शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१
राहुरीच्या सबजेलमध्ये कैद्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी ठरतेय डोकेदुखी ; कैदी फरार झाल्यानंतर सीसीटिव्हीसह खिडक्यांची दुरूस्ती सुरू..!!
राहुरी : राहुरी येथील पोलिस ठाण्याच्या दुय्यम कारागृहामध्ये मोक्का गुन्ह्याअंतर्गातील 3 तर इतर गुन्ह्यातील 2 जणांनी पाठीमागिल खिडकीचे गज कापून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. जेलच्या पाठीमागिल खिडक्यांची दुरूस्ती व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
राहुरी येथील दुय्यम कारागृहाची निगा व व्यवस्थापण महसूल प्रशासनामार्फत कार्यान्वित आहे. राहुरी पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये अटक होणार्या आरोपींना ब्रिटीश कालिन बांधकाम झालेल्या तुरूंगात डांबले जाते. दरम्यान, राहुरीच्या कारागृहामध्ये 4 बंदिस्त जेल खोल्या आहे. प्रत्येकी 6 असे 24 जणांना अटक करून जेलमध्ये ठेवण्याची क्षमता आहे. परंतु प्रत्यक्षात राहुरीत वाढलेली गुन्हेगारी पाहता अटक होणार्या आरोपींची संख्याही अधिक आहे. राहुरी येथील दुयम कारागृहामध्ये तब्बल 60 ते 70 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात असलेल्या आरोपींच्या संख्येमुळे पोलिस व महसूल प्रशासनावर ताण येत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राहुरी येथील जेलचे नियंत्रण तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनात लिपीक राहुल जाधव हे पाहतात. तर जेलमध्ये कैद्यांना अटक करणे व त्यांच्यावर नजर राखण्यासाठी पोलिसांचे संरक्षण असते. त्यातच उत्तर नगर जिल्ह्यामध्ये महिला कैद्यांसाठी उपयुक्त उपाय योजना नसल्याने अनेक तालुक्यातील महिला आरोपींना राहुरीच्या कारागृहात ठेवले जाते. त्यामुळे राहुरीत कैद्यांची अवस्था अजूनही बिकट आहे.
राहुरी येथील कारागृहातून शुक्रवारी रात्री पाच कैद्यांनी पळ काढण्याचा प्लॅन आखला.
मोक्का लागलेला गुन्हेगार सागर भांड यांनी उणिवा जाणून घेत आघात केला. कैद्यांना चहा पुरविणार्या करण मुसमाडे यास अमिष दाखवून मदत मागण्यात आली. चहा देत असताना मोबाईल संभाषण करून देणे, मोबाईलची बॅटरी चार्ज व इतर साहित्य देणे आदी प्रकार घडला. संगमनेर येथील 24 वर्षीय मारूती ठका बिडगर याची मदत घेण्यात आली. त्या माध्यमातून कैद्यांनी कारागृहाच्या पाठीमागिल खिडकीचे गज कापून शनिवारी पहाटे 3 वाजता कैद्यांनी पळ काढला. यामध्ये मोक्का गुन्हा असलेला सागर भांड, सोन्या माळी, रवी लोंढे यांसह किरण आजबे व जालिंदर सगळगिळे यांनी पळ काढला. परंतु रात्री गस्त घालणार्या पोलिसांनी सागर भांड व किरण आजबे यांना पकडले. तर सगळगिळे हा मनमाड येथे सापडला. परंतु रवि लोंढे व सोन्या माळी हे दोघे जण अजूनही फरार आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यासह राज्यात सात पथके फिरत आहे. परंतु फरार कैदी पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार असल्याचे दिसत आहे.
कैदी पळून गेल्यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने जागे होत कारागृहाच्या तटबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. जेलच्या पाठीमागे जीर्ण होत असलेल्या खिडक्यांची दुरूस्ती केली जात आहे. तर जेल परिसरामध्ये सीसीटिव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
राहुरी येथील महसूल व पोलिस ठाण्याची इमारत ही इंग्रजांच्या काळातील आहे. इमारत बांधकामासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पुढाकाराने इमारत बांधकामासाठी पुढाकार घेण्यात आला होता. परंतु कारोना कालखंडामध्ये महसूल, पोलिस इमारतीच्या बांधकामाला तुर्त स्थगिती मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुरीच्या महसूल व पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाला मुहूत कधी मिळणार? याबाबत चर्चा केली जात आहे.
ब्रिटीश कालिन ईमारत व दुरवस्थेमुळे अडचणी - पोलिस निरीक्षक इंगळे..
"फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. राहुरीच्या दुय्यम कारागृहामध्ये कैद असलेल्या आरोपींची जबाबदारी राहुरी महसूल विभागाकडे आहे. कारागृह दुरूस्ती, उपाययोजना या महसूल विभागाच्या हाती आहे. त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी पाहणी करून उचित उपायोजना सुरू केल्या आहेत."
निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशिल- तहसीलदार शेख..
"राहुरी कारागृहामध्ये 60 ते 70 कैदी अटक आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी केवळ एका लिपीकावर आहे. सन 2020 पासून शासनाकडे कारागृह दुरूस्ती व उपाय योजनासाठी 10 लक्ष रूपये निधीची मागणी केलेली आहे. कैद्यांच्या प्रातः विधीसाठी निर्माण होणार्या अडचणी, पाण्याच्या अडचणी असतात. सेंट्रल जेमध्ये 80 कैद्यांसाठी 20 ते 25 जण असतात. परंतु राहुरीत केवळ एका लिपीकाच्या अखत्यारित मोठ्या प्रमाणात कैदी असल्याने अडचणी निर्माण होत असल्याची माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली."
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

