shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फिरकीच्या जाळ्यात फसत चाललाय विराट कोहली !



              एकेकाळी भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात जगातील कोणत्याही फलंदाजांपेक्षा सक्षम गणले जायचे. परंतु मागील काही दिवसात भारतीय फलंदाजांच्या बाद होण्याच्या प्रमाणावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, भारताचे फलंदाज फिरकी गोलंदाजीवरच जास्त अडखळताना दिसतात. त्यातच भारतीय खेळपट्टयांवर त्यांचे फिरकी गोलंदाजीवर बाद होणे जास्तच केविलवाने वाटते. कारण भारत हि फिरकी गोलंदाजांची खान समजली जाते. भारताने जागतिक क्रिकेटला अनेक महान फिरकी गोलंदाज दिले आहे. आताचे काही फलंदाज सोडल्यास भारताचे 
 फलंदाज फिरकी खेळण्यात वाकबगार होते. मात्र आता ती परिस्थिती राहीली नसून भारताचे भलेभले फलंदाज केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही फिरकी खेळण्यात चुका करत आहेत व त्याचा फटका भारतीय संघाला पराभवाच्या रूपात बसत आहे आणि त्यामध्ये आघाडीवर आहे भारताचा सर्वोत्तम व अनेकांचा आदर्श असलेला जगश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली !
              आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम स्थापित केलेल्या विराट कोहलीने मागील दोन वर्षापासून क्रिकेटच्या कोणत्याही प्रारूपात शतक ठोकले नाही. याचे प्रमुख म्हणजे त्याच्या फलंदाजी करण्याच्या तंत्रात होत असलेल्या चुका, मागील चौदा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याने प्रतिपक्षांना माहिती होत गेलेल्या त्याच्या कमकुवत बाजू. शिवाय वर्कलोड, बायो बबल व त्याच्या भोवती फिरणाऱ्या अनेक वादग्रस्त घटना होय. विराट कोहलीचे खास करून एकदिवसीय सामन्यात फिरकी गोलंदाजीवर बाद होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विराटचे कधी डावाच्या सुरुवातीलाच तर कधी जम बसल्यावर बाद होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि तेही फिरकी गोलंदाजीवर. हि बाब टिम इंडियासाठी घातक ठरत आहे.
             सन २०२२ या वर्षाची सुरुवात भारतीय क्रिकेटसाठी अतिशय निराशजनक झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण दौऱ्यात भारताला कसोटी मालिका १-२ अशी गमवावी लागली. तर वनडे मालिकेत भारताचा ०-३ असा सुपडा साफ झाला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा वनडे मालिकेत अशा प्रकारे धुव्वा उडविण्याचा हा पहिलाच तसंग ठरला. या पराभवाचे अनेक कारणं असले तरी विराट कोहलीचा असातत्यपूर्ण खेळ व बीसीसीआयशी घेतलेला पंगा या प्रमुख बाबी प्रकर्षाने दृष्टीस येतात.
                कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने कसोटीचे नेतृत्व सोडले. त्यावेळी असे समजले जात होते की, कर्णधारपदाचं ओझं त्याच्या फलंदाजीवर पडत असल्याने त्याने नेतृत्व त्याग केला. त्यानंतर तो आपल्या फलंदाजीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करेल व संघासाठी मोठेे मोठे डाव खेळून विजयात अग्रभागी राहील. वनडे मालिकेत विराट त्याच्या जुन्या लौकिकाप्रमाणे खेळला तर नाहीच पण त्याच्या कमजोर बाबीच जास्त प्रकट झाल्या. आपल्या सुरुवातीच्या काळात जगभरातील दिग्गज फिरकी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कोहलीला आजमितीला मामुली फिरकी गोलंदाज सहजासहजी बाद करत आहेत. वनडेतील मागच्या पाच डावात तर हे प्रकर्षाने घडताना दिसत आहे.
               एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या पाच डावात कोहली ऑफस्पिन, लेगस्पिन, चायनामन व डावखुऱ्या ऑफस्पिनरच्या गोलंदाजीवरच बाद झाला आहे. याचा अर्थ असा की कोहली विशेष अशा फिरकी गोलंदाजीवर बाद होत नसून तो स्वतःच्या चुकीमुळे बाद होत आहे. या या दरम्यान तीन वेळा तर तो पूर्ण स्थिरस्थावर झाल्यावर बाद झाल आहे.
                  दक्षिण आफ्रिके विरूध्द तिसऱ्या वनडे सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजच्या गोलंदाजीवर ६५ धावांवर तो बाद झाला. याच मालिकेतील दुसऱ्या वनडेत केशव महाराजनेच त्याला शुन्यावरच बाद केले. तर पहिल्या वनडेत ५१ धावा केल्यानंतर चायनामन तबरेज शम्सीच्या जाळ्यात सापडला व सोपा झेल देऊन बाद झाला.  मागच्या इंग्लंडच्या भारत दौऱ्यात पुण्यात सात धावांवर मोईन अलीने त्याचा त्रिफळा उडविला होता. तर त्यानंतरच्या सामन्यात ६६ धावांवर यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास आदिल रशिदने त्याला भाग पाडले.
                फिरकी गोलंदाजांविरूद्ध एकंदरीत कोहलीची कामगिरी चांगलीच आहे. त्याने १८१ डावात फिरकी गोलंदाजांचा सामना करत ७१.९३ च्या सरासरीने ४४६० धावा जमविल्या असून फक्त ६२ वेळा तो फिरकीवर बाद झाला आहे. याचा अर्थ असा की पूर्वी तो फिरकीविरूध्द चांगला खेळायचा. मात्र आता त्याच्या काही चुकांमुळे फिरकी गोलंदाजी खेळताना त्याला अडचणी येत आहेत. खेळपट्टया मायदेशातील असोत वा परदेशातील विराट फिरकी खेळताना चुकतोय. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडतोय. मागच्या पाच डावात तो जम बसल्यानंतर बाद झाला, तेंव्हा त्याला केवळ डाव पुढे रेटत षटका मागे ४ ते ५ धावा जमवायच्या होत्या. मात्र तो चुकीच्या पध्दतीने बाद झाल्याने. हमखास मिळणाऱ्या विजयाचे पराभवात रूपांतर झाले. या गोष्टींवर विराटला लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे. त्यामुळे केवळ त्याचाच नव्हे तर संघाचाही लाभ होणार आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close