शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१
हवामान बदलामुळे शेतीमध्ये येणार्या संकटांवर संरक्षित शेती तंत्रज्ञान फायद्याचे - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील.
राहुरी : हवामान बदलाचा परिणाम दिवसेंदिवस वाढत असून त्याचा सर्वात जास्त परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. अवकाळी पाऊस तसेच वातावरणातील कमी अधिक तापमान यामुळे शेती आणि शेतकरी संकटात आलेले आहेत. यावर राहुरी कृषि विद्यापीठाने तयार केलेले संरक्षित शेतीमधील तंत्रज्ञान फायद्याचे राहिल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकरीता संरक्षित शेती तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम राहुरी कृषि विद्यापीठात आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील ऑनलाईन मार्गदर्शन करतांना बोलत हाते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज कुमार (भा.प्र.से.) हे ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे फलोत्पादन संचालक डॉ. के.पी. मोते, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, अहमदनगर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार व जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी प्रमुख डॉ. नरेंद्र फिरके उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ. पाटील मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे खुप मोठे नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विद्यापीठाने द्राक्ष पिकासाठी 4 लाख 22 हजार रुपयांचा शेडनेटगृह तंत्रज्ञानाचा आराखडा तयार केलेला आहे. त्याचा द्राक्ष बागायतदारांना निश्चितच लाभ होणार आहे. यावेळी आपल्या प्रास्तविकात डॉ. के.पी. मोते म्हणाले की संरक्षित शेती ही काळाची गरज असून शेतकर्यांसाठी शेडनेटगृह तसेच हरितगृहाच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रशिक्षकांना या एक दिवसीय प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे. डॉ. शरद गडाख आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की भारतात संरक्षित क्षेत्राखाली 2 लाख 16 हजार हेक्टर क्षेत्र तसेच महाराष्ट्रामध्ये 16,543 हेक्टर क्षेत्र आहे. संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान वापरुन शेतकरी वर्षभर भाजीपाला, फुले तसेच फळांचे उत्पादन घेऊ शकतात. यामुळे तापमान नियंत्रित करता येवून किड व रोगांपासूनही बचाव करता येतो. याप्रसंगी डॉ. प्रमोद रसाळ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी झालेल्या तांत्रिक सत्रात हरितगृह तसेच शेडनेटगृह या विषयावरील विविध मुद्द्यांवर अहमदनगर येथील विषय तज्ञ इंजि. संदिप डेरे, डॉ. सुनिल गोरंटीवार, राज्यस्तरीय तंत्र सल्लागार इंजि. सचिन मोरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणेचे प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या प्रक्षेत्र भेटीमध्ये डॉ. नरेंद्र फिरके, डॉ. उल्हास सुर्वे व देहरे येथील अॅग्रोव्हिजन ग्रीनहाऊस कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालक वैभव खांडरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले तर आभार अहमदनगरचे कृषि उपसंचालक रविंद्र माने यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी राज्यातील 90 विभागातील उपविभागीय कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी अहमदनगरचे उपविभागीय कृषि अधिकारी जी.आर. कापसे, राहुरी तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, तंत्र सहाय्यक संग्राम भिंगारदिवे, इंजि. मोहसिन तांबोळी व डॉ. मंगेश बावीस्कर यांनी सहकार्य केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

