भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरीयन पार्कवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारत सदृढ परिस्थितीत होते. शिवाय शतकवीर केएल राहुल व नव्याने आत्मविश्वास प्राप्त झालेला अजिंक्य राहाणे चांगल्या खेळीनंतर नाबाद होते. रात्रीचा आराम व चांगल्या मुडमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करून वैयक्तिक सुंदर खेळाशिवाय भारतीय डावाला चांगल्या पैकी आकार देऊन संघाला मजबूती देतील अशी साधी सोपी आशा प्रत्येकाचीच होती.
परंतु निसर्गाच्या मनात जणू काही वेगळंच होतं. दुसऱ्या दिवसाची सुरुवातच जोरदार पावसाने व नंतर उघडछापीसह पुन्हा एकदा पावसाने मैदानाचा ताबा घेतला व भारतीय संघाच्या संपूर्ण प्लॅनचाच बट्टयाबोळ केला. दुसरा दिवस एकही चेंडूचा खेळ न झाल्याने पावसापासून सुरक्षित राहाण्यासाठी खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली. तरीही पावसाचे नैसर्गिक पाणी खेळपट्टीत मुरलेच होते. शिवाय खेळपट्टी प्लॅस्टिक कव्हर्सने झाकून ठेवल्याने आतल्या बाजूला ताडपत्रीला आलेला घामही खेळपट्टीला ओलसर ठेवण्यात महत्त्वपूर्ण झाला.
अखेर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि कोणाच्याही ध्यानी मनी नसलेली व पहिल्या दिवशी साफ निष्प्रभ ठरलेली आफ्रिकन गोलंदाजी एकदम धारदार बनली व बघता बघता भारताचा डाव अनपेक्षीत रित्या कोसळला. जेथे चारशे -पाचशे धावांचे स्वप्न रंगविले जात होते तिथे तीनशे सत्तावीस धावाच पदरी पडल्याने भारतीय गोटात निराश पसरली होती. मात्र भारताच्या जलदगती गोलंदाजांनी कुठलीही निराशा न करता आपल्या लौकीकाप्रमाणे कामगिरी करत भारताचे आव्हान जिवंत ठेवले.
तत्पूर्वी केएल राहुल केवळ एका धावेची भर घालून परतला तर अजिंक्य राहाणे अर्धशतकापासून दोन धावा दूरच राहीला. रिषभ पंतने नेहमी प्रमाणे अपेक्षा भंग केला. मात्र भारताच्या सर्वच गोलंदाजांनी फलंदाज म्हणून आपल्या डावाची चौकार ठोकून सुरुवात केली हे जरा वेगळंच वैशिष्टये ठरलं. परंतु कोणीही मोठी खेळी केली नाही. लुंगी एंगिडीने भारताचे सहा मोहरे टिपले तर त्याला कागिसो रबाडाने तीन व मार्को जेनसनने एक बळी घेत मोलाची साथ दिली.
फलंदाजांनी जरी अपेक्षा भंग केला असला तरी गोलंदाजांनी आफ्रिकेच्या डावाला दोनशेच्या आत गुंडाळून भक्कम आघाडी घेतली. जसप्रित बुमराहा घोटयाच्या दुखापतीने एकशे आठ मिनिटं मैदानाबाहेर जरी होता तर मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर व मोहम्मद सिराजने आपली जबाबदारी योग्य प्रकारे निभावली. नंतर बुमराहा मैदानात परतला. मात्र एखादा खेळाडू कोणत्याही कारणास्तव पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर गेल्यास त्याला मैदानात आल्यानंतर तो जितका वेळ मैदानाबाहेर होता तितका वेळ गोलंदाजी करता येत नाही. बुमराहालाही हा नियम लागू पडला. दुखापत होण्यापूर्वी त्याने आफ्रिकेच्या डावाला भगदाड पाडून दिले होते व परत आल्यानंतर त्यांचा डावही त्यानेच मिटविला.
या दरम्यान मोहम्मद शमीने आग ओकत पाच बळी घेताना आपला कसोटी बळींचा आकडा दोनशेवर पोहचविला. अशी भन्नाट कामगिरी करणारा तो पाचवा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. शार्दूल ठाकूरनेही आपला गोल्डन आर्म कायम राखत क्विंटन डिकॉक व मार्को जेनसनचे बळी संघाला गरज असताना मिळवून देत आपली उपयुक्तता सिद्ध केली.
एकशे तीस धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला. मात्र मयंक अग्रवाल पहिल्या डावासारखा न खेळल्याने भारताच्या डावाला खिंडार पडले. दिवसअखेर रात्रीचा रखवालदार शार्दूल ठाकूर व लोकेश राहुल नाबाद होते. सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाची शक्यता असल्याने चौथ्या दिवशीच भारतीय फलंदाजांना भरीव धावसंख्या गाठावी लागणार असून उर्वरीत वेळेत दक्षिण आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळत विजय मिळविण्याची अवघड कामगिरी भारताच्या गोलंदाजावर असणार असून टिम मॅनेजमेंटला पाऊस व परिस्थिती यांचा ताळमेळ राखत सामना हातातून निसटणार नाही हे डोळ्यात तेल घालून बघावे लागणार आहे हे मात्र नक्की !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

