एकेकाळी न्यूझिलंडच्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणीही फारसी किंमत देत नव्हते. मागील काही आयसीसी स्पर्धांचा इतिहास तपासला तर ते सातत्याने उपांत्य फेरीत पोहोचायचे पण विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न तोकडे पडायचे. मात्र सन दोन हजार पंधराच्या मायदेशात झालेल्या वनडे विश्वचषकात त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारून तमाम क्रिकेट विश्वाला पुढील धमाक्याचा जणू इशाराच दिला होता !
सन दोन हजार एकोणावीसच्या वनडे विश्वचषकात अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध मुळ सामना टाय झाल्यानंतर दोनदा सुपर ओव्हरमध्येही त्यांनी इंग्लंडला बरोबरीत रोखले, परंतु सर्वाधिक बाऊंड्रीज मारण्याच्या किचकट तांत्रिक नियमाने त्यांचा घात केला व विजेतेपद सोडा संयुक्त विजेतेपदही त्यांना मिळाले नाही. उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागलेल्या न्यूझिलंडने त्यानंतर मनाशी खूणगाठ बांधून भविष्यात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवायचेच याचा जणू चंगच बांधला !
चालू वर्षात जून महिन्यात कसोटी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारताला चारीमुंडया चित करुन कसोटीचे पहिले विश्वविजेते होण्याचा मान मिळविला. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझिलंडला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता.
सध्या युएईत सुरू असलेल्या सातव्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतही भारत व इंग्लंड विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असताना तसेच पाकिस्तानने घेतलेली गगनभरारी बघता न्यूझिलंडला कोणीही किंमत देत नव्हते. अशात त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या मर्यादित स्त्रोतांच्या आधारे व्यवस्थित व नियंत्रीत खेळ करत पाकिस्तान विरूध्दचा साखळी सामना वगळता प्रत्येक सामन्यात विजय मिळवून आपल्या अपेक्षित उद्दीष्टाकडे आगेकूच सुरू केली आहे. या दरम्यान किवीज संघाने आपला नवा क्रिकेटींग दुश्मन टिम इंडियाला साखळी सामन्यातच हरवून उपांत्य फेरीत पोहोचण्याचा भारताचा मार्गच बंद करून टाकला. तर वेळोवेळी त्यांच्या मार्गात अडथळा बनणाऱ्या इंग्लंडचाही उपांत्य फेरीत काटा काढून विजेतेपदाकडे वाटचाल केली आहे.
जेमतेम पंचावन्न लाखाची लोकसंख्या असलेल्या न्यूझिलंडने क्रिडा क्षेत्रात विशेष प्रगती केली असून आपल्या शांत, संयमी व विजिगुषी स्वभावाने प्रतिपक्षाचीही सहानुभूती मिळविण्याची कला साध्य केल्याने त्यांचे कोणी दुश्मन बनण्याचे कारणच नाही. इतकेच नाही तर मैदानातही ते इतर संघ वापरतात ते स्लेजिंगचे अघोरी प्रकारही करताना दिसत नाहीत. स्वतः शिस्तीत राहून समोरच्याचे मन व सामना जिंकणे हेच साधे व सोपे सुत्र त्यांनी अंगिकारल्याने आज विजेतेपदं त्यांच्याकडे स्वतः होऊन चालत येत आहेत.
सतत नविन शिकण्याची आस असलेले न्यूझिलंडचे क्रिकेटपटू जगातील सर्वच लिग स्पर्धात खेळताना दिसून येतात. त्याचाच भाग असलेल्या जगातील सर्वात मोठया व लोकप्रिय असलेल्या आयपीएलला जणू त्यांनी माहेरघरच बनविले. त्यांचे सर्वच प्रमुख खेळाडू आयपीएल खेळतात. साहजिकच त्यांना त्यातून आर्थिक लाभ होतोच. परंतु आयपीएलच्या माध्यमातून त्यांनी भारतात व युएईत खेळण्याच्या अनुभवाचा मोठा फायदा उठविला आहे. शिवाय आपल्या गोड स्वभावाने त्यांनी भारतीय खेळाडूंशी जवळीक साधून त्यांच्याशी मैत्री वाढविली. भारतीय खेळाडूंसोबत राहून त्यांच्या स्वभावाचा बारकाईने अभ्यास केला. नेटमध्ये सराव करून भारतीय खेळाडूंच्या चांगल्या - वाईट गुणांचे निरीक्षण केले. मग त्यानंतर भारतीय खेळाडूंच्या त्याच अभ्यासाचा लाभ उठवित आपल्या टिम मिटींगमध्ये भारतीय खेळाडूंच्या विक व प्लस पॉईंटवर काम करत आयसीसीच्या स्पर्धात भारताला ते जगाच्या पाठीवर कुठेही हरवू लागले.
कोविड-१९ च्या संक्रमणाचा त्रास न्युझिलंड संघालाही बसला आहे. तेही क्रिकेटसाठी जगभर भ्रमंती करत असून जैव सुरक्षा कवच ( बायो बबल ) मध्ये त्यांचेही खेळाडू सातत्याने राहात असून बायो बबलच्या त्रासाचा त्यांनी कुठेही डांगोरा पिटला नाही. तसेच आपल्या मानसिकतेवर व खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री सारखे कुठलेही बहाणे न देता आपले विजय अभियान सुरूच ठेवले आहे.
शिवाय रवी शास्त्री व त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक मंडळी आयपीएल व विश्वचषका दरम्यान मोठे अंतर असायला हवे होते, जेणे करून टिम इंडिया चांगले प्रदर्शन करू शकली असती असे पराभवानंतर सांगतात तसे न्यूझिलंड संघ कोणतेही नाटक करताना दिसत नाही. उलट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. कदाचित ते विजेतेपदही मिळवतील.
न्यूझिलंडकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु भारतीय संघाने प्रत्येक वेळी त्यांना कमी लेखण्याचीच चुक केली आणि दरवेळेस ती भारताच्या चांगल्या प्रकारे अंगलट आली आहे. तरी अजून वेळ गेली नाही. आता टिम इंडियात नवे प्रशासन आल्यामुळे कदाचित शास्त्री व चमूने केलेल्या चुका दुरूस्त होतीलही. पण आता न्यूझिलंडचा रोखण्याचा परमनंट ईलाज करण्याची वेळ आली आहे एवढे मात्र नक्की !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

