shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सहकाराच्या पायावर उभा... "आपला भारत, समृद्ध भारत"..! पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे सुवर्णमय योगदान..!!


     महात्मा गांधीजींनी १९४७ मध्ये आपल्या भारताचे-समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाचे मुळ देशाच्या एकतेत-अखंडतेत होते.'आयडिया ऑफ इंडिया' हीच ती संकल्पना..! स्वयंपूर्ण, स्वावलंबी गाव... कालानुरूप सुविधा... समृद्धशेती... सुखी शेतकरी... निरामय आरोग्य... सर्वांना शिक्षण... महिलांचा विकास... गावाची स्वयंपूर्णता या साऱ्या अपेक्षा त्या संकल्पनेचा भाग होत्या. 

            १५ऑगष्ट१९४७... भारताला स्वराज्य मिळाले त्याचे सुराज्य करण्याचे शिवधनुष्य त्या काळातील जुन्या जाणत्या कर्त्या पिढीने उचलले. त्यात अहमदनगर जिल्हा मागे कसा राहिल? ब्रिटीश सरकारने १९०४साली
'सहकार कायदा 'केला  होताच. काही जागृत गावामध्ये या कायद्यान्वये सहकारी सोसायट्या, पतपेढ्यांच्या गुढ्या दिमाखाने फडकू लागल्या होत्या. त्यामुळे स्थानिक धनीक, सावकार, पुंजीपतींच्या हाती केंद्रीत झालेल्या अर्थ सत्तेला हादरे बसण्यास सुरवात झाली होती. पण १९१३ मध्ये सुरु झालेल्या जागतिक महायुद्धाच्या सावटात बऱ्याच सहकारी सोसायट्या, पतपेढ्या विसर्जनाच्या दिशेने घरंगळू लागल्या. ग्रामीण अर्थ व्यवस्था पुन्हा शोषणवादी धनिकांकडे एकवटू लागली. या स्थित्यंतरात ५/७ वर्ष निघुन गेली. 
             युद्धविरामानंतर ब्रिटीश सरकारने
दुष्काळी भागातील  शेती व पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी छोट्या ,मोठ्या भंडारदरा धरणांसारख्या जल सिंचन योजना कार्यान्वीत केल्या.पाण्याची उपलबद्धी झाल्यानंतर धरणाच्या लाभक्षेत्रात ऊसशेती आणि ऊसापासून गुळ उत्पादनाने गती घेतली. पण गुळाचेअल्पायुषी उत्पादन आणि बेभरवशाचे बाजारभाव यामुळे हा व्यवसाय सुद्धा सावकारी शोषणाचा बळी ठरला. आणि पूर्वीचीच अर्थ शोषणाची  व्यवस्था मजबुतीने उभी राहिली. 
             शेतकरी भावांच्या आर्थिक शोषणावर फक्त हळहळ व्यक्त करुन, कोरडी सहानुभूती दाखवून मार्ग निघणार नव्हता. प्रत्यक्ष कृतीची गरज होती...! या वेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पोटतिडकीने उस्फूर्त  पुढाकार घेऊन बंद पडलेल्या सहकारी सोसायट्या, पतपेढ्यांचा जीर्णोद्धार सुरु केला. या सहकारी सोसायट्या, पतपेढ्यांच्या आधाराने
शेतकऱ्यांना अर्थ साह्य उपलब्ध करून देऊन सावकारी गळफासातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या या प्रयत्नांना हितसंबंधी धनदांडग्यांनी निकराचा विरोध केला पण विखे पाटील डगमगले नाहीत. याच दोन दशकांच्या काळात कारखानदार, भांडवलदार, पुंजीपती
या भागात पिकवल्या जाणाऱ्या मुबलक ऊसावर लक्ष ठेवून येथे खासगी साखर कारखाने सुरू करु पाहत होते..! सर्व सत्ताधीश ब्रिटीश सरकारने सुद्धा या धनिक उद्योगपतींना पाहिजे ती मदत करण्याची कृतीशील भूमिका घेतली होती. 

            भंडारदरा धरण नुकतेच झाले होते. पाण्याची उपलब्धता प्रचंड होती. त्या तुलनेत पाणी वापर नगण्य होता. १९२६ साली हरेगाव, ता. श्रीरामपूर येथे 'ब्रॅडी' या परदेशी कंपनीने खासगी मालकीचा पहिला साखर कारखाना उभा केला. या कारखान्याला नियमितरीत्या ऊस पुरवठा व्हावा यासाठी सरकारने खास हुकूम काढुन शेतकऱ्यांची हजारो एकर जमिन "ऊस लागवडी साठी" कायमस्वरुपी बहाल केली. कारखान्यात उत्पादीत साखर वाहतुकीसाठी  स्वतंत्र रेल्वेमार्ग, शेतातील ऊस वाहतुकीसाठी छोटे 'लाडीस मार्ग' टाकले.
                 शेतकरी कधी कष्टाला घाबरत नाही, नुकसानीलाही कधी मोजत नाही पण अस्मानी आणि सुलतानी संकटापुढे मात्र तो हतबल होतो. कृषि औद्यौगिकरणाच्या या फेऱ्यात हजारो शेतकरी त्यांच्या काळ्याआई पासून बेदखल झाल्यामुळे पुर्णत: उध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या उगवत्या-मावळत्यांसह तीन पिढ्या गारद झाल्या. हरेगाव साखर कारखान्याचा हा प्रयोग, त्या 'ब्रॅडी कंपनीला' फुकटात मिळालेल्या बागायती जमीनी, धरणाचे मुबलक पाणी यामुळे अल्पावथीत यशस्वी झाल्याचे पाहुन शेजारच्या पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे८६ हजार एकर जमीन पाट पाण्याच्या हक्कासह मोठमोठ्या धनिकांना बहाल केली गेली. 
        ही सर्व स्थित्यंतरे पाहून पद्मश्री विखे पाटील व्यथित झाले. सहकारी सोसायटी, पतपेढ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन सावरणारे विखे पाटील शांत कसे बसणार? गावोगावच्या छोट्या सहकारी संस्थांना पाठबळ देत होतेच. संताचे अभंग, ओव्या, धावे, पोथी, हरी कीर्तन, भजनाचा व्यासंग जन्मजात होता. वारकरी संस्कारामुळे पद्मश्री विखे पाटलांना संत वचनाने प्रेरणा दिली.....! "एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ! "
 साखर उद्योग म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाचे.. कच्च्या मालाचे  साखरेत.. पक्क्या मालात रुपांतर ..! हे सुत्र विचारात घेऊन त्यांनी चिंतन मनन, जाणकारांशी चर्चा करून विविध मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. साखर उद्योग शेतकऱ्यांच्या मालकीचा का असु नये? शेतकऱ्यांच्या जमिनी काढुन घेण्याऐवजी, त्या त्यांच्याच मालकीच्या ठेवून, ऊस उत्पादनास मदत प्रोत्साहन देवून, अंतीमत: शेकऱ्यांना रास्त मोबदला का देता येवू नये?  या प्रश्नांचे काहुर डोक्यात ठेवून पद्मश्री विखे पाटील सर्वत्र चाचपणी करीत होते. 
      १९४५ साली थोर अर्थतज्ञ.. ज्ञानतपस्वी डाॅ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर भागात बागायतदार शेतकरी परिषद झाली. या परिषदेत विखे पाटलांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन  संभाव्य धोके स्पष्ट करून, सहकारी सुत्राने शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखाना उभारणीची संकल्पना ठाम पणे मांडली..! शेतकऱ्याने आपल्या कारखान्यासाठी आपल्या शेतात ऊस उत्पादन घ्यावे. साखर उत्पादनातून ऊसाला किफायतशीर भाव द्यावा..! अर्थशास्री डाॅ. धनंजयराव गाडगीळांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. शेतकऱ्यांचे भाग भांडवल जमविण्याची जबाबदारी विखे पाटलांवर सोपविली. आणि पद्मश्री विखे पाटलांनी आपल्या सर्व सवंगडी मित्रांना या कामात ओढले. दिवस रात्र परीश्रम करुन दोन लाख रुपयांचे भाग भांवल उभे केले. १५ऑगष्ट१९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि कारखाना उभारणीच्या कार्यास मोठी गती मिळाली. १९५० साली शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला.!!
             महात्मा गांधींच्या स्वप्नातल्या "माॅडेल व्हीलेज" स्वयंपूर्ण, स्वावलंबि ग्राम स्वराज्याची... समृद्ध भारताची पायाभरणी झाली..! सहकार चळवळीतला हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रथमत: महाराष्ट्र, गुजरात च्या सिमा पार करुन प्रवरेच्या कुशीतून निघालेली हीी "सहकार गंगा"  संपूर्ण भारतात प्रवाहीत झाली.! फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही आधुनिक जीवनमुल्यं आकारास आली..! तात्वीक अर्थाने. या बाबत समिक्षा करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, "फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य दिले पण समतेला दूर सारले! रशियन राज्य क्रांतीने समता दिली पण स्वातंत्र्य हद्दपार केले!... बंधुभावाचा कोठे विचारच झाला नाही..! "
        महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्त प्रश्नाला या सहकार चळवळीने कृतीशील उत्तर दिले आहे. स्व. धनंजयराव गाडगीळ, स्व. वैकुंठभाई मेहता, आणि सहकार पंढरीचे पांडुरंग स्व.डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कर्मभूमीत भारताचे पहिले सहकार मंत्री ना. अमितभाई शाह, माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा संपन्न होतो आहे. या प्रसंगी लोकनेते स्व.बाळासाहेब विखे पाटलांची तिव्रतेने आठवण येते. वंदनीय बाळासाहेब विखे पाटलांच्या अलौकिक प्रतीभेमधून सहकार चळवळीच्या मुलभूत पायावर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा, कृषी संशोधन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, उद्योग क्षेत्रच नव्हे तर सर्व धर्म सम भावाची कास धरणाऱ्या सांस्कृतिक  क्षेत्राचा सर्वदूर विकास झाला आहे. सहकार क्षेत्रात ग्रामोद्धाराचा एक नवा आकृतीबंध उदयास आला आहे.! 

                भारताचे वंदनीय राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच अन्य सर्वपक्षीय नेते, शास्रज्ञ, ज्येष्ठ विचारवंत, संत, महंत, लेखक, आणि समाज सेवकांनी सातत्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. 
  "सर्वांगीण ग्रामविकासातच, आपला भारत आणि भारताची समृद्धी दडली आहे! तळागाळातल्या
सामान्य माणसा पर्यंत जा... त्याचे दु:ख समजून घ्या.. त्याचे समाधान करा!! त्यामध्येच आपल्या सर्वांचा उत्कर्ष  सामावला आहे! "  ही ठाम भूमिका घेवून स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी पद्मश्री विखे पाटलांच्या सेवा कार्यावर कळस चढविला आहे. 
          आज  त्या बहुजन, शेतकरी, श्रमजीवींच्या उद्धारासाठी तळमळणाऱ्या आणि तळपणाऱ्या सेवा कार्यावर कृतज्ञतेचा झेंडा फडकत आहे. पद्मश्रींचे नातू माजी मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, पणतु  युवानेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील  सवेच्या माध्यमातून समाज जीवनाशी समरस होऊन "आपला भारत... समृद्ध भारत" घडविण्याच्या प्रक्रियेत अथक कार्यरत आहेत.! 
सहकार परिषदेस शुभकामना. 

सुधाकर कराळे, 
देवळाली प्रवरा. 
(९४२०९५१८८७)
close