shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विराट कोहलीच्या अकाली नेतृत्व सोडण्याने क्रिकेट जगत हैराण ; उलट सुलट चर्चेला उधाण ..!



              विराट कोहली भारतीय क्रिकेट मधील कागदोपत्री सर्वात यशस्वी कर्णधार आहे अशा नोंदी आहेत. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाला हवे असलेले जागतिक विजेतेपद मिळाले नसल्याने त्याच्या कारकिर्दीला गालबोट लागले आणि हिच बाब त्याच्या टि-२० व कसोटीचे नेतृत्व सोडण्याचे मुळ कारण आहे. शनिवारी १५ जानेवारीला सोशल मिडीयावर कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभर उलट सुलट प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊसच पडला.

                 हा निर्णय घेण्याच्या एकच दिवस अगोदर कोहलीच्या नेतृत्वात भारताला दुय्यम दर्जाच्या दक्षिण आफ्रिका संघाकडून आघाडीवर असतानाही मालिका पराभव स्विकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ यापूर्वी कधीही मालिका जिंकला नव्हता. सध्याचा भारतीय संघाचा खेळ बघता ती उणीव भरून निघेल अशी अपेक्षा होती व सुरूवातही सेंच्युरियन कसोटीतील विजयाने झाली. मात्र त्यानंतर अचानक अशा काही घडामोडी झाल्या की आघाडीवर असलेला भारतीय संघ मागे पडला व मालिकाही गमावून बसला. या घटनेनंतर कोहलीवर टिकाही झाली. मात्र त्याला कर्णधार पदावरून काढावे असे कोणीही म्हंटले नाही. तसेच त्याला सक्षम असा पर्याय देखील उपलब्ध नसल्याने बीसीसीआय त्याला पदावरून काढेल असेही काही नव्हते. परंतु त्या सामन्यादरम्यान डिआरएस विवाद उत्पन्न झाला व कर्णधार कोहलीने स्टंप माईक जवळ जाऊन नियमांचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्याने त्याच्या विषयी सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात असून त्याच्यावर आयसीसीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र असे काही घडण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडे असलेले कसोटीचे कर्णधारपदही सोडून सर्वांनाच गोंधळात टाकले.
              टि२० विश्वचषकापूर्वीच त्याने टि२० चे नेतृत्व त्यागण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सफेद चेंडूच्या वनडे व टि २० या प्रकारात एकच कर्णधार असावा या निवड समितीच्या निर्णयाने त्याची वनडेच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. या दरम्यान मात्र बीसीसीआय व कोहली यांच्यात सुसंवाद नसल्याने गैरसमज वाढला व त्याचे गोंधळात रूपांतर झाले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्यांची बाजू साफ केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने गांगुलीच्या विपरीत उत्तर दिले. यावर कहर केला तो निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी. सेंच्युरियन कसोटी विजयानंतर चेतन शर्मानी कोहलीच्या वक्तव्याला खोटे ठरवून वाद मिटविण्याऐवजी तो वाढविण्याचीच भूमिका घेतली.
              कर्णधार व देशाची क्रिकेट संस्था यांच्यातील विवादाचा परिणाम संघाच्या खेळावर अप्रत्यक्षरित्या झाला व संघ मालिका गमावून बसला. त्यानंतर तापड स्वभावाच्या कर्णधार कोहलीने बीसीसीआय त्याच्या विरूध्द काही कारवाई करण्यापूर्वी स्वतःच नेतृत्व सोडून प्रकरण आणखीच चिकदळवले. कोहलीच्या नेतृत्त्व सोडण्याची बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली आणि मग कोहलीचे समर्थक व विरोधक यांच्या मतप्रदर्शनला रंग भरले. विविध टिव्ही चॅनेल्स, युट्यूब चॅनेल्सनी तर राष्ट्रीय संकट कोसळल्याप्रमाणे चर्चासत्र सुरू करून आगीत तेल ओतण्याचे काम केले.
              वास्तविक पाहता स्वतः कोहली अथवा बीसीसीआयकडून नेतृत्व सोडण्याचे कारण कोणीच सांगितले नाही. मात्र या टिव्ही व युट्यूब चॅनेल्सवाल्यांनी वेगवेगळे जावई शोध लावून जुन्या झालेल्या काही घटनांचा काथ्याकूट करायला सुरुवात केली. मात्र यातून वाद व नेतृत्वाचा प्रश्न सुटणार नाही व नव्हताच. परंतु या चॅनेल्सवाल्यांचा टिआरपी मात्र नक्कीच वाढला असणार ?
                  बऱ्याच जणांनी बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्या कार्यशैलीवर टिका सुरू केल्या. मात्र हे सर्व महाभाग एक गोष्ट साफ विसरलेत की, जाळ झाल्या शिवाय धुर निघत नाही. प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहोल्यानंतर काय परिणाम होतात हे सर्वांनाच माहीत आहे. कोहलीकडूनही असेच काही तरी घडले असणारच ना ? तो काही साधू संत नाही की धुतल्या तांदळासारखा स्वच्छही नाही. त्याच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत त्यानेही अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीचा खेळखंडोबा केला आहे. अनेक खेळाडूंच्या करिअर उध्वस्त केल्या. त्याने लिहीलेल्या राजीनामा पत्रात ज्या महेंद्रसिंग धोनीचे त्याची कारकिर्द घडविण्यासाठी आभार मानले त्याच धोनीची कारकिर्द कोणी बिघडवली ? हे साऱ्या जगाला माहीती आहे. त्रिशतक ठोकून पडद्याआड गेलेला करूण नायर कुठे गेला ? याचे उत्तर कोहलीच चांगले देऊ शकतो. त्यामुळे जसे पेरतो तसेच उगवते ही बाब कोहलीने समजून घ्यायला हवी.
                  कोहलीमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी असून त्याने थंड डोक्याने विचार करून केवळ आपल्या फलंदाजीकडे लक्ष जर केंद्रीत केले तर तो सचिन तेंडुलकरचे सगळे विक्रम तोडू शकतो. सचिन तरी कुठे त्याच्या कारकिर्दीत जास्त काळ कर्णधार होता ? तोही त्याच्या ज्युनियर खेळाडूंच्या हाताखाली खेळून शिखरावर पोहोचलाच ना ? मग कोहलीने कुठलाई इगो न वाढविता देशाहितासाठी कुठेतरी जुळवून घेणे गरजेचे आहे. अन्यथा असाच टोकदार वागत राहीला तर त्याला इतिहासजमा व्हायला जराही वेळ लागणार नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close