खा. प्रीतम मुंडे यांची उपोषणस्थळी भेट..
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
अंबाजोगाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्यांच्या कामात झालेल्या ३६ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे सुतोवाच बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. खा. मुंडे यांनी शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी बाजार समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची भेट घेतली.
तीन वर्षापूर्वी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्याच्या रद्द झालेल्या कामाचे बिल प्रशासक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने देऊन ३६ लाख ३९ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यामुळे संबंधितांकडून ही रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत या मागणीसाठी नंदकिशोर मुंदडा यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांनी नंदकिशोर मुंदडा यांची भेट घेऊन सर्व प्रकरण सविस्तर जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी मुंदडा यांना पाठींबा देत या प्रकरणात लक्ष देऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगत कारवाईस टाळटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचेही सांगितले.
त्यासोबतच त्यांनी मुंदडा यांच्या प्रकृती विषयी देखील चिंता व्यक्ते केली. यावेळी त्यांच्या समवेत केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा उपस्थित होत्या*.
अधिकाऱ्यांचे वेळकाढूपणाचे धोरण
दरम्यान, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील जिल्हा उपनिबंधकांकडून पत्रव्यवहाराद्वारे मुंदडा यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. परंतु, बाजार समिकरून मूळ मुद्द्यला बगल देत सदरील कामाच्या बाबतीत दक्षता व गुणनियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांच्याकडून मुल्यांकन अभिप्राय आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल या आश्वासनाचे पालुपद जिल्हा उपनिबंधकांनी चालू ठेवले. मात्र, जर दक्षता व गुणनियंत्रण यांच्याकडूनच मुल्यांकन करायचे होते तर यापूर्वीच का केले नाही असा सवाल करत ही कृती म्हणजे केवळ वेळकाढूपणा असून त्या आडून दोषींना पाठीशी घालण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप मुंदडा यांनी केला. संपूर्ण रकमेची वसुली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचाही पुनरुच्चार मुंदडा यांनी केला.
पत्रकार परिषद केली रद्द
मुंदडा यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान मुख्य प्रशासक गोविंद देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, थोड्याच वेळात पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे निरोप देण्यात आले. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

