shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल मधील महागड्या खेळाडूंची भिकार कामगिरी !


               इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएल. जगातील सर्वात मोठी, सर्वात लोकप्रिय व सर्वात जास्त संघ असणारी सर्वात जुनी लिग स्पर्धा. बघता बघता या स्पर्धेचे चौदा पर्व संपले व पंधराव्या पर्वाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत खेळण्याचे जगभरातील सर्वच खेळाडूंचे स्वप्न असते. याचे कारण म्हणजे या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळायला मिळते. अनुभव मिळतो शिवाय यातून मोठा आर्थिक लाभही होतो. खेळाडू नवीन असतात तोपर्यंत मामुली असलेल्या बेस प्राईजला विकले जातात. 


मात्र जसजसा त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा वाढतो तसतशी आयपीएल मधील त्यांची किंमतही वाढायला लागते. आयपीएल लिलावात मोठी किंमत मिळालेले खेळाडू त्यांच्या लौकिकाप्रमाणेच खेळतात असेही काही नाही. त्यामुळे त्यांच्यावर पैशांची मोठी उधळण करणाऱ्या संघाची मोठी पंचाईत होऊन जाते व त्यांना त्यांच्या इप्सित ध्येया पर्यंत जाता येत नाही. लिलावात असे काही खेळाडू असतात की त्यांच्या अपेक्षे पेक्षाही अधिक रक्कम मिळते व त्यांचे जीवनच बदलून जाते. काहींना कोट्यावधी रूपये मिळतात परंतु त्यांचे प्रदर्शन अतिशय निराश जनक असते.


              आयपीएलच्या पंधराव्या सत्रात यावेळी दोन नवे संघ लखनौ व अहमदाबाद यांचा समावेश करण्यात आला असून येत्या बारा व तेरा फेब्रुवारी रोजी बंगलोर येथे महालिलाव होणार असून यामध्ये कोणता खेळाडू या वर्षीचा महागडा खेळाडू ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  त्यामुळे सदर लेखात आपण मागील काही सत्रात मोठी बोलून लावून खरेदी केलेल्या मोठे नाव असलेल्या महागडया खेळाडूंनी केलेल्या भिकार खेळाचा आढावा घेऊया.

            सन २०१५ च्या सत्रात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तत्कालीन लिलावात सर्वाधिक सोळा कोटींची बोली लावून खरेदी केले. मात्र युवराजने एवढया मोठ्या रकमेची जराही कदर न करता १४ चौदा सामन्यात १९.०७ च्या सरासरीने केवळ २४८ धावा जमविल्या तर गोलंदाजीतही केवळ एकच गडी बाद करण्यात त्याला यश आले होते.

               न्युझिलंडमध्ये जन्मलेला व सध्या इंग्लंड कडून खेळणारा जगातला अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला सन २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सने साडेबारा कोटी रूपये देऊन खरेदी केले. मात्र त्याने १३ सामन्यात बॅटने फक्त १९६ धावाच काढल्या तर गोलंदाजीतही केवळ आठ गडीच तो बाद करू शकला. सन २०१९ मध्ये १२३ धावा सहा बळी, तर सन २०२० मध्ये २८५ धावा व दोन बळी, तसेच सन२०२१ मध्ये तो एकच सामना खेळू शकला. इतक्या खराब कामगिरीनंतर यंदा त्याला राजस्थानने रिटेन करण्याची सुध्दा तसदी घेतली नाही.


               आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी रक्कम सोळा कोटी पंचविस लाख रुपये देऊन राजस्थान रॉयल्सने मागच्या सत्रासाठी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीसला घेतले. परंतु मॉरीसने ११ सामन्यात केवळ ६७ धावा व पंधरा बळी घेत संघाला साफ निराश केले. आता तर हाच मॉरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तही झाला आहे.

              सन २०१९ मध्ये जयदेव उनाडकटला राजस्थाननेच ८.४ कोटी रूपये देऊन खरेदी केले. त्या सत्रात त्याने साफ निराश केले. सन २०१९ च्या सत्रात त्याने ११ सामन्यात दहाच बळी घेऊ शकला. त्यानंतर त्याला रिटेन न करता राजस्थानने सन २०२० च्या सत्रात तीन कोटींना विकत घेतले. त्यानंतरही त्याच्या कामगिरीत सुधारणा झालीच नाही. सात सामन्यात केवळ चार बळी तो घेऊ शकला. तर सन २०२१ च्या सत्रात सहा सामन्यात केवळ चार बळी त्याने घेतल्याने यंदा राजस्थान त्याला आपल्या दारातही उभे करण्याची शक्यता नाही.

              ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला सन २०२० च्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सने १५ साडेपंधरा कोटीला खरेदी केले. त्या सत्रात १४ सामन्यात केवळ बारा फलंदाज बाद करण्यात त्याला यश मिळाले तर सन २०२१ च्या सात सामन्यात नऊ बळी ही कामगिरी त्याच्या किंमतीचे मोल करणारी नसल्याने यावेळी केकेआरने त्याला नारळ दिला आहे.

               याशिवाय ग्लेन मॅक्सवेलने सन २०२० च्या सत्रात पावणे अकरा कोटी रूपये घेऊन पंजाबच्या खात्यात केवळ १२३ धावा ओतल्या. विशेष म्हणजे या आक्रमक फलंदाजाने संपूर्ण स्पर्धेत एकही षटकार ठोकला नव्हता. त्यानंतर पंजाबने त्याला हाकलून दिले.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close