केवळ औपचारीकता बनून राहीलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारतावर चार धावांचा निसटता विजय मिळवून मालिकेत भारताला धोबीपछाड दिला. आघाडीवर राहूनही कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय खेळातील तज्ञ खेळाडू संघात आल्यानंतर नवोदितांनी भरलेल्या दक्षिण आफ्रिकेला टिम इंडिया सहज हरवेल ही क्रिकेट रसिकांची अपेक्षा टिम इंडियाने फोल ठरवली. तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना रथी महारथी फलंदाजांचा भरणा असलेल्या भारतीय संघाला विजयापर्यंत पोहोचण्यास या दौऱ्यात सलग पाचव्यांदा अपयश आले व रित्या हाताने मायदेशी परतावे लागले.
शिखर धवन व विराट कोहलीने अर्धशतके केली खरी परंतु त्यांच्या खेळात संघाच्या विजयापेक्षा स्वतःची इज्जत जपण्याचाच प्रकार जास्त दिसला. ते दोघेही जम बसल्यावर बाद झाले, तेंव्हा भारताला निम्म्या पेक्षा जास्त धावांची गरज होती. त्या दोघांनी स्वतःचाच जास्त विचार करत भरपूर चेंडूही वाया घालविले व त्यानंतरच्या फलंदाजांवर दबाब वाढविला. शेवटी दिपक चहारने एकहाती झुंज देत निकराचे प्रयत्न केले. मात्र विजयासाठी दहा धावांची गरज असताना त्यानेही नियंत्रण गमावले व सामना भारताच्या हातून निसटला.
रिषभ पंतचे प्रत्येक सामन्यातील गचाळ यष्टीरक्षण विरोधी संघाला बळकटी देऊन गेले तर बेजबाबदार फटके मारण्याची त्याची घाण सवय संघाला खाईत जाण्यास कारणीभूत ठरत असून कधीतरी एखादी चांगली खेळी करून आपल्या नालायक कामगिरीवर पडदा टाकण्याची त्याची वृत्ती संघासाठी सातत्याने घातक ठरत आहे. शिवाय त्याला चौथ्या क्रमाकांवर पाठवून संघ प्रबंधनाने स्वतःच्या हातानेच पायावर धोंडा पाडून घेतला. वास्तविक सुर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांना त्याच्या आधी पाठवायला हवे. हे समजण्या इतपत लोकेश व द्रविड हे राहुल समजू शकत नाही यात आश्चर्यच म्हणावे लागेल.
तिसऱ्या वनडेतही श्रेयस अय्यरने संघाला व स्वतःलाही धोका दिला. तर सुर्यकुमार यादव जम बसल्यानंतर बाद झाला. त्यामुळे सोपा दिसणारा पराभव लांब गेला व अखेर निसटलाच ! सुर्यकुमारला सातत्याने संधी न देणे हे देशहिताचे नसून त्याच्या सारख्या फलंदाजाला वारंवार खेळविले तर त्याचाही आत्मविश्वास वाढेल व आगामी विश्वचषकांच्या दृष्टीने संघास लाभही होईल.
नियमीत कर्णधार रोहीत शर्माच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या के एल राहुलला कर्णधारपद रास आलं नाही. कर्णधार पदाच्या ओझ्यामुळे त्याची फलंदाजी प्रभावीत झाल्याने संघावर अतिरिक्त दडपण वाढले. एक गोष्ट मात्र पक्की की राहुलला नेतृत्वगुण विकसीत करण्यासाठी मोठ्या ट्रेनिंगची गरज आहे. चालू भांडवलावर त्याचं दुकान फार काळ चालू शकणार नाही.
संघाची निवड हा भारतीय संघाचा नेहमीप्रमाणेच वादाचा मुद्दा असून योग्य त्या खेळाडूला संधा न देण्याची प्रथा सुरूच आहे. शिवाय बॅटींग ऑलराऊंडर म्हणून संघात घेतलल्या व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी न देणं संशयास्पद वाटतं. त्याला संघात घेऊन योग्य संधी न देणं या मागे काहीतरी काळंबेरं असल्याचा वास येतो. अखेर शेवटच्या सामन्यात त्याला वगळून आपला संशय खरा असल्याचेच टिम मॅनेजमेंटने दाखवून दिले.
अतिशय वाईट ठरलेला कटू अनुभवांनी भरलेला दक्षिण आफ्रिका दौरा संपला खरा मात्र यातून बोध घेत संघाची विस्कटलेली घडी बसवण्याची कठीण जबाबदारी कर्णधार रोहीत शर्मावर असणार आहे. त्याचा अनुभव व खेळाडूंना हाताळण्याची कला लक्षात घेता यावर तो नक्कीच तोडगा काढेल यात कुठलीच शंका वाटत नाही. मात्र संघात खऱ्याखुऱ्या राजकारणात राजकारण नसेल इतके राजकारण चालू आहे. तेवढे थांबण्याची खरी गरज आहे. एवढी एक बाब झाली तर भारताला हरविणे इतर संघांना खरंच सोपे नसेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

