*लोकमंगल शेती उपयोगी सोसायटीच्या चेअरमन पदी विजय शिंदे यांची निवड*
व्हाईस चेअरमन पदी अनिल पवार
इंदापूर प्रतिनिधी :२० जानेवारीभाटनिमगाव येथील लोकमंगल शेती उपयोगी साधन पुरवठा सहकारी संस्थेची चेअरमन पदाची निवडणूक गुरुवार दि.२० जानेवारी रोजी पार पडली. चेअरमन पदाकरिता विजय भागवत शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.ए.बी.झांजरे यांनी अर्ज छाननी अंती विजय शिंदे यांची नूतन चेअरमन म्हणून घोषणा केली.तर व्हाईस चेअरमन पदासाठी अनिल सर्जेराव पवार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने मुदतीनंतर त्यांची व्हाईस चेअरमन या पदावर निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.
लोकमंगल शेती उपयोगी साधने पुरवठा सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
निवडीनंतर सर्वाना सोबत घेऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे मत नवीन पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

