याबाबत सविस्तर वृत्त असे की, 'नाते शब्दांचे साहित्य मंच' हा समूह गेल्या तीन वर्षापासून साहित्य क्षेत्रात सेवाकार्य करत आहे. समूहात अनेक उपक्रम तसेच विविध कार्यक्रम राबविले जातात. मागील वर्षी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी समूहाच्या माध्यमातून कोपरगाव येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आलेले होते, त्यात राज्यातील विविध विभागातून कवी, कवयित्रीनी हजेरी लावून कविता व साहित्याप्रती असणारे प्रेम व निष्ठा दाखविली होती व या माध्यमातून तालुक्याची प्रतिमा देखील उंचावली होती,
याहीवर्षी राज्य भरातून अशा संमेलनाच्या आयोजनाची मागणी सुरू आहे, परंतु कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव व साहित्यिकांच्या व रसिकांच्या आरोग्याचा विचार करता सध्या तरी आयोजन करणे अयोग्य असून वातावरण निवाळल्यानंतर आपण निश्चितच त्याबाबत आयोजन समितीशी चर्चा करून नियोजन करणार असून सध्या ऑनलाईन पद्धतीनेच संमेलन घेणार असल्याचे समूह प्रमुख कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले आहे.
अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, रविवार दि. ३० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता गुगल मिटच्या माध्यमातून आपण 'नाते शब्दांचे साहित्य मंच' समूहाचे ऑनलाईन राज्यस्तरीय निमंत्रितांचे कवी संमेलन घेत असून संमेलनाध्यक्ष म्हणून औरंगाबादच्या सुप्रसिद्ध कवयित्री व साहित्यिका सौ.माधुरी चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कवी दिनकर पाटील व कवी, लेखक श्री पंडित निंबाळकर हे उपस्थित असणार आहे.
निमंत्रितांमध्ये कवी बालाजी नाईकवाडी (येवला), कवयित्री कल्पना देशमुख (मुंबई), कवयित्री भावना गांधीले (कोपरगाव), कवी डॉ.सुनील पवार, (बुलढाणा), कवयित्री गीतांजली शेटे (परभणी), कवयित्री सुनिता इंगळे (कोपरगाव), कवी विशाल पाटील (नंदुरबार), कवयित्री वैशाली जाधव (नाशिक), कवी सचिन चव्हाण (पाथर्डी), कवयित्री सीमाराणी बागुल, (नाशिक), कवी शरद म्हंकाळे (औरंगाबाद), कवयित्री पुनम राऊत (शेवगाव) आदी उपस्थित राहणार असून संमेलनाची रंगत वाढवतील. आभार प्रदर्शन समूहाच्या सदस्या राजश्री वाणी मराठे या करणार असून, सूत्रसंचालनाची धुरा कवयित्री सौ. चंदन तरवडे या सांभाळत असून राष्ट्रगीताने समारोप होईल, तरी संमेलनाची लिंक समूहावर व इतर प्रसामाध्यमांद्वारे देण्यात येणार असून रसिक श्रोत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

