येत्या २४ ऑक्टोबरला सातव्या टि२० विश्वचषक स्पर्धेत पारंपारीक प्रतिस्पर्धी व पक्के हाडवैरी भारत व पाकिस्तान यांच्यात एक हाय होल्टेज सामना होणार आहे. भारत - पाक सामना म्हंटला तर तो फक्त एक खेळ नसून ते मैदानापेक्षा मैदानाबाहेरच खेळले जाणारे महाद्वंद्व असते. या सामन्यापूर्वी, सामन्यादरम्यान व सामन्यानंतरही दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये शाब्दीक देवाण घेवाण व भावनिक चकमकी सुरूच असतात.
प्रत्यक्ष सामना जेंव्हा सुरू होतो तेंव्हा दोन्ही संघ जीवाची बाजी लावून जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. त्यातच जर हा सामना विश्वचषकातील असला तर विचारूच नका. दोन्ही खेळाडूंमधील तणाव शिगेला पोहोचतो.
याच तणावाच्या गर्मीत दोन्ही संघातील वातावरणही भडक बनतं. खेळाडूही स्वतःवरील नियंत्रण हरवतात व मग भर मैदानात खेळाडूंमध्ये झालेले भाडणं आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघावे लागतात. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये एकमेंकावर कुरघोडी करण्याच्या नादात झालेल्या काही ठळक वादविवादांवर एक नजर टाकूया.
सन १९७८ मध्ये भारत पाक दौऱ्यावर असताना जफर अली स्टेडियमवर झालेल्या निर्णयाक एकदिवसीय सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३७ षटकात दोन बाद १८३ धावा बनविल्या असताना पाक कर्णधाराने ३८ वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाझला पाचारण केले.
त्या काळी षटकात दोन बाऊंसर्स टाकण्याचा लिखित नियम नव्हता. परंतु खेळातील नैतिकता सोडत सर्फराजने अंशुमन गायकवाडवर जखमी करण्याच्या हेतूने सलग चार बाऊंसर्स टाकले. तरीही पंचानी नोबॉल सोडा साधा वाईड बॉल देण्याचेही सौजन्य दाखविले नाही. या घटनेचा अति राग आलेल्या भारतीय कप्तान बिशनसिंग बेदीने भारतीय फलंदाजांना माघारी बोलावून सामना पाकला बहाल केला. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली घटना होती की कोणत्याही कर्णधाराने चिडून सामना प्रतिपक्षाला बहाल केला होता.
सन १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाक समोर २१७ धावांचे मामुली लक्ष ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकने दोन फलंदाज झटपट गमावले. त्याच ओघात भारताचा यष्टीरक्षक किरण मोरे सहकारी खेळाडू व गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी अपिलांवर अपिल करत होता. ही बाब फलंदाज जावेद मियाँदादला आवडत नव्हती. मोरे बाबत जावेदने पंचाकडे तक्रारही केली होती.
नेमकी त्यानंतर जावेद मियाँदाद धाव घेताना किरण मोरेने त्याच्या विरूद्ध धावबादचे अपिल केले, त्यावर चिडून जावेदने भर मैदानात बेडूक उड्या मारल्या. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हास्य उमललं पण दोन्ही संघात तणाव निर्माण झाला होता. अखेर भारताने हा सामना ४३ धावांनी जिंकला.
सन १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना बंगलोरला झाला. या सामन्यात भारताने प्रथम खेळताना २८६ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात पाकने ठोस सुरुवात केली. पाकचा सलामीवीर आमिर सोहेल चांगलाच रंगात आला होता. त्या दरम्यान त्याने वेंकटेश प्रसादला चौकार मारला व प्रसादला खिजविण्याच्या प्रयत्नात त्याने सिमारेषेकडे जाणाऱ्या चेंडूकडे प्रसादचे बोटाने इशारा करत लक्ष वेधले.
यानंतरच्या चेंडूवर वेंकटेश प्रसादने राऊंड दि विकेट चेंडू टाकून सोहेलचा त्रिफळा उडविला. त्यानंतर सोहेलला प्रसादने पॅव्हेलियनकडे परतण्याचा इशारा करत जोरदार प्रत्युत्तर दिले. हि घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही ताजी आहे.
सन २००७ मध्ये पाक संघ भारत दौऱ्यावर असताना कानपूर येथील एकदिवसीय सामन्यात गौतम गंभिर व शाहिद आफ्रीदी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्याचे असे झाले, गौतमने आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारला व पुढच्या चेंडूवर एकेरी धाव घेताना आफ्रिदी जाणून बुजून गंभिरच्या मार्गात आला व दोघांची टक्कर झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. मैदानातील पंचानी कसेबसे प्रकरण मिटविले. मात्र सामन्यानंतर सामनाधिकारी रोशन महानामाने आफ्रिदीला मॅच फीच्या ९५ टक्के तर गंभिरला ६५ टक्के दंड आकारला.
सन २०१० ची आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत झाली. त्याच स्पर्धेत डांबुला येथे या दोन संघात लढत झाली. त्या दरम्यान फिरकी गोलंदाज सईद अजमलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कामरान अकमलने गंभीर विरूध्द झेलबादचे अपिल केले व आनंदाच्या भरात खेळपट्टीपर्यंत पोहोचला. पंचानी ते अपिल फेटाळले व गंभिर नाबाद राहीला.
त्यानंतर जलपानाच्या विश्रांती दरम्यान गंभिर व अकमल दरम्यान जोरदार बाचाबाची झाली. तेंव्हा पंच बिली बोडेनने अकमलला व सहकारी फलंदाज व कर्णधार एम एस धोनीने गंभीरला बाजूला सारत वादावर पडदा टाकला. मात्र हे प्रकरण आजही क्रिडा रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहे.
त्याच सामन्यात भारत पाकने दिलेल्या २६७ धावांचा पाठलाग करत असताना अंतिम षटकात भारताला सात धावांची गरज होती. त्या वेळेस भारताचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले असल्याने हरभजन सिंगवर विजयाची जबाबदारी होती. शेवटचे षटक मोहम्मद आमिर टाकत असताना त्याचा एक चेंडू हरभजनच्या बॅटच्या पट्टयातून हुकला व यष्टीमागे गेला. त्यानंतर शोएब अख्तरने अभद्र टिपण्णी सुरू केली.
तरीही हरभजनने लक्ष विचलित होऊ न देता षटकार ठोकून विजय खेचून आणला व आक्रमकपणे तो साजरा करायलाही सुरूवात केली. ही बाब शोएब अख्तरला पटली नाही व तो भर मैदानात हरभजनशी हुज्जत घालू लागला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

