एसटीचा संप चालू आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या नावाने तळागाळात, खेड्यापाड्यात रुजलेल्या वाहतूक यंत्रणेला कुठेतरी खीळ बसेल की काय? अशी भीतीही वाटते. एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या बालपणापासून अनेक आठवणी एसटीशी निगडीत आहेत. प्रत्येक उपक्रमात, गरजेच्या वेळी, उठता-बसता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी माध्यम म्हणून उपयोगी पडते ती एसटी हे कोणीही नाकारू शकणार नाही. अशा अत्यंत उपयोगी व जीवनावश्यक दळणवळणाच्या प्रक्रियेतील कार्यक्षम यंत्रणा खिळखिळी होणे हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मोठे संकट होय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जे लोकोपयोगी आहे, ज्याची नाळ बहुजन समाजाशी जोडलेली आहे अशा यंत्रणा जाणीवपूर्वक संपवण्याची कारस्थाने गेले अनेक वर्षे आपण पाहत आहोत.
पिढ्यानपिढ्या या देशाची कृषी अर्थव्यवस्था ज्या भारतीय वंशाच्या गाईवर अवलंबून होती ती गाय आज मोठ्या प्रमाणावर कत्तल होताना दिसत आहे. त्यामुळे जमिनी निकस होत आहेत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोगराईचे साम्राज्य पसरले आहे व त्यासाठी कीटकनाशके मारणे सक्तीचे झाले आहे. यातून रोगराई पसरते आहे. नद्या विषारी होत आहेत. तेवढाच सर्वसामान्य शेतकरी कमजोर होत आहे कारण आपण भारतीय गोवंशाकडे दुर्लक्ष केले.
आपल्या मराठी भाषेकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे मराठी भाषेची अवस्था ही अशीच झालेली आहे. ज्या मराठी भाषेमध्ये संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विनोबाजींसह स्वातंत्र्यवीर सावरकर, पु.ल. देशपांडे असे एकाहून अधिक साहित्यिक तयार झाले त्यांचे वांग्मय वाचणे व पचविणे हे आजच्या मराठी शिक्षितांना अवघड जात आहे. याचे कारण शाळेतून मराठी भाषेचे खच्चीकरण करण्यात आले. मुंबईतून मराठी भाषा हद्दपार झाली. नव्या पिढीने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे ना धड मराठी येत ना इंग्लिश ! मराठी भाषेतील अलंकार, व्याकरण, वृत्त, काव्य हे सर्व आजच्या मराठी मुलांना समजायला कठीण जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये मराठी प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता आहे. मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मराठी भाषेचा दर्जा अत्यंत खालावत आहे.
संपूर्ण शिक्षण क्षेत्रात देखील उत्पादक शिक्षणाचा अभाव आहे. पदवीधर झालेल्या तरुणांना पुढे काय करायचे? हा प्रश्न सतावतो आहे. सदोष शिक्षण पद्धतीबाबत आम्ही गंभीरपणे कधी विचारच केला नाही. परिणामी उच्चशिक्षित तरुणांची फौज तयार झाली पण राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याची उद्योजकता प्राप्त झाली नाही हे मान्य करावेच लागेल.
हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन असे की सध्या चालू असलेल्या एसटीच्या संपामुळे महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा, दळणवळणाचे साधन तुटल्यामुळे गोरगरिबांचे शिक्षण, नोकरी, धंदा यावर विपरीत परिणाम झालेला आहे. यातून काय साध्य होणार?
वेळीच सावध होणे हे अत्यंत गरजेचे आहे. जसे नदीच्या किनारी समृद्ध गाव वसते. तसेच ज्या मार्गावर एसटी धावत असते त्या मार्गावरील जनतेची भरभराट होते हे एसटीने सिद्ध करून दाखविले आहे. आज एसटी बंद असल्यामुळे खेड्यापाड्यातील अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत. शिक्षण थांबलेले आहे. नोकरी करणाऱ्यांचे हाल होत आहेत. आपण हे सगळे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
एसटी वाचवा ग्रामीण अर्थव्यवस्था वाचवा !
चंद्रकांत शहासने, पुणे.
मो.९८८१३७३५८५

