अहमदनगर प्रतिनिधी : ( संजय महाजन )
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्रींचे दर्शनासाठी येणा-या भाविकांकरीता दिनांक १६ डिसेंबर २०२१ पासुन सकाळी ०६.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत आरतीच्या वेळे व्यतिरिक्त मुख दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येत असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायात म्हणाल्या, देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु राज्य शासनाने दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२१ पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार ०७ ऑक्टोंबर रोजी सुमारे १५ हजार भाविकांना ऑनलाईन पासेसव्दारे श्रींची दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली. त्यानंतर दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ पासुन ऑफलाईन पासेसव्दारे १० हजार भाविकांची अशी एकुण २५ हजार भाविकांची दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आलेली असून प्रति तास ११५० भाविकांना श्रींच्या दर्शनाकरीता सशुल्क व निशुल्क ऑफलाईन पासेस देण्यात येतात. त्यामुळे गर्दीच्या काळात अनेक भाविकांना दर्शन पास मिळत नसल्याने साईभक्तांकडून वारंवार मुख दर्शन सुरु करण्याची मागणी होत होती.
तसेच दिनांक २४ डिसेंबर ते ०३ जानेवारी २०२२ अखेर नाताळ व नववर्षारंभ असल्याने भाविकांची होणारी संभाव्य गर्दी व साईभक्तांची मागणी लक्षात घेवुन दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी पासुन सकाळी ०६.३० ते रात्रौ ०९.३० या वेळेत (आरतीच्या वेळे व्यतिरिक्त) मुख दर्शन गेट चालु राहील. तरी सर्व साईभक्तांनी कोव्हीड १९ चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करुन श्रींच्या मुख दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.

