shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोहलीचे नेतृत्व आरसीबीसाठी अपयशीच राहीले !



                   विराट कोहली भारताचा क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांमधील विद्यमान कर्णधार आहे. इतकेच नाही तर द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने मोठे यशही मिळविले आहे. सन २०१४ पासून तो भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद भूषवित आहे. मात्र त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविता न येणे ही फार मोठी खंत आहे.
                 
त्याच प्रकारे जगातील सर्वात मोठी लिग म्हणून मान्यता पावलेली आयपीएल स्पर्धा त्याच्या नेतृत्वात त्याच्या फ्रँचाईसीला त्याने नेतृत्व केलेल्या नऊ पैकी एकदाही जिंकता आली नसून यंदाची स्पर्धाही त्याचा अपेक्षा भंग करून गेली. आयसीसीची स्पर्धा व आयपीएल स्पर्धात कोहलीच्या नेतृत्वात न जिंकता येणे ही कोहलीसाठी दुर्देवाची बाब असून गेल्या काही वर्षात भारताचा संघ फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, प्रशिक्षक या सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम होता. या सर्व बाबी अनुकूल असूनही भारताला कोहलीच्या नेतृत्वात आयसीसीच्या स्पर्धात निर्णायक टप्प्यात सातत्याने अपयश आले आहे. त्यामुळेच आगामी टि२० विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने भारताचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

                 
अशीच परिस्थिती कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅंलेजर्स बंगलोर या आयपीएल मधील फ्रँचाईसी बाबत झाली आहे. कोहली आयपीएलच्या प्रारंभापासून याच फ्रँचाईसी कडून खेळत आहे. सन २०११ मध्ये तत्कालिन कर्णधार डॅनियल व्हेटोरीने एका सामन्यात विश्रांती घेतली होती. तेंव्हा कोहलीने त्या सामन्यात आपल्या नेतृत्वाचा श्रीगणेशा केला होता. मग त्यानंतर सन २०१३ मध्ये त्याने नियमित कर्णधार म्हणून आरसीबीचा भार आपल्या शिरावर घेतला. परंतु एक फलंदाज म्हणून तो जितका मजबूत होता तितकाच कर्णधार म्हणून कमजोर सिध्द झाला. तसं बघाल तर त्याच्या नेतृत्वात आरसीबीने अनेक विजय देखील मिळविले परंतु आयपीएल करंडक तो कधीही जिंकू न शकल्याने त्याच्यावर अपयशी कर्णधार म्हणून शिक्का बसला असून तो यापुढेही कायम राहणार आहे. कारण या आयपीएल सत्रानंतर आरसीबीचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय त्याने जाहीर केला आहे.
                
विराट कोहली एक फलंदाज म्हणून जागतिक दर्जाचा आहे हे निर्विवाद सत्य असलं तरी कर्णधार म्हणून त्याच्या क्षमतेविषयी शंका घेण्यास वाव असल्याचे त्यानेच त्याच्या कृतींमधून अनेकदा दाखवून दिले आहे. एक फलंदाज म्हणून त्याची आक्रमकता निश्चितच वाखाणण्या योग्य असून व्यक्ती व कर्णधार म्हणून ती आक्रमकता जरा अती झाल्यासारखेच वाटते. त्याच्या या आक्रमतेत आक्रमकता कमी व आक्रस्तळेपणाच जास्त दिसतो.
                  
सोमवारी अकरा ऑक्टोबर रोजी आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात एलिमिनेटर सामना खेळविण्यात आला. हा सामना केकेआरने चार गडी राखून जिंकला व दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये खेळण्यास जागा मिळविली आणि त्याच बरोबर कोहलीचे कर्णधार म्हणून आयपीएल स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले.
                  
या सामन्यात कर्णधार कोहलीच्या अतिआक्रमक स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा मैदानातील पंचांना जवळून अनुभवायला मिळाला. केकेआर फलंदाजी करत असताना आरसीबीचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलचा एक चेंडू केकेआरचा फलंदाज राहुल त्रिपाठीच्या पॅडवर जाऊन आदळला. यावर आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार अपिल केले ते पंच विरेंदर शर्मा यांनी फेटाळले. कोहलीने रितसर डिआरएसही घेतला. सुदैवाने तो निर्णय तिसऱ्या पंचानी आरसीबीच्या बाजूने दिला. तरीही कर्णधार कोहली पंचाशी हुज्जत घालताना दिसला. वास्तविक कोणतीही बाब न्यायप्रविष्ठ असताना त्यावर वाद घालायचा नसतो असे स्पष्ट संकेत आहेत. तरीही कोहली सदर अपिलाची सुनावणी तिसऱ्या पंचाकडे सुरू असताना भर मैदानात पंचाशी हुज्जत घालत होता. हे अतिशय लाजिरवाणं दृश्य साऱ्या जगाने दूरचित्रवाणीच्या माध्यमातून पाहीले.
                  पंचाशी वाद घालणे हे काही कोहली साठी नवे नसले तरी त्याच्या सारख्या मुरब्बी कर्णधाराने नियमांचे पालन करणे गरजेचे असताना अपरिपक्वतेचे दर्शन घडविणे जरा जास्तच केविलवाणे वाटते.
                   वादग्रस्त संघ निवड करणे, गोलंदाजीत अनाकलनीय बदल करणे, स्वतःच्या मर्जीतील खेळाडूंना प्राधान्य देणे. या कोहलीच्या नित्याच्या सवयीचा भागच बनला असून या सामन्यात डॅनियल ख्रिश्चनला खेळविण्याचा मुद्दा जरा जास्तच ऐरणीवर आला होता. हाच डॅनियल संपूर्ण स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरत असताना त्याला वारंवार खेळविण्यात आले. शिवाय याच सामन्यात त्याच्या एकाच षटकात सुनिल नारायणने २२ धावा फटकावून सामन्याचे चित्रच बदलविले असताना इतर गोलंदाजांनी मेहनतीने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला असता शेवटच्या षटकात केकेआरला सात धावांची गरज असताना कोहलीने पुन्हा एकदा त्याच ख्रिश्चनला शेवटचे षटक दिले. केकेआरने त्याच्या षटकात कोणतेही नुकसान न सोसता ७ धावा आरामात काढल्या व केकेआरला विजेतेपदाच्या शर्यतीतून हद्दपार केले.
                   
कोहलीची हीच मनमानी तो नेतृत्व करत असलेल्या संघांना घातक ठरत असून परिस्थिती अशीच राहीली तर आगामी होऊ घातलेल्या टि २० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघाबाबतही असेच होऊ शकते.आयपीएल प्रमाणेच टि२० विश्वचषक स्पर्धेनंतर तो भारताचं कर्णधारपद सोडणार आहे. परंतु भारतीय संघातील अंतर्गत वाद जगजाहीर असल्याने कोहलीच्या आयसीसी करंडक जिंकण्याच्या स्वप्नाला याप्रमाणेच वाटाण्याच्या अक्षता तर लागणार नाही ना ?

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close