यावर्षीचा दर्पणकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार,
तर प्रतापराव सासवडे यांना आदर्श वर्तमानपत्र विक्रेते पुरस्कार जाहीर
बीड (प्रतिनिधी) - दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्यावतीने मराठी पत्रकारितेचे जनक,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी दिली.
यावर्षीचा दर्पणकार पुरस्कार बीडचे ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार यांना जाहीर झाला आहे.तर वर्तमानपत्र विक्रेते प्रतापराव सासवडे यांना आदर्श आदर्श वर्तमानपत्र विक्रेते पुरस्कार जाहीर झाला असून या दोन्ही पुरस्कारार्थीना मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल, श्रीफळ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजकार्य करणार्या अनेक मान्यवरांना देखील पत्रकार संघाच्यावतीने याप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी दर्पण दिनानिमित्त प्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांच्या लाईव्ह बासरीचे आयोजन केले आहे. तसेच पत्रकारांसाठी मोफत लायसन कॅम्प देखील घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आणि दिनांक ६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मराठवाड्यामध्ये यावर्षी दर्पण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले,
बीड येथे १ जानेवारी रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल बारकुल यांच्या हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी विनामूल्य हृदय तपासणी, बी.पी. व शुगर तपासणी करण्यात येणार आहे.याची वेळ सकाळी १०:३० ते १२:३० राहणार आहे. २ जानेवारी रोजी स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान संचलित आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर,जालनारोड बीड येथे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे, ३ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान बीड जिल्हा सरकारी रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी पत्रकारांसाठी आयोजित केली आहे, ६ जानेवारी रोजी दर्पण दिन पुरस्कार सोहळा स. मा. गर्गे भवन,नाट्यग्रह जवळ, बीड येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
दर्पणदिनाचे औचित्य साधून याच ठिकाणी सकाळी १० ते ११ दरम्यान प्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांचे सुमधुर बासरी वाद्य लाईव्ह होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पण दिन सोहळा आणि दर्पणकार पुरस्काराचे शानदार वितरण होणार आहे. यावर्षीचे दर्पणकार पुरस्काराचे मानकरी दैनिक युवासोबतीचे ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार ठरले आहेत,तर आदर्श पेपर विक्रेते म्हणून यावर्षी प्रतापराव सासवडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर बीड जिल्ह्यातील वंचित,उपेक्षित,पीडित यांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या समाज हितचिंतक तसेच गोमाता, वन्य पशुपक्षी आणि गोरगरिबांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या समाज सेवकांना देखील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत मोटर वाहन लर्निंग लायसन कॅम्प या ठिकाणी आरटीओ यांच्या सौजन्याने होणार आहे. या संपूर्ण सप्ताहातील उपक्रमास आणि दर्पण दिन सोहळ्यास बीड जिल्ह्यातील तमाम पत्रकार, पत्रकार हितचिंतक, प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, प्रत्यक्ष सहभागी होऊन हा उपक्रम आणि दर्पण दिन कार्यक्रम ऐतिहासिक करावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

