कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आणि प्रत्येकाच्या जिवीताचाच प्रश्न ऐरणीवर आला. कोरोना पासून वाचण्यासाठी व वाचविण्यासाठी कॉरंटाईन, सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर यांचा उपयोग नित्य नियमाने केला जाऊ लागला. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसींचा शोध लागल्यानंतर त्यांचाही उपयोग होऊ लागला. आज जगभरात जवळ जवळ ऐंशी टक्के लोकांनी या लसीचा उपयोग करत कोरोना संक्रमणापासून स्वत:ला दूर ठेवण्याची उपाय योजनाही केली. कोरोना वरील लसीचा अविष्कार होईपर्यंत सुरूवातीच्या काळात संपूर्ण जगभरात वर्षभर सर्वच व्यवहार ठप्प होते. त्याच कालावधीत क्रिडा क्षेत्रही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात लपेटलं होतं. त्याचा मोठा फटका क्रिकेटलाही बसला.
जवळ जवळ आठ महिन्यांच्या खंडानंतर महाप्रयासाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झाले. परंतु ते करताना क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला काही नवे नियम बनवावे लागले तर क्रिकेटच्या जन्मापासून सुरू असलेल्या काही प्रथा बंद करण्यात आल्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ चेंडूला चकाकी आणण्याकरीता लाळेचा ( थुंकीचा ) उपयोग करायचे. त्यावर बंदी घालण्यात आली. याच कामासाठी खेळाडूंना घामाचा वापर करण्यास मात्र मुभा देण्यात आली. पंच खेळाडूंच्या टोपी, गॉगल, स्वेटर वगैरे सांभाळायचे बंद झाले. नाणेफेकीसाठी योग्य अंतर ठेऊन दोन्ही कर्णधार, सामनाधिकारी व दूरचित्रवाणी समालोचक स्वतंत्र माईक घेऊन उभे राहू लागले. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येण्यास बंदी घालण्यात आली. मैदानाबाहेर टोलवलेले चेंडू पूर्णपणे निर्जंतुक ( सॅनिटाईज ) केल्याशिवाय पंच खेळात वापरत नाहीत. याशिवाय इतरही बरेच काही प्रतिबंध घालण्यात आले.
या शिवाय खेळाडूंना कोरोनापासून दूर ठेवण्याचा सर्वात प्रभावशाली उपाय म्हणजे बायो बबलची निर्मिती करण्यात आली. बायो बबल म्हणजे काय तर जैव सुरक्षा कवच ! बायो बबल म्हणजे एक काल्पनिक फुगा होय. खेळाडू ज्या हॉटेलात राहातात तेथे सर्व प्रकारचे कोविड- एकोणावीसच्या प्रतिबंधक साधनांचा उपयोग केला जातो. त्या बायो बबल मध्ये संबंधीत खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक सपोर्टींग स्टाफ, पंच, सामनाधिकारी व इतर महत्वाचे कर्मचारीच असतात. हे बबल अधिकृत वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चोवीस तास असते. यामध्ये बाहेरचा कोणीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही व आतलाही बाहेर जाऊ शकत नाही. या दरम्यान या सर्व व्यक्तींना लागणाऱ्या सर्व सुविधा तेथे उपलब्ध असतात. याचा अर्थ त्यांच्या जिवीताची पूर्ण काळजी घेतली जाते.
जगात सर्वत्र पुरेशा वैद्यकिय सुविधा, औषधे व सुरक्षे अभावी कोटयावधी लोक मरत असताना खेळाडूंना व त्यांच्या कुटुंबीयांना वाचविण्यासाठी संबंधीत देश कोटयावधी रूपयांचा चुराडा करत असताना काही महाभाग क्रिकेटपटू स्वतः बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालण्याच्या अनेक घटनाही घडल्या. या विघ्नसंतोषी लोकांमुळे आयपीएल स्पर्धाही स्थगित कराव्या लागल्या. काही द्विपक्षीय सामनेही रद्द अथवा स्थगित करावे लागले. या मागे खेळाडूंचा जीव वाचविणे हाच प्रमुख उद्देश होता व आहे.
देशाच्या सिमांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकालाही मिळणार नाही एवढया सुविधा या क्रिकेटपटूंना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी दिल्या जात असताना या मुजोर क्रिकेटपटूंना सुख रुतायला लागला. त्यांचा या बायोबबलमध्ये जीव गुदमरायला लागला. कोट्यावधींचे मानधन घेऊन सर्व सुविधा उपलब्ध असताना खेळाडूंना बायो बबल म्हणजे संकट वाटायला लागले. जगातल्या कोणत्याही ठिकाणापेक्षा सुरक्षित असलेल्या बायो बबलमध्ये सुखरूप असूनही खास करून भारतीय खेळाडूंच्या खेळाचा स्तर ढासाळायला लागला.
बीसीसीआयच्या अधिपत्याखाली नुकत्याच युएईत झालेल्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टिम इंडिया पाकिस्तान व न्यूझिलंड विरूध्द पराभवानंतर बायो बबलमध्ये राहून आलेल्या मानसिक थकव्याचा बहाणा पुढे करण्यात आला. या दोन संघाशिवाय भारताने नामिबिया, अफगाणिस्तान व स्कॉटलंडविरुद्ध जोरदार खेळ करत मोठे विजय मिळविले. मग त्या वेळेस ते बायो बबल मध्ये नव्हते का ? त्या वेळेस कुठे गेला होता बायो बबलमुळे येणारा थकवा ? नाचता येईना अंगण वाकडे यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.
टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आलेल्या अपयशाचे कारण सांगताना तत्कालीन मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी कोच भरत अरूण, कर्णधार कोहलीने बायो बबल व वर्क लोड (कामाचा अती ताण ) हे बिनबुडाचे बहाणे सांगितले. भारताचा संघ जितका काळ बायो बबलमध्ये राहीला जवळ जवळ तितकाच काळ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान हे प्रमुख संघ राहीले आहेत. शिवाय त्यांची कामगिरीही उच्च दर्जाची राहिली आहे. यातील द. आफ्रिका वगळता इतर चार संघ उपांत्य फेरीत गेले. ऑस्ट्रेलियाने करंडक पटकविला तर उपविजेता न्यूझिलंडही सातत्याने आयसीसी स्पर्धात यशस्वी ठरत आला आहे. मग त्यांच्या खेळाडूंना बायोबबल, वर्कलोडचा त्रास होत नाही का ?
भारतीय खेळाडूंच्या तुलनेत इतर सर्व देशांच्या क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन फारच कमी आहेत. शिवाय भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने व आयपीएल सोडून कुठलीच लिग स्पर्धा खेळत नाही तर इतर देशांचे जवळ जवळ सर्वच खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच सर्वच देशात चालणाऱ्या लिग स्पर्धा खेळत असतात. तरीही ते बबल व वर्कलोडचा बहाणा करत तर नाहीच शिवाय जिंकूनही दाखवितात.
भारतात इतर सर्वच देशांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे नऊ हजारापेक्षा जास्त खेळाडू बीसीसीआयकडे नोंदणीकृत आहे. बीसीसीआयने ठरविले तर वनडे, टि- ट्वेंटी व कसोटीच्या एका चढ एक सरस अश्या पन्नास - पन्नास टिम बनवू शकते. शिवाय देशांत असे काही गुणवान खेळाडू आहे की, ते संधीचे वाट पाहून झिजून गेले आहेत. इतकेच नाही तर लाखो खेळाडू विना मोबदला सध्या संघात आहेत त्यांच्या पेक्षा उत्कृष्ठ खेळ करू शकतात. मात्र अशा खेळाडूंना संधी दिली जात नाही व वशिल्याचे तट्टू संघात घुसवून करोडो रुपयांचा मलिदा त्यांना खिलवला जातो. त्याच बरोबर अनेक शासकीय पुरस्कार देऊन त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव केला जातो. यातील काही महाभाग तर इतके मुजोर झाले आहेत की ते देशातलं पाणी सुद्धा पित नाहीत. परदेशातून आणलेलं पाच ते सहा हजार रुपये लिटरचं पाणी पितात. यांना पॅटर्निटी लिव्ह, त्यांना वाटेल तेंव्हा सुट्टी मिळते. मग भले देशाचा संघ कितीही अडचणीत असला तरी यांना स्वतःच्या खाजगी जीवनाची आठवण येते. शिवाय त्यांचे समर्थन करणारे अनेक जण पुढे येतात. चुकीच्या लोकांची बाजू लावून धरणारेच खरे देशद्रोही आहेत.
देशाच्या रक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या सैनिकांना याच्या कितीपट मोबदला मिळतो ? त्यांना जर अशा सवलती दिल्या तर आता करतात त्याच्या पेक्षाही जीव लावून ते काम करतील. परंतु असं होईल का ? हा फार मोठा सवाल आहे.कोटयावधी रूपये ज्या मायबाप प्रेक्षकांच्या जीवावर ते कमावतात त्यांचं तर ते बिलकुल देणं लागत नसल्यासारखं वागतात. पराभूत झाल्यावर सरळ सरळ देशवासीयांची माफी मागण्या ऐवजी दात विचकत बायो बबल व वर्कलोडच्या नावाने खडे फोडतात. विशेष म्हणजे या क्रिकेटपटूंना माथाडी काम करणाऱ्या, भर उन्हात दगड फोडणाऱ्या लोकांसारखे जीवघेणे कामही करावे लागत नाही. तेंव्हा अशी फालतू बहाणे बाजी करणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने कणखर होऊन पार्श्वभागावर लथ्था प्रहार करून हाकलून देण्याची वेळ आली आहे व त्यांनी तसे प्रत्यक्षात अमलातही आणावे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

