भटक्या जमातींच्या अस्थिर आणि वेदनादायी जगण्याची 'झोळी' - डॉ.सतेज दणाणे
मो.९४०४७६१४२७
Email - satejdanane@gmail.com
कालिदास शिंदे यांचे झोळी हे आत्मकथन आहे.' नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीच्या संघर्षमय जीवनाची कहाणी या आत्मकथन अतिशय प्रामाणिकपणे मांडली आहे. लेखकाने त्याच्या जमातीबरोबर अनेक भटक्या जमाचे संघर्षमय जीवन चित्रीत केले आहे. त्यामधून भटक्याचे दाहक जीवन आपल्या नजरेसमोर उभे राहते. तसेच सांस्कृतिक वैभव ही खुले होते. भटके असणे म्हणजे काय ? कशासाठी आणि का भटकावे लागते. स्थिर समाज कोणत्या व्ह्यू मधून या लोकांकडे बघतो. पोटाची भूक विविध सोंगे घ्यायला कशी भाग पडते. या समाजातील जीवनाचे कथन सध्या सोप्या बोली भाषेतून केले आहे. तो भटक्यांच्या जीवनाकडे एका व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहतो आहे. भूतकाळाला उसवताना तो भवतलाकडे सामजस्यपणे पाहतो. त्याचे कथन त्याच्या कुटुंबातच मर्यादित राहिलेल नाही किंवा त्याच्या नाथपंथी डवरी गोसावी या जमातीत बंदिस्त झालेले नाही.तर त्याचा आवाका संपूर्ण भटक्या जमातीच्या कक्षा ओलांडणारा आहे.
यामुळेच समस्त भटक्या समाजाच्या जीवनाची संघर्षगाथा मांडणारे हे आत्मकथन ठरते. या आत्मकथनात वाघरी, कैकाडी, लारदी, मुस्लिम मदारी, बालघाटी, बहुरूपी, गंगाथडी अशा अनेक जमातीचा उल्लेख झालेला नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक, शैक्षणिक अंतरंग मुळापासून उलगडून दाखविलेले आहे. या अर्थाने भटक्या जमातीच्या अंतर्बाह्य वास्तवाची 'झोळी ' शिंदे यांनी उघडून दाखविली आहे.
कालिदास शिंदे यांच्या ' झोळी ' या 352 पानाच्या आणि दहा भागात लिहिलेल्या आत्मकथनात ' डवरी नाथपंथी गोसावी ' या प्रमुख भटक्या जमातीसह अनेक भटक्या जमातीचे सांस्कृतिक, सामाजिक अंतरंग कथन केलेले आहेत. केवळ पोटासाठीची भटकंती हे सर्वच भटक्या जमातीमध्ये एक समान सूत्र पहावयाला मिळते. सर्वच भटक्या जमाती मांसाहारी आहेत. त्यांच्यामध्ये देवधर्म कर्मकांड, भूतबाधा आहेत. रुढी-परंपरा पाळणे, चांगले- वाईट, नीती-अनिती, या विषयाच्या समजुती सर्वत्र काही प्रमाणात सारख्याच आहेत. काही जमातीत मुले शिक्षण घेतात, पण मुलीबाबत दुजाभाव होताना दिसतो.
चौहूमुलखात भटकंती चालू असली तरी जत्रेच्या वेळी ते एकत्र येतात. त्यावेळी देवधर्म होतात तसेच भांडणे ही उकरून काढण्याची परंपरा आहे. प्रत्येक भटक्या जमातीची स्वतःची स्वतंत्र बोलीभाषा आहे. याविषयीचे बोली भाषेतील उदाहरणासह वर्णन लेखकाने केले आहे. भटक्या जमातीचा भाषिकदृष्टीने अभ्यास करण्यासाठी झोळी हा दस्तऐवज म्हणून उपयोगी ठरणारा आहे.
दारिद्र्याची सर्वोच्च सीमा भटक्या जमातीच्या जीवनात आहे. ' आयन मग गलचीत खुट्ट , सळ्या, किडुक- मिडुक सामान भरल, भाड्याचं एक गटूळ बांधलं. दादांन पाल मोगाळ गोळा केलं त्याची घडी घातली. पाल आन वाकळा एका जागी चोपून वज बांधलं. आयन बाकी राहिल्याल सटार- फटार सार सामान एका फाटलेल्या लुगड्यात बांधलं. आमची चार गठूली झाली हुती.' त्यांची संपत्ती म्हणजे पाल, भांडीकुंडी, कोंबड्या, कुत्री, घोड, पाल बांधायच्या दोऱ्या इतक मर्यादित आहे. ' मागून खाणे हाच त्यांचा धर्म ' असे ते समजतात. कामगार म्हणून कोणाकडे काम करण्यापेक्षा स्वतःचा छोटा मोठा धंदा ते करतात. भंगार गोळा करणे, कचरा गोळा करणे, स्टोव्ह रिपेअर करणे अशी किंवा वेगवेगळी सोंगे घेऊन भिक्षा मागणे हेच त्यांच्या जगण्याचे साधन आहे. शिकार करणे, मासे धरणे आणि खाणे यासाठी ते प्रयत्नशील असतात. ज्या गावात भिक्षा मिळेल तेथे थांबायचे. गाव मागून झाला आणि गावातील कोण भीक देईना की पुढच्या गावाला निघून जायचे. हे त्यांचे भटकंतीचे जीवन.
कालिदास शिंदे यांनी समस्त भटक्या जीवनाचा व्यापक पट त्यांच्या व्यथा, वेदना,समस्या, आहार-विहार याबरोबर भाषिक विविधतेसह झोळी आत्मकथनात मांडलेला आहे.
' झोळी 'चा निवेदक कालिदासचा शिक्षणासाठीचा संघर्ष आणि त्याच्या कुटुंबाची भटकंती, दारिद्र्य आणि भटक्या जमातीचे संघर्षमय जगणे. हे अस्थिर समाजाचे जीवन म्हणून एक दृष्टिक्षेप टाकता येण्यासारखा आहे. अगदी संयत भाषेत प्रारंभी निवेदन करणारा निवेदक नंतर भटक्या जमातीच्या अभावग्रस्ततेविषयी पोटतिडकीने बोलतो आहे. अस्थिर जमाती स्थिर होत नाहीत तोपर्यंत प्रगतीचे मार्ग निर्माण होणार नाहीत. किंवा त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्यांना स्थिर होता येणार नाही. स्थिर होण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणे. राहण्यासाठी कायमचे निवासस्थान उपलब्ध होणे हेही आवश्यक राहते. भरजरी कपड्यातील अतिश्रीमंताचे सजलेले, धरलेले एक जग आणि भटक्यांचे पालातील जग याची कुठेच तुलना होत नाही. यामधील दरी,आर्थिक आहे. तशीच सांस्कृतिक आहे. मात्र स्थिर आणि आर्थिक दृष्टीने सक्षम असणाऱ्या समाजापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि लाख-मोलाची भाषिक संपत्ती या जमातीकडे आहे. जी या लखलखाटात आणि शुद्ध शुद्धतेच्या नावाखाली संपवली गेली आहे.
भटक्या जमातीचे सांस्कृतिक जीवन असाही विचार करता येण्यासारखा आहे. दलित समाजाशी डवरी गोसावी किंवा इतर भटक्या जमातीशी तुलना करता जातीमुळे धर्मामुळे दलितांना जी सामाजिक वागणूक मिळाली आहे ती डवरी गोसावी किंवा इतर जमातींना मिळाली नाही. किंवा धर्मामुळे भटक्या जमातींना हिन दर्जाची वागणूक मिळाली नाही तर धार्मिक कार्यामुळे किंवा व्यवसायामुळे उदरनिर्वाहाचे साधन मिळालेले आहे. त्यांना देवाचे भक्त म्हणून मान ही मिळालेला दिसतो. लेखक म्हणतो, ' जमात आज भी धार्मिक सेवा करीत हाय तरीबी त्याला समाजात वनवासाचे जीवन जगण्याची वेळ आली.' दलितांना जातीमुळे माणूसपणा पासून दूर ठेवलेले आहे, तर भटक्या मधील काही लोकांना धार्मिक सेवा करून पोटासाठी वनवास, भटकंती करावी लागते. त्यामुळे दलितांचा लढा आणि भटक्यांचा लढा यामध्ये सर्वच पातळीवर भेद असलेला दिसतो.
झोळीच्या प्रकाशनानंतर ' उत्तरआधुनिकता : प्रचंड गोंधळाची सांस्कृतिक थंडगार लोखंडी मानसिकता ' असल्याचे डॉ. दीपक बोरगावे यांनी म्हटले आहे ते खरे आहे. ' बलुतं ' आत्मकथनाने दलित जीवनातील दुःख, वेदनांचे उघडे सत्य प्रथमच साहित्यातून मांडले. त्यावेळी बहुसंख्य उच्चभ्रू समाज खडबडून जागा झाला. कारण ते जीवन वास्तव तत्कालीन समाजाच्या दृष्टीने नवीन होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याच्या प्रभावातून जागृत झालेल्या समाजातील सुशिक्षित तरुणांनी आपल्या आत्मजाणिवेतून केलेल्या मांडणीचे आदीरूप आत्मकथने, कथा, कविता अशा वाड,मयातून दलितेतर समाजापुढे आले. त्याचे कल्पनेपलीकडे स्वागत झाले. लक्ष्मण माने यांच्या ' उपरा ' आत्मकथनाने भटक्या जमातीचे अभावग्रस्त जीवन प्रभावीपणे पहिल्यांदाच साहित्यात आणले. त्याची चर्चा झाली.
या दलित साहित्यातील आत्मकथनाच्या स्वतंत्र प्रवाहाच्या वाटेवर 2021 मध्ये ' झोळी ' आत्मकथनाचे प्रकाशन झाले. पण त्याची चर्चा झाली नाही. त्याचे थंडपणे स्वागत झाले. खरं तर झोळीची दखल सर्व स्थरातून आणि विविध पातळीवर घ्यायला हवी ; कारण आज शिक्षणातील समृद्धता पाहता आणि डिजिटललाइजेशन पाहता भटक्या जमातीतील शैक्षणिक स्थिती काय आहे ? शिक्षणाची गंगा भटक्या जमातीच्या पाला पर्यंत पोहोचलेली नाही. याचे वास्तव आपणास झोळी मध्ये पहावयास मिळते. अनेक भटक्या जमाती आजही भटकंतीचे जगणे जगत आहेत. पालाच्या आस-याने जीवन उन्हा तान्हात, पावसात कंठत आहेत. भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. कचरा गोळा करणे, भंगार गोळा करणे. हे या जमातीचे आजचे जगण्याचे प्रश्न ,या समस्या आहेत. बदलता भवताल आणि संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बिना रोजगार बेभरवशाचे भटक्या जमातीचे जगणे दखल घेण्यासारखे असताना आपण त्याकडे कसे दुर्लक्ष करू शकतो असे वाटून राहिले.
भटक्या जमातींना एका ठिकाणी राहता येत नाही. पर्यायाने मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यांच्या जन्मतारखेची नोंद नसणे, जातीचा दाखला न मिळणे, कोणताच गाव त्यांचा नसणे ही अडचण राहते. मुले शिक्षण घेतात ते आश्रमशाळेतून, पण त्यावेळी त्यांची पाल कोणत्या गावात आहेत याची त्यांना कल्पना नसते; आणि त्यांच्या आई-वडिलांनाही कधी कोणते गाव सोडून, दुसऱ्या गावाला जावे लागेल याचा अंदाज नसतो. कालिदासचा भाऊ आश्रम शाळेतून फलटण या ठिकाणी पाल आहेत म्हणून येतो. परंतु त्या ठिकाणी दिवसभर त्याला आई-वडिलांचे पाल शोधत फिरावे लागते. तसेच कालिदास आणि त्याचे भाऊ जेजुरी या भागात पाल आहेत. म्हणून सुट्टीनिमित्त पेठवडगाव येथून त्याठिकाणी जातात. सगळा गाव पालथा घालतात, पण त्यांची पाल रात्री पर्यंत त्यांना सापडत नाहीत. अशा अवस्थेमध्ये भटक्या जमाती आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू असते. यामध्ये चार दोन मुले शिक्षण घेतात. त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता नाही. त्यांची भटकंती थांबलेली नाही. त्यांना रोजगाराची साधने नाहीत असा हा भटकंती करणारा समाज , त्यांचे जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचा संघर्ष, फार वेदनादायी असा आहे.
एकंदरीत भटक्या जमातीच्या जीवनाचा जाहीरनामा झोळीच्या रूपाने डॉ.कालिदास शिंदे यांनी मांडलेला आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक, शैक्षणिक बाजूने ही या आत्मकथनकडे पाहता येईल. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे मुंबई अश्या परिसरातील भटकंती आणि त्यांचे जगण्यासाठी ची धडपड या आत्मकथन आहे. भटक्या जमातीतील तरुणाचा पीएच. डी.पर्यंतच्या शिक्षणासाठीचा संघर्षमय प्रवास प्रेरणा देणारा आहे हे निश्चित. या मधून भटक्या जमातीचा इतिहास, सद्यस्थिती आणि त्यांच्या समस्यांची जाणिव होते. अभावग्रस्त असणे आणि परिस्थितीशी दोन हात करून यश संपादन करण्यासाठीचा विविध पातळ्यांवरचा संघर्ष यामध्ये आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे वाटचाल चालू असताना भटक्या जमातीच्या वेदनादायी वास्तव जगाची ओळख डॉ.कालिदास शिंदे यांच्यामुळे होत आहे. त्यासाठी तरी हे आत्मकथन वाचायला हवे असे वाटते.

