दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला पहिला कसोटी सामना पाहुण्या भारतीय संघाने पाचव्या दिवशी जरी जिंकला असला तरी पावसाने वाया घातलेला वेळ बघता हा विजय जेमतेम सव्वातीन दिवसातच मिळाला. भारताने उपहारानंतर अवघ्या दहा मिनिटात दक्षिण आफ्रिकेचे उर्वरीत तीन फलंदाज तंबूत धाडले आणि एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. हा विजय ऐतिहासिक यासाठी म्हणावा लागेल की सेंच्युरियन मैदानावरचा हा भारताचा पहिलाच कसोटी विजय होय. कारण सेंच्युरीयनचे मैदान आफ्रिकेचा बालेकिल्ला असून येथे यजमान संघाला हरविण्यास पाहुण्या संघांना सातत्याने अपयश आले आहे.
शिवाय भारताने या वर्षी ऑस्ट्रेलियाचा गाबाचा बालेकिल्लाही उध्वस्त केला होता. शिवाय मेलबोर्नचा बॉक्सिंग डे कसोटी सामनाही खिशात घातला होता. त्यानंतर इंग्लंडला मायदेशात लोळविले तर इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी कोरोनामुळे स्थगित झाला तेव्हा दोन - एक आघाडी घेतली होती. लॉर्डस आणि ओव्हल येथे हरविले. तर मायदेशात न्यूझिलंडलाही पराभूत केले. त्यामुळे भारताला यंदा कसोटीत मोठे यश मिळाले. आठ विजय, दोन पराभव व दोन अनिर्णित अशी कामगिरी केल्याने भारत यंदा सर्वाधिक कसोटी जिंकणारा संघ बनला. मात्र भारताच्या या विजयाला गालबोट लागले ते वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपच्या फायनलच्या पराभवाने टि ट्वेंटी विश्वचषकातील साखळीतच संपलेल्या आव्हानामुळे.
भारताचा संघ क्रिकेटच्या प्रत्येक प्रारूपात द्विपक्षीय मालिका मग ती मायदेशात असो वा परदेशात आरामात जिंकतो, मात्र आयसीसीच्या स्पर्धात पचकतो. यामुळे विराट कोहलीचे वनडे व टि ट्वेंटीचे नेतृत्वही गेले. त्यानंतर बीसीसीआय व विद्यमान कसोटी कर्णधार कोहलीचे संबंध विकोपाला गेल्याने या मालिकेतील विजयावर कोहलीचे बरेच काही भवितव्य अवलंबून आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी लोकेश राहुलने ठोकलेले शतक, मयंक अग्रवाल सोबत त्याने केलेली शतकी भागीदारी, अजिंक्य राहाणेच्या ४८ धावा व कोहलीच्या ३५ धावा भारताला मजबूती देण्यास पुरेशा ठरल्या. मात्र दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने खेळाची दिशा बदलली.आफ्रिकेच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा लाभ उठविला, पण त्याच्यापेक्षाही वातावरणाचा अचूक फायदा मोहम्मद शमी, बुमराह, सिराज, ठाकूरने उठविला. त्यामुळे आफ्रिका दोन्ही डावात दोनशेच्या आत गडगडले. मात्र पहिल्या दिवशीची भारतीय सलामीवीरांची शतकी सलामी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. भारताचा दुसरा डावही लवकर आटोपला होता. या विजयामुळे आफ्रिकेत प्रथमच मालिका जिंकण्याच्या भारताच्या अभियानाला बळ मिळाले.
कागदोपत्री विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला असून त्याच्या नेतृत्वात यंदा भारताने इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेत विजय मिळविले. मात्र ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणाऱ्या संघात तो नव्हता. अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात भारत तेथे जिंकला होता. तत्पूर्वी सन २०१८-१९ मध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरविले, श्रीलंका, वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकल्या. त्यामुळे काही क्रिकेट पंडितांनी कोहलीला भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार ठरवून टाकले तर या पूर्वी परदेश दौऱ्यावर गेलेल्या सर्वच कर्णधारांना तुच्छ लेखण्यास सुरूवात केली.
वास्तविक पाहता पूर्वीचे कर्णधार मोहम्मद अझरूदीन सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी व आधीच्या कर्णधारांच्या काळात आजच्या इतके तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. भारताकडे परदेशात विजय मिळवून देणारे जलदगती गोलंदाज नव्हते. त्या तुलनेत फलंदाज चांगले होते. मात्र विरोधी संघाकडे एकाचढ एक वेगवान गोलंदाज तयार असल्याने भारतीय फलंदाजांना परदेशात त्यांचा सामना करणे नेहमी आव्हानात्मक ठरले.
नेमके कोहली जवळ असलेली वेगवान गोलंदाजांची फौज जगातल्या सर्व संघांपेक्षा सरस असल्याने त्याला परदेशात विजय मिळविणे सोपे जात आहे. मागच्या काळातील फलंदाजांच्या तुलनेत आताचे फलंदाज काहीसे कमजोर आहेत, तरीही वेगवान गोलंदाज त्यांचे अपयश भरून काढत विरोधी संघांच्या फलंदाजांचा त्यांच्याच देशात फडशा पाडत आहेत. त्याचबरोबर मागील काही वर्षात वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे संघ तुलनेने बरेच कमजोर झाल्याने त्यांना त्यांच्या देशात जाऊन हरविणे कोहलीला सोपे जात आहे. न्यूझिलंडचेच बघा आज तोच एकमेव संघ भारताच्या तोडीस तोड आहे. त्या न्युझिलंडला तेथे जाऊन हरविणे सोडाच इतर देशातही भारत त्यांना हरवू शकला नाही. याचे उदाहरण डब्ल्यूटीसी फायनल मध्ये इंग्लंडला आपण पाहिलेच आहे. शिवाय नुकत्याच भारतात झालेल्या पहिल्या कसोटीत किवीजने भारताच्या तोंडातला घास ओढला होता. भले त्या सामन्यात राहाणे कर्णधार होता, म्हणजे याचा अर्थ सरळच आहे की कोहली कर्णधार म्हणून कितीही मोठा सांगितला जात असला तरी तुल्यबळ संघाविरूध्द शंभर टक्के यशस्वी झालेला नाही. त्यामुळे जुन्या संघ अथवा कर्णधारांना कमी लेखने साफ चुकीचे आहे.
येथे कोहलीचे महत्व कमी करण्याचा उद्देश नाही तर जुन्या कर्णधारांनाही तत्कालीन परिस्थितीनुसार सन्मान मिळणे गरजेचे असल्याचे सांगावयाचे आहे. सारासार विचार केला तर सरत्या वर्षात भारताने काबील ए तारीफ कामगिरी केली याबद्दल कुठलेच दुमत नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

