पूर्णा/वार्ताहर
हर घर नल से जल उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे ५५ लिटर पिण्याचे पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने सुरु असलेला जल जीवन मिशन कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.
परभणी जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टेक्नोस्पर्ट ग्रामीण विकास संस्था,परभणी या केंद्र शासन पुरस्कृत संस्थेमार्फत जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमधील कर्मचार्यांसाठी दि. १७ ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये परभणी येथील हरिप्रसाद, मंगल कार्यालयात चार दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.१७) सीईओ टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली मानवत तालुक्यातील बारा ग्रामपंचायती मधील सरपंच, ग्रामसेवक आणि पाणी पुरवठा कर्मचार्यांसाठी चार दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस डी पवार, उप अभियंता गंगाधर यंबडवार, मानवतचे गट विकास अधिकारी स्वप्नील पवार, प्रशिक्षक राज्य पाणी स्वच्छता कार्यालय मुंबईचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ, टेक्नोस्पर्ट ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष एस.के.ठाकूर, सचिव एन.डी.पाटील, प्रशिक्षक अनिल मुळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना सीईओ टाकसाळे म्हणाले की, येणार्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचात व पाणी पुरवठा कर्मचार्यांना देखभाल व दुरुस्तीची कामे करायची आहेत. त्याअनुषंगाने सगळ्यांनी चांगले प्रशिक्षण घेऊन उत्कृष्ट प्रशिक्षक बनावे, गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करतांना उच्च प्रतीच्या नळ, पाईप इ सारख्या विविधांगी साहित्याची खरेदी करावी, या योजनेत स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घ्यावा, शाळा आणि महाविद्यालयीन युवकांपर्यंत जल जीवन मिशन कार्यक्रम पोहोचणे व प्रशासना बरोबर पाण्याची अडचण गावकर्यांनी देखील सोडविणे गरजेचे असल्याचे टाकसाळे यांनी सांगितले.

