शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्थेच्या चार संचालकांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. २६) अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील हजर केले असता ता. २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात गेली आहे. हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये यामध्ये आडकले आहेत. पैसे परत मिळण्यासाठी या ठेवीदारांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदारांनी नुकतेच अर्धनग्न (शर्ट काढून) आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाने आरोपी संचालकांच्या मागावर होते.आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी (ता.२६) आरोपींच्या अटकेची विशेष मोहिम राबविली. पतसंस्थेच्या संचालिका लतिका नंदकुमार पवार, सुभाष विद्याधर रेखी, लक्ष्मण सखाराम जगताप, प्रकाश नथुजी सोनवणे यांचा अटक करण्यात आली. या चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आरोपींच्या वतीने पोलिस कोठडी देऊ नये, असा बचाव करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. काही आरोपींची प्रकृती खराब आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे.सरकारतर्फे ऍड. अर्जुन पवार यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. या गुन्ह्यातील काही कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे. आरोपींचा गुन्हा हा समाजहिताविरुद्धचा आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून ता. २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

