शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१
त्या चहावाल्यामुळे आरोपी पलायनाचा कट शिजला
संगमनेर तालुक्यातील डिग्रस मालुंज्यातील एकासह त्या चहावाल्यावर गुन्हा दाखल, दोन्ही आरोपींना 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी..!!
राहुरी : राहुरी पोलिस ठाण्यातील ब्रिटीशकालिन असलेल्या जेलमधून पळ काढण्यासाठी मोक्का लावलेले 3 तर इतर गुन्ह्यातील 2 आरोपींनी चहा देणार्या करण मुसमाडे याची मदत घेत पळून जाण्याचा कट शिजविल्याची माहिती पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. पोलिस ठाणे आवारातील चहा विक्रेता करण व संगमनेर तालुक्यातील मालुंजा डिग्रस येथील बीडगर या दोघांवर गुन्हा दाखल करून जेरबंद करण्यात आले आहे. जेलच्या खिडकीचे गज कापून पळालेल्या पाच जणांपैकी तीघे पोलिसांच्या तावडीत सापडले. परंतु अजूनही दोघांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
राहुरी पोलिस व महसूल प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून करणम जालिंदर मुसमाडे (23 वर्ष) रा. देसवंडी ता. राहुरी या तरूणाने चहा विक्रीच्या माध्यमातून आपले शासकीय प्रशासनाशी चांगले संबंध निर्माण झाले. त्यानुसार राहुरी पोलिस ठाणे व तुरूंगातील कैद्यांना चहा देण्याचे काम मुसमाडे हा करीत होता. मोक्का गुन्ह्यामध्ये कैद असलेला सागर भांड (वय 25, रा. ढवणवस्ती, नगर ह.मु.शिरूर जिल्हा पुणे) या टोळीप्रमुखाने जेलमधून पळ काढण्यासाठी कट आखला. यासाठी चहा विक्रेता करणची मदत घेण्याचे ठरविले. त्यास करणने प्रतिसाद दिला. आरोपींना मोबाईल देणे, मोबाईल बॅटरी चार्ज करून देणे यासह विविध उपक्रम करण कडून सुरू होते. त्याचा लाभ घेत मोक्का आरोपातील भांड व त्याचे साथीदार नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, किरण आजबे, जालिंदर सगळगिळे, रवी लोंढे यांनी जेलमधून फरार होण्यासाठी प्लॅन आखला. चहा विक्रेता करण मार्फत मोबाईल संभाषण होत असल्याने भांड याने संगमनेर तालुक्यातील डिग्रस मालुंजा येथील 24 वर्षीय मित्र मारूती ठका बिडगर याच्याशी संपर्क साधला. भांड यांने बीडगर यास आम्हाला तु जेलमधून बाहेर काढ, तुला रोख रक्कम देऊ असे सांगितले. त्यानुसार आठवड्यापासून बिडगर हा राहुरी परिसरात ठाण मांडून होता. पोलिस व महसूल आवारात घिरट्या मारत बिडगर याने आरोपींना पळण्याचा प्लॅन सांगितला.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक मधूकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार चहा विक्रेता करण याने कैद्यांना चहा देण्याच्या बहाण्याने गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेड आरोपींना दिला. तर बिडगर याने तुरूंगाच्या बाह्य परिस्थितीवी इतंभूत माहिती आरोपींना दिली. शुक्रवारी रात्रीच्या वेळी 2 ते 3 या वेळी पळून जाण्यासाठी तयारी केली. चौथ्या क्रमांकाच्या जेलमध्ये असलेल्या आरोपींनी पाठीमागिल खिडकीचे गज कापले. अखेर खिडकीतून मोक्का गुन्ह्यातील आरोपी भांड, सोन्या माळी, रवी लोंढे यांसह इतर गुन्हे दाखल असलेल्या किरण आजबे व जालिंदर सगळगिळे यांनी पळ काढला. दरम्यान, राहुरी शहरामध्ये गस्त घालत असलेल्या पोलिस पथकाला पाच जण पायात चप्पला नसलेल्या अवस्थेत पाहिले. त्यामुळे पोलिसांना संबंधितांवरील संशय बळावला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. सिनेस्टाईल पाठलाग होताच मोक्का लागलेल्या टोळीचा प्रमुख सागर भांड व किरण आजबे हे पोलिसांच्या हाती लागले. तर तीघांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांना गुंगारा दिला. पोलिसांनी आरोपींना पहाताच जेलमधून आरोपी पळाल्याचे समजले. सर्वत्र एकच खळबळ उडाली. गस्त घालणार्या पोलिस पथकाने पळून जाणार्या कैद्यांना आणल्यानंतर घडलेली हकीकत समजली. देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या दौर्यामध्ये व्यस्त झालेल्या पोलिस प्रशासनाला आरोपी पळाल्याचे समजताच सर्वांची एकच धावपळ उडाली. नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांसह पोलिस प्रशासनाला अधिकार्यांची चांगलेच फैलावर घेतले. अखेरीस पोलिस हवालदार आदिनाथ पाखरे व सचिन ताजणे यांनी सगळगिळे या आरोपीचा शोध घेत त्यास मनमाड येथून पकडून आणले. परंतु पळालेले मोक्का गुन्यातील आरोपी सोन्या माळी व रवी लोंढे हे दोघे जण अजूनही फरार आहे. पोलिसांनी मदत करणार्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. सर्वांना राहुरी न्यायालयात हजर केले असता आरोपींना 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक शिंदे यांनी दिली.
@दोघांचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना...
"पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना कामगिरी सुधारण्याची तंबी दिली आहे. घटनेचा तपास पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांना सोपविण्यात आला आहे. फरार झालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना करण्यात आले आहे."
@पोलिस निरीक्षक इंगळेंसमोर मोठे आव्हान...
"राहुरी हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरी, दरोडे, मारहाण, महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत असतानाच पाच आरोपींनी पोलिस बंदोबस्ताला भेदत जेलमधून पलायन केले. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. पोलिस निरीक्षक इंगळे यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी व पोलिस कर्मचार्यांवर आपला वचक निर्माण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. "
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

