shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विराट कोहलीच्या कारकिर्दीतील काही वादग्रस्त घटना..!


           फक्त द्विपक्षीय मालिका भले वनडे, टि-२० असो वा कसोटी यांच्यात इतरांपेक्षा जास्त संधी मिळाल्यामुळे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनलेल्या विराट कोहलीने पंधरा जानेवारी रोजी आपल्याकडे असलेल्या क्रिकेटच्या एकमेव कसोटी प्रारूपातील नेतृत्व सोडून देण्याचा निर्णय जाहीर केला. भारत दक्षिण आफ्रिकेकडून २-१ असे पराभूत झाले असले तरी कसोटीचे कर्णधारपद काढून घेण्याचा बीसीसीआयचा कोणताही घाट नव्हता. मात्र कोहलीने स्वतःहून हा निर्णय घेतल्याने भारताकडे दुसऱ्या फळीतील कोणताही सक्षम पर्याय लगेच तयार नसल्याने कर्णधारपदासाठी काहीसी पोकळी निर्माण झाली हे मात्र नक्की !

           कोहली कर्णधारपदाच्या जोखंडातून निवृत्त झाला असला तरी त्याच्या कारकिर्दीत जशा काही चांगल्या गोष्टी घडल्या असल्या तशा अनेक वादग्रस्त प्रसंगही घडले आहेत. तसे बघाल तर क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून संबोधले जाते. मात्र विराट कोहली याला अपवाद ठरला आहे. मुळचा आक्रमक व काहीसा चिडखोर असलेला कोहली प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला पुढे असतो. काही अन्यायकारक प्रसंगी तो लवकर रागात यायचा, पंचाशी हुज्जत घालणे, विरोधी खेळाडूंशी थेट जुगलबंदी करायचा या मुळे अनेक वादग्रस्त प्रसंगात तो फसल्याचे बरेचसे उदाहरणेही आहेत.
              विराट कोहलीच्या कारकिर्दीत अनेक चांगले प्रकरणं घडले आहेत, मात्र काही वादग्रस्त प्रकरणांनी त्याच्या कारकिरर्दीला गालबोटही लावले आहे. अशाच काही वादग्रस्त घटनांवर प्रस्तुत लेखात प्रकाशझोत टाकणार आहोत.
              दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या ज्या केपटाऊन कसोटीनंतर कोहलीने कसोटीचे कर्णधारपद सोडले. त्याच सामन्यात आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात कर्णधार डिन एल्गर पायचित असल्याचा निर्णय पंच इरास्मस यांनी दिला. त्यानंतर एल्गरने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली, त्यावर तिसरे पंच अल्लाउद्दीन पालेकर यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे एल्गरला नाबाद ठरविले. त्यानंतर कोहलीसह सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण सकृत दर्शनी फलंदाज स्पष्टपणे बाद असल्याचे दिसत होते. मात्र या नंतर कर्णधार कोहली व त्याचे सहकारी आश्वीन व राहुल यांनी कहरच केला. त्या तिघांनीही स्टंप माईक जवळ जाऊन आपली नाराजी उघड केली. यामध्ये आघाडीवर स्वतः कोहलीच होता.  हे सर्व नियम विरोधी होते. वास्तविक कोहलीने सामनाधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार नोंदविणे गरजेचे होते. परंतु त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवले नाहीच व संघ सहकाऱ्यांनाही परावृत्त केले नाही. ही आयसीसीच्या नियमांची सरळ सरळ पायमल्ली असल्याने आयसीसी त्यांच्यावर कारवाई करू शकते.
              सन २०१६ मध्ये भारताचा सर्वकालीन यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेची भारताच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली. प्रशिक्षक म्हणून कुंबळेचे कामही शांत होते. परंतु शांत व संयमी स्वभावाचे कुंबळे शिस्तीचे करडे भोक्ते होते. नेमके आक्रमक स्वभावाचा कोहली व कुंबळेचे अंतिम संघ निवडणे, संघासोबत पत्नी वा मैत्रीण दौऱ्यांवर सोबत नेणे, तसेच संघाच्या रणनिती संदर्भात अनेकदा  खटके उडायचे. या वादांचे रूपांतर सन २०१७ मध्ये  कुंबळेच्या गच्छंतीमध्ये झाले.
               सन २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने इतिहास घडवत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत धूळ चारणारा पहिला आशियाई संघ बनला. त्या संघाचा कर्णधार कोहली होता. या मालिकेत क्रिकेटसह अनेकही लक्षवेधक घटना घडल्या. त्यामुळे कोहली चर्चेचा विषय बनला. कोहली व तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन यांच्यात मौखिक जुगलबंदी झाली. पेनच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी आनंदाच्या भरात  जल्लोष करताना आनंदात कोहलीने ऑस्ट्रेेलियन खेळाडूंना डिवचले. त्यानंतर कांगारुंनी स्लेजींग करण्यास सुरुवात केली. त्या दौऱ्यात कोहलीसह रिषभ पंतनेही टिम पेनला शाब्दीक वेदना पोहोचविल्या होत्या.    
             जेम्स अँडरसन व विराट कोहली यांची दुश्मनी तर जगजाहीर आहे. सन २०२१ च्या लॉर्डस कसोटीत भारतीय गोलंदाजांनी अँडरसनवर उसळते चेंडू फेकून त्याला हैराण केले होते. त्यामागे सुपर ब्रेन कोहलीचाच होता. भारताच्या पहिल्या डावात कोहली फलंदाजी करत असताना अँडरसन त्याला चेंडू टाकून मागे जात असताना कोहलीशी त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर कोहलीनेही तोडीस तोड उत्तर दिले व आपल्या गोलंदाजांकडून अँडरसनचा छळ करविला.
              यासह अनेक छोटेमोठे विवाद कोहलीच्या कारकिर्दीत घडले असून सध्या बीसीसीआय बरोबर त्याचे असलेले संबंधही त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे जास्तच चिकदळले आहेत. कोहली आता नेतृत्वातून मुक्त झाला खरा परंतु हातून सत्ता गेल्यानंतर येणाऱ्या काळात केवळ एक खेळाडू म्हणून तो कसा वागतो यावरही त्याचे संघातील स्थान अवलंबून असणार आहे. तेथे जर त्याच्याकडून थोडीही चुक झाली तर ती त्याच्या संघातून बाहेर जाण्याचे कारणही बनू शकते.

   लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close