shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दर्पण दिनानिमित्त एकता फाऊंडेशनने केला पत्रकारांचा सन्मान..!


शिरूर कासार । प्रतिनिधी :-
'वेदनेला फुंकर माणुसकीची' हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एकता फाउंडेशनने दर्पण दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान केला. शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कुल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार तथा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवाजी पालेपाड हे होते. 

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक अनंत कराड यांच्यासह उपाध्यक्ष प्राचार्य माही शेख, योगगुरू शिवलिंग परळकर, संस्थापक सदस्य लखुळ मुळे, राजेश बीडकर, नितीन कैतके, व्यंगचित्रकार दिपक महाले यांनी सदरील उपक्रमाचे आयोजन केले होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील तसेच निर्भीडपणे वास्तववादी लिखाण करून अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना या वेळी सन्मानचिन्ह, पेन आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी आदर्श तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामनाथ कांबळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार बबनराव देशमुख, विजयकुमार गाडेकर, अशोक भांडेकर, गोकुळ पवार, भारत पानसंबळ, युवराज सोनवणे, बाळकृष्ण मंगरूळकर, मनोज परदेशी यांची उपस्थिती होती.

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आणि जेष्ठ पत्रकार ह.भ.प.विजयकुमार गाडेकर यांच्या मातोश्री सिताबाई गाडेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने एकता फाउंडेशन आणि पत्रकार संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग परळकर, सूत्रसंचालन राजेश बीडकर तर आभारप्रदर्शन नितीन कैतके यांनी केले. चहापान आणि अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
close