हर्षवर्धन पाटील यांचे ३१ तासांचे बेमुदत धरणे आंदोलन यशस्वी !
- शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरु करण्याचा निर्णय
इंदापूर प्रतिनिधी :भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शेतीचा वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास ३१ तासांनी यश मिळाले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतीचा वीज बिल थकबाकी वसुलीसाठी गेली ११ दिवस बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलनाच्या यशस्वी सांगता प्रसंगी रविवारी (दि.२८) सायंकाळी इंदापूर येथे दिली. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली ११ दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. परिणामी, शेती पिकांचे मोठे नुकसान होत होते तसेच जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु करावा, या मागणीसाठी भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या महावितरण कार्यालयासमोर शनिवारी (२७) सकाळी १० वा. पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या बेमुदत आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शेतकरी सहभागी झाले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्याने प्रत्येक हॉर्सपॉवरला रु. ५०० प्रमाणे वीज बिलाची रक्कम भरावी. प्रत्येक डीपीला रक्कम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के ऐवजी ६० ते ७० टक्के एवढी असली तरी डीपी चालू करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना वीज बिलाची रक्कम जास्त आलेली असल्याने लवकरच तालुक्यात वीज बिल दुरुस्तीचे मेळावे घेतले जातील, सदर मेळाव्याची तारीख शेतकऱ्यांना कळविण्यात येईल.
तसेच कृषी संजीवनी योजनेतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीच्या अटी काढून टाकण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महावितरणचे कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांचे बरोबर आमची मुंबईत लवकरच बैठक घेतली जाईल व त्या संदर्भात शेतकर्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल. विज बिल ३ महिन्याऐवजी ६ महिन्याला द्यावे, याबाबतचा निर्णय ऊर्जामंत्र्याच्या बैठकीत घेतला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन संदर्भात वारस नोंदीही मार्गी लावण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
महावितरण कडून प्रत्येक पाच वर्षांनी प्रति हॉर्स पावरच्या बिलात वाढ केली जाते, त्यामुळे जास्त बिल वाढवले तर थकबाकीचे प्रमाणही वाढते, सदरचा निर्णय घेताना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. इंदापूर तालुक्यात गावागावांमध्ये तारांना झोळ असल्याने ऊसाचे शेतातील पीक स्पार्किंग होऊन आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तारांना आलेले झोळ काढणे, नवीन पोल टाकणे आदि कामांचे नियोजन करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्याशी सुमारे दोन ते अडीच तास चर्चा झाली. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व भाजपचे पदाधिकारी तसेच उपअभियंता रघुनाथ गोफणे, मोहन सुळ उपस्थित होते. सायंकाळी धरणे आंदोलन सांगता प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी वरील प्रमाणे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेतील निर्णयांची माहिती देताच उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. इंदापूर तालुक्यातील शेतीचा वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याने गेली 11 दिवस संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चौकट :-
====
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचा आंदोलनास पाठिंबा!
---------------------------------------
या बेमुदत धरणे आंदोलन प्रसंगी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दूरध्वनी करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला.
____________________________

