शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
मुंबई : सन २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे पुस्तकाचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक धोरण आखले असून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्याचा विचार आहे.
सुरुवातीला हा बदल इयत्ता पहिलीसाठी
या योजनेमुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझं कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल. त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय – इंग्रजी, मराठी, गणित तसंच खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले जाणार आहेत. प्रत्येक विषयाचं पाठ्यपुस्तक वेगळं घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग १, २, ३ किंवा ४ असे फक्त एक पाठ्यपुस्तक असणार आहे.
जिल्हा परिषद शाळांकडून स्वागत
दुर्गम भागातील मुलांसाठी, जिथे शाळा खूप दूर आहेत आणि विद्यार्थ्यांना जड पिशव्या घेऊन लांब अंतर चालावे लागते. पिशवीचे वजन कमी झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. हा बदल २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील प्राथमिक वर्गासाठी हे धोरण लागू केले जाईल. नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक बदल करण्यात येतील.
नव्या पद्धतीमुळे वजन कमी होणार
सध्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे ६ वर्षांचा आहे, एका अंदाजानुसार त्याच्या बॅगेत किमान ८३० ग्रॅम इतके पाठ्यपुस्तकांचे वजन असते. यामध्ये पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे वजन जोडल्यास बॅगेचे वजन १ किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन २१० ग्रॅमपर्यंत कमी होईल.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

