shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरीत "ओमायक्रॉन’चा रुग्ण?"; अफवेने उडविली खळबळ..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१.


राहुरी : तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचा चांगलाच गोंधळ उडाला. परंतु, आरोग्य प्रशासनाने राहुरी परिसरात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची स्पष्टोक्ती दिल्याने हा गोंधळ थांबला. त्यामुळे सोशल मीडियावर पसरविण्यात आलेली माहिती निव्वळ अफवाच ठरली आहे. दुसरीकडे, परदेशातून आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.

         संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. दुसर्‍या लाटेमध्ये हजारो जणांचा बळी गेला. रुग्णालयात जागा नसल्याने व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर तिसरी लाट येऊच नये, अशी प्रार्थना केली जात आहे. त्यातच कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉन या गंभीर विषाणूची चर्चा वाढली. परदेशात ओमायक्रॉन संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले जात आहेत. त्यामुळे देशातही केंद्र शासनाने अ‍ॅलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत काळजी घेतली जात आहे.


    दरम्यान, नगर जिल्ह्यात शुक्रवारी पहिला रुग्ण आढळल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील परदेशातून दाखल झालेला व्यक्ती ओमायक्रॉन आजाराने बाधित झाल्याची माहिती पसरविण्यात आली. त्यामुळे प्रशासनामध्येही एकच खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनातील अधिकार्‍यांनी एकमेकांशी संपर्क साधत, घटनेची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बारागाव नांदूर गावाच्या प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. वृषाली कोरडे यांनी गावामध्ये ओमायक्रॉन किंवा कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.


 
            आरोग्य प्रशासनाने राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे परदेशातून आलेला एकही व्यक्ती नसल्याने ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्याची चर्चा ही केवळ अफवा असेल, अशी माहिती दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले असा एक रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे स्पष्ट होत आहे.

@परदेशातून कुणीही बारागाव नांदूरला आले नाही..!!

राहुरी शहर, मानोरी व धानोरे या गावांमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद करण्यात आली. सर्वांचा ओमायक्रॉन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बारागाव नांदूर गावामध्ये परदेशातून आलेल्या एकाही व्यक्तीची नोंद नाही. तसेच राहुरी तालुक्यात एकही ओमायक्रॉन बाधित झालेला रुग्ण नसल्याची माहिती डॉ. दीपाली गायकवाड यांनी दिली.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close