शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१
श्रीरामपूर : शहरात आज सकाळी मोरगे वस्ती परिसरात बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाचे अधिकारी आणि श्रीरामपूर पोलिसांनी एकत्र येत पकडले. बिबट्याला पकडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रविवारी सकाळपासून अनेकांवर हल्ला करून बिबट्याने जखमी केले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ७ मधील कॅनॉलच्या कडेला असलेल्या मोरगे वस्ती परिसरातील सदावतें हॉस्पिटलच्या मागे बिबट्या भर लोकवस्तीत घुसला. काहींनी बिबट्या लोकवस्तीत घुसल्याचे पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात आरडाओरडा, दहशत निर्माण झाली. बिबट्या या बोळीतून त्या बोळीत या गल्लीतून त्या गल्लीत सापडेल त्या आडोशाच्या ठिकाणी घुसत होता. पाहता पाहता ही वार्ता शहरात पसरली. त्यामुळे मोरगे वस्ती परिसरात मोठी गर्दी जमली. बिबट्या नेमका कोठे घुसला हे समजत नव्हते.
परंतु, मध्येच बिबट्या आल्याचे लोक म्हणत असल्याने जमलेला जमाव पळत सुटायचा. त्यामुळे अनेकजण एकमेकांच्या अंगावर पडून किरकोळ जखमी झाले. अनेक जणांच्या गाड्या बिबट्या आल्याच्या आवाजाने खाली पडल्या. सुमारे तासभर बिबट्या आला... इकडे गेला...तिकडे गेला... घरात घुसला... अशा एक ना अनेक प्रकारच्या उपस्थितांच्या चर्चेमुळे परिसरात मोठी हुल्लडबाजी पहायला मिळाली.
ब-याच वेळ हा प्रकार सुरू असताना नंतर पोलीस गाडी तेथे आली. दुपारी वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. बिबट्याला इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न वनाधिकारी करीत होते. त्यासाठी जाळी लावून त्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेरीस शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाचे अधिकारी आणि श्रीरामपूर पोलिसांनी एकत्र येत पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अशाच प्रकारे श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव पवार वस्ती व परिसरात बिबट्या व त्याचे बछड्याचे वास्तव्य वर्षा दोन वर्षापासून दिसत असून अनेक वेळा लोकप्रतिनिधी व वनखात्याचे अधिकारी कर्मचारी यांना कळविले तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याची व पिंजरा लावत नसल्याची तक्रार तेथील रहिवासी रवींद्र पवार यांनी केली. एखादे वेळेस मनुष्यहानी झाल्याचे निदर्शनास आल्यावर वनखात्याला जाग येईल असे वाटत होते. तसाच प्रकार आज घडला; यात चार ते पाच जण जख्मी झाले व वनखात्याने उशिरा का होईना पण मोरगे वस्तीवर धाव घेतली व पिंजरा आणण्यात आला. आता त्याला दूर सोडतात की जवळच दहा पंधरा मैलावर सोडतात याची नागरिकांना शंका वाटते. शुक्रवारी रात्री १०:३० वाजता शिरसगाव माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही हे दुर्दैव. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा अशी मागणी असताना पिंजरा लावल्या जात नाही. पिंजरा लावला असे दर्शवायचे. इतर ठिकाणी मागणी आली की हाच उचलायचा तिकडे न्यायचा त्यामुळे दहशत ही कायमची वर्ष दोन वर्षापासून आहे., असे नागरिक बोलत आहे. एखाद्या आंब्याखाली बिबट्या बसलेला दिसतो, असे असताना कोणी गांभीर्याने दखलच घेत नाही याकडे पालकमंत्री, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनी लक्ष घातल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, दहशतीची भीती दूर होईल. यासाठी संबंधिताना सूचना द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

