या फलंदाजांनी साक्षात लोटांगण घेतले. सुर्यकुमार यादवच्या ३३ धावा सोडल्या तर इतर फलंदाजांची हाराकिरीच जास्त दिसली. दिल्लीचे आवेश खान व अक्षर पटेल हे तर मुंबईच्या फलंदाजांचे कर्दनकाळच बनले होते. केवळ १३० धावांचे लक्ष दिल्लीच्या बलाढय फलंदाजीसाठी किरकोळ होते. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला खरा परंतु मुळ मुंबईचाच खेळाडू असलेला श्रेयस अय्यर त्यांच्या विजयात काटा बनला. या सामन्यात आवश्यक असलेला विजय निसटल्याने मुंबईला उर्वरीत दोन सामने सरस धावगतीने जिंकणे अनिवार्य बनले असून इतर संघांच्या कामगिरीवरही त्यांचे भवितव्य अंबलबून राहाणार आहे. शिवाय मुंबई आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरली असून त्यांची धावगतीही त्यांच्या विरोधात गेली आहे.सर्व काही सुरळीत होत असताना मुंबई संघाने हाताने परिस्थिती बिकट करून घेतली आहे. त्यामुळे आता फक्त दैवच मुंबईला तारू शकेल.
                     
मुंबईवरील विजयाने दिल्लीचा प्ले ऑफ प्रवेश सुकर झाला असून पहिल्या दोन क्रमांकात ते राहणार हे फिक्स झाले आहे. तर दुसरीकडे गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नईने राजस्थान विरूध्द संघात बदल करून इतरांनाही संधी उपलब्ध करून दिली. ऋतूराज गायकवाडने आपला जोरदार फॉर्म कायम ठेवत झंझावाती शतक ठोकत सीएसकेला मजबूत धावसंख्या बनवून दिली. परंतु केवळ जिंकण्याच्याच उद्देशाने मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून जोरदार हल्ला करत १४ चेंडू व ७ गडी राखून विजय मिळवित आपली गुणसंख्या १० वर नेली. जयशस्वी जयस्वाल व शिवम दुबे हे मुंबईकर त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तर सीएसकेकडून खेळणारा शार्दूल ठाकूर हा मुंबईकर गोलंदाज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शार्दूलने या सामन्यातही आपल्या गोल्डन आर्मचा चमत्कार दाखविला मात्र चेन्नईचे इतर गोलंदाज अपयशी ठरल्याने सीएसकेचे प्रयत्न अपुरे पडले व राजस्थान रॉयल्सने बाजी मारली.
                           
सीएसके, दिल्ली, राजस्थान कडून खेळणारे महाराष्ट्र व मुंबईचे खेळाडू यशस्वी ठरत असताना आयपीएल मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा मुंबई इंडियन्सचा संघ खालच्या दिशेने सरकत आहे हे मनाला न पटणारं सत्य मात्र सध्या आपल्याला उघडया डोळ्याने बघावे लागत आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close