पूर्णा । सय्यद कलीम :_
परभणीतील व्यापार्यांची ११ लाख ५ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल नवामोंढा पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
द्वारकादास गोविंदप्रसाद बजाज यांनी रविवारी रात्री नवामोंढा पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. त्या तक्रारीतून रेल्वे स्टेशन रस्त्यावरील श्री व्यंकटेश ईलेक्ट्रॉनिस नामक आपल्या दुकानातून डिसेंबर २०२१ रोजी एका व्यक्तीने रिसोड येथील तिरुपती ट्रेडर्स नावाच्या, गणेश भगवान वाळके नामक व्यापार्याच्या नावाने काही ईलेक्ट्रीकलचे सामान खरेदी केले. सुरुवातीला १ लाख ६१ हजार ५९२ रुपयांचे सामान खरेदी केल्यानंतर आरटीजीएसद्वारे रक्कम अदा केली. त्यापुढे व्यवहार करीत बजाज यांचा विश्वास संपादन केला.
याचदरम्यान १५ जानेवारी रोजी दोघेजण बजान यांच्या दुकानावर आले. त्या दोघांनी ३ लाख ५८ हजार ४२ रुपयांचे सामान खरेदी केले. त्यापोटी धनादेश दिला. पुन्हा १ लाख ६७ हजार ६८३ रुपयांचे सामान घेतले. त्याबद्दलही धनादेश दिला. बजाज यांनी तो धनादेश बँकेत टाकला असता तिरुपती ट्रेडर्स नामक दुकानाच्या खात्यात अपूरे पैसे असल्याने धनादेश वठलाच नाही. मालकाचाही मोबाईल लागला नाही.
बजाज यांनी वसमत रस्त्यावरील दुकान मालकाकडे त्या दोघांबद्दल चौकशी केली तेंव्हा ते १६ जानेवारीपासून बेपत्ता आहेत, असे कळाले. बजाज यांनी तातडीने या भामट्यांबद्दल माहिती काढली असता लक्ष्मी ईलेक्ट्रॉनिक्स येथून २ लाख ४८ हजार १८०, लक्ष्मी प्लायवूड येथून २ लाख १८ हजार ७०, रुबी एन्टरप्रायझेस येथून १ लाख ११ हजार ४४० रुपये किमतीचे सामान घेवून फसवणूक केल्याची बाब समोर आली. या भामट्यांनी अन्य व्यापार्यांचीही फसवणूक केल्याचे बजाज यांनी नमूद केले.
दरम्यान, या बाबत नवामोंढा पोलिसांनी फसवणूक करणार्या त्या व्यक्तींचा शोध सुरु केला आहे.

