शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०८ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
राज्यातील अहमदनगरसह पुणे, नागपूर, अमरावती, सागली, जालना या जिल्ह्यांमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे.
अहमदनगर शहरातील तारापूर आगारात आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. तारकपूर आगारासह जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा येथील राज्य वाहतूक महामंडळाची एकही बस त्याच्या आगारातून बाहेर पडलेली नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
वाहक आणि चालक यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून शासन किंवा न्यायालय कोणताही निर्णय घेऊ किंवा कोणतीही कारवाई करू मात्र जो पर्यंत विलीनीकरण करण्याचा निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन कायम राहील असे सांगण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.
अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद आहेत. बंद मध्ये 1500 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाल्याची माहिती मिळत असून जिल्ह्यातील 350 बस पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर धावत आहेत. ऐन दिवाळीच्या सणात बंद पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अंबडमधील एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून सांगली मिरज मध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.
पुणे जिल्हात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले. स्वारगेट ,शिवाजीनगर ,भोर ,बारामती बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उस्मानाबादेत एस.टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कळंब वगळता जिल्ह्यातील एक ही बस डेपोबाहेर आली नाही.
या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. या संधीचा अनेकांनी फायदा उठविण्यास सुरवात केली असून जादा भाडे आकारण्यास सुरवात केली आहे. काही खासगी वाहतूकगारांनी तर लहान मुलांचे पूर्ण तिकिट आकारण्यास सुरवात केलेली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

