"अहो कावळेभाऊ, तुम्ही तर रानात राहत होता. असे कसे चुकलात आणि गावात आलात?" गावातल्या कावळ्याने नवख्या दिसलेल्या रान कावळ्याला टोकले. तर रानकावळा कातावलाच आणि रागावून तो बोलला, " कसे नि कुठे रहायचे रानात? या मानवाने रानात एक तरी झाड शिल्लक ठेवलेय का? जिकडे पहावे तिकडे सिमेंट काँक्रीटच्या इमारती, पूल आणि गगनचुंबी टॉवर्स! मग आम्ही कुठे रहावे? काय खावे? आमची अंडी कुठे उबवावी? झाडच नाहीतर आमची उपासमार होतेय. फळे नाहीत, कीडे मुंग्या नाहीत. सगळीकडे सिमेंट आणि रेतीच दिसते. कंटाळा आलाय या जीवनाचा! मनाला शांती मिळत नाही"
आता मात्र गावातला कावळाही पोटतिडकीने बोलू लागला, "अरे बाबा, आमची पण तीच अवस्था आहे. पूर्वी लोकं अंगणात बसून लेकरांना काऊचा घास चिऊचा घास करत जेवण भरवायचे. त्यातला एखादा घास आमच्याकडेही फेकायचे पण आता अंगण नाही आणि अंगणात जेवणारे बाळही नाही. हल्ली सारी बाळं दूरदर्शनसमोर बसून जेवतात". तो पुढे म्हणाला, "पण एवढे पुढचे पंधरा दिवस जरा आपल्या जातबांधवांची मजा आहे. पितृपक्ष सुरू झाला ना? आता ही माणसं पितरं म्हणून आपल्याला पंचपक्वानाचा घास खाऊ घालणार! आपणाला काऊ काऊ करून बोलवत राहणार!". रानातला कावळा बोलला, "म्हणूनच आम्ही आता पंधरा दिवस गावातच राहणार. चांगले चुंगले खाणार. तब्येत सांभाळणार. मग दूर रानात उडून जाणार. ही माणसं जिवंत असताना आपल्या म्हातार्या आई-बाबांना पोटभर खायलाही देत नव्हती. पण त्यांच्या नावावर आपणाला पहा रोज मिठाई, पक्वान्ने खायला घालणार!"
दोन्ही कावळे माणसाच्या मूर्खपणावर हसून टाळ्या देऊ लागली. रानातला कावळा म्हणाला, "आम्ही रानातल्या सर्व कावळ्यांनी आता निरनिराळ्या गावचा रस्ता पकडला आहे. आपण मात्र पंधरा दिवस मस्त खायचे आणि मग दूर उडून जायचे, या माणसांची पितरं जेऊ दे का उपाशी राहू दे. पितृपक्षातील पंधरा दिवस आपणमात्र आपली मात्र दिवाळी करून घ्यायची. आपली लेकरेबाळे टुमटुमीत करायची". खो-खो करत दोन्ही कावळे हसू लागले आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या मानवाच्या अंधश्रद्धात्मक करणीसाठी दोष देत उडून गच्चीवरच्या अँटेनावर बसले. उद्यापासून त्यांना स्वादिष्ट पक्वान्न मिळणार या कल्पनेनेच त्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते.
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

