सातव्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील केवळ दुसऱ्या सामन्यानंतर यजमान भारताचे आव्हान संपल्यासारखेच आहे. सलामीचा सामना पाकिस्तानविरूध्द नामुष्कीमयरित्या हरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर नेहमीचा कर्दनकाळ ठरलेल्या न्यूझिलंडविरूध्द भारत झालेल्या चुकांतून काही तरी शिकेल व विजय मिळवून स्पर्धेतील आपले आव्हान टिकवेल अशी साधी सुधी अपेक्षा तमाम क्रिकेट रसिकांची होती. पाकिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर भारताने अनेक सराव सत्र, विचारमंथन, करमणुकीचे सर्व प्रकार केले. संघात बदलही केले. इतकेच नाही तर गेले कित्येक महिने या विश्वचषकाची संघ बांधणी केली असता ऐनवेळी फलंदाजांचे क्रम बदलूनही पाहीले. तरीही भारतीय संघाने न्यूझिलंड विरुद्ध सुरू असलेली आयसीसी स्पर्धातील पराभवाची मालिका अबाधीत राखली.
न्यूझिलंडविरूध्द भारतीय फलंदाजांनी अनेक डॉट चेंडू खेळले. खराब फटके मारून विकेट फेकल्या. संघाच्या शंभर धावा विसाव्या षटकात पूर्ण झाल्या. संघातील एकाचढ एक नावाजलेले फलंदाज किरकोळीत बाद झाले. फलंदाजांचे हे अपयश संघाच्या पराभावाचे प्रमुख कारण असले तरी पाकविरूध्द दहा व न्यूझिलंड विरूध्द आठ गडयांनी हार स्विकारवी लागली. याला जगातील सर्वात बलाढय गोलंदाजांचा ताफा गणल्या जाणाऱ्या भारतीय गोलंदाजांचे अपयशही तितकेच कारणीभूत ठरले.
पाकविरूद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पराभूत मानसिकतेनेच या सामन्यातही उतरल्याचे त्यांचे खांदे पडलेल्या देहबोलीवरून जाणवले. नाणेफेक हरताच सामनाही हरल्याची खात्री झाल्यासारखे भारतीय फलंदाज खेळले. न्यूझिलंडच्या गोलंदाजीत कुठलीही दहशत नव्हती. तरीही भारतीय फलंदाज भयभित झाल्यासारखे खेळले. दुबईच्या मोठया मैदानात एकेरी दुहेरी धावा घेण्याची गरज असताना फलंदाज सुरुवातीला डॉट चेंडू जास्त खेळले. त्यानंतर दबावात येऊन मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. मग गोलंदाजांना धावांचं पाठबळ नसलेल्या या सामन्यात न्यूझिलंडच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवता आले नाही व किवीजने आरामात सामना खिशात टाकला.
या स्पर्धेत नाणेफेकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. कारण सामन्याच्या दुसऱ्या डावात मैदानात दव पडत असल्याने गोलंदाजी करणे अवघड जाते. त्यामुळे दुसरी फलंदाजी करणारे संघच सामने जिंकत आले आहेत. त्यात दुर्देवाने कर्णधार कोहली दोन्ही वेळा नाणेफेक हरला. हि बाब भारतीय संघाला स्पर्धेतील आव्हान संपण्यापर्यंत घेऊन गेली.
गतविजेता विंडीज संघ मोठे फटके मारण्यात जगप्रसिद्ध आहे. मात्र या स्पर्धेत त्यांच्या फलंदाजांनीही सिंगल डबलवर भर देण्याऐवजी मोठे फटके खेळून स्वतःवर संकट ओढवून घेतले आहे. ही बाब भारतीय फलंदाजांना माहिती असताना त्यांनी या सामन्यात तब्बल नऊ षटके ( चोपन्न चेंडू ) निर्धाव खेळले. त्यामुळे भारताची धावसंख्या फक्त एकशे दहा पर्यंतच मर्यादित राहीली. कोहली, रोहीत, ईशान, राहुल, हार्दिक, जडेजा, पंतसारखे रथी महारथी फलंदाज जास्त डॉट चेंडू खेेळल्यानंतर मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. त्यामुळे सँटनर, सोढीसारखे साधारण गोलंदाज वरचढ ठरले.
भारताची संघ निवड नेहमी प्रमाणे या सामन्यातही वादग्रस्त ठरली. सुर्यकुमार यादव पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र यात कितपत तथ्य आहे हे संघ प्रबंधनच जाणो ? अनफिट हार्दिक पांडयाचे लाड अजूनही चालूच आहेत तर अनुभव शुन्य भित्र्या वरूण चक्रवर्तीला खेळवून पुन्हा एक चुक केली. अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विनला संघाबाहेरच ठेवले तर टि ट्वेंटीचा प्रमुख फिरकीपटू यजुवेंद्र चहलच्या ऐवजी संघात घेतलेल्या राहुल चहारला देखील न खेळवून मॅनेजमेंटने महाचूक केली. तर संघात आलेले ईशान किशन व शार्दूल ठाकूर सफसेल फेल गेल्याने संघाची मोठी कुचंबणा झाली. कर्णधार कोहली या सामन्यात तर बिघडलेल्या काँम्पूटरसारखाच दिसत होता. कमी धावसंख्येच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये आपल्या प्रमुख गोलंदाजांना गोलंदाजी देणे गरजेचे असताना आपल्या उभ्या कारकिर्दीत पॉवर प्लेमध्ये कधीही गोलंदाजी न केलेल्या व गेली सहा महिने गोलंदाज म्हणून संघावर भार बनलेल्या रवींद्र जडेजाला गोलंदाजी देऊन कोहलीने स्वहस्ते सामनाच न्युझिलंडला बहाल केला. अनुभवी मोहम्मद शमीचा पॉवर प्लेमध्ये वापर करणे गरजेचे होते. शिवाय वरूण चक्रवर्ती अजुन पोरकट असल्याचे किवीज फलंदाजांनी सिद्ध केले. कोहली कर्णधार म्हणून पुर्णपणे निष्प्रभ ठरत असताना त्याच्यातील फलंदाजही संपल्यासारखे वाटले.
रवी शास्त्रीसारखा प्रशिक्षक व महेंद्रसिंग धोनीसारखा मेंटॉर संघासोबत असतानाही भारताची झालेली मानहानीकारक पिछेहाट सामान्य क्रिकेट रसिकांच्या जिव्हारी लागली असून पुढील तीन सामने जिंकूनही भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता नाही. यासाठी भारताला स्वतःची अतिशय कमजोर असलेली धावगती वाढवावी लागणार आहे. शिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे.
सद्य परिस्थितीचे अवलोकन करताना या स्पर्धेत तरी भारताला उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता दिसत नाही. तूर्त तरी भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपल्या सारखेच दिसते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

