शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर: ता.३ ऑक्टोबर),– अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढलेली ६१ गावे दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांचा यासमध्ये समावेश आहे. सोमवार, दि.४ ऑक्टोबर पासून बुधवार, दि.१३ ऑक्टोबर पर्यंत दहा दिवस या गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक गावे ही संगमनेर तालुक्यातील २४ असून श्रीगोंदा तालुक्यातील ९, राहाता ७, पारनेर ६, शेवगाव ४, अकोले ३, श्रीरामपूर ३, कर्जत २, कोपरगाव १, नेवासा १, पाथर्डी १ गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
वरीप्रमाणे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढलेली ६१ गावे दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलेली आहेत.
कोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या गावांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गावामध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. या गावामध्ये बाहेरील व्यक्तींना जाणे-येण्यावर प्रतिबंध राहील. नोकरीनिमित्त ज्या प्रवास करावयाचा आहे, त्यांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासनाच्या मदतीने रस्ते बंद केले जाणार आहे.
या गावांमधील शाळा आणि धार्मिक स्थळे बंद केले जातील. या गावातील दवाखाने, बॅंक, पतसंस्था, औषध दुकाने, कृषी सेवा केंद्रांना परवानगी राहील. किराणा दुकानांना सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत परवानगी राहील. गावातील इतर व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावे लागतील. या गावातून मालवाहतुकीला परवानगी राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे आहेत. त्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरूनच दुधाचे संकलन करावे लागणार आहे. या गावांमधील अंत्ययात्रा, दशक्रिया विधीसाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या विधीसाठी फक्त २० व्यक्तींसाठी परवानगी राहणार आहे. लॉकडाऊन केलेल्या गावांमध्ये १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जाणार आहे.
दिवसभरात आज नगर शहरात ४२४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. ज्या गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत,
अशा गावांमध्ये हा लॉकडाऊन लादण्यात आलाय. जिल्ह्यात जवळपास दररोज ५०० ते ८०० च्या घरात रुग्ण सापडत असून, पॉझिटिव्हिटी रेटही ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)📲7350591600.

