दिनांक २४ जानेवारी २०२२पासून शाळा नियमित प्रमाणे सुरू होणार आहेत.
विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये या कारणामुळे शाळा बंद होत्या. आता लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ लसीकरण केले तर विद्यार्थी रोगापासून मुक्त राहतील असा समज करणेही तितकेसे रास्त वाटत नाही. साथीच्या रोगांमध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे त्यांना आजार होत नाही हे साधे सोपे प्राथमिक तत्त्वज्ञान आहे.
याचा अंगीकार करून शाळेतील मुलांना रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे दैनंदिन धडे प्रथमत: द्यावेत. जेणेकरून शाळा नियमितपणे सुरू राहू शकते. शाळा चालू केल्या की विद्यार्थ्यांच्या आहार विहारात अनियमितपणा वाढणार आहे, मुलांच्या खाण्यात रस्त्यावरील निकृष्ट हानीकारक अन्नपदार्थ आले की मुले आजारी पडणारच आहेत. सद्याची परिस्थिती पाहता पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या फुटपाथ अडवून राजरोसपणे अतिक्रमण करताना दिसत आहेत.
शालेय शिक्षणात आरोग्याचे परिपाठ, आरोग्य संस्कार, निसर्गोपचार या बाबी दररोज शिकविल्या तर मुलांमध्ये आरोग्य साक्षरता जागृत होईल व मुले स्वतःहून जंगफुड, निकृष्ट दर्जाचे उघड्यावर विकले जाणाऱे हानिकारक पदार्थ यांपासून दूर राहतील. स्वतःच्या घरात देखील आरोग्यदायी आहार घेण्यासाठी आग्रही राहतील. शाळेतील संस्कार हा मुलांना जास्त भावतो. असे केल्याने मुले सुदृढ होतील. रोगराईचा प्रसार थांबेल, आणि शाळा नियमित सुरू राहतील.
यासाठी असे सुचवावेसे वाटते की शाळेमध्ये किमान एक तास विद्यार्थ्यांना सूर्यप्रकाशात उभे करावे. सूर्यप्रकाश हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. मुलांना आपल्या सभोवतालच्या सहज उपलब्ध असलेल्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगावेत. जेणेकरून साधे सर्दी-पडसे, अपचन झाले की वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी जी धावपळ घराघरातून सद्या दिसते ती थांबेल. शहरांमध्ये मुलांना सूर्यकिरणे, उघडे आकाश यांचे दर्शनच होत नाही अशी वस्तुस्थिती आहे. अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती निसर्गतः कमी होत जाते. शाळेकडे मोकळी मैदाने असतात. तेथे सूर्यकिरणे भरपूर येत असतात.
शाळा सुरू होणे हे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक निकोप वाढीसाठी अत्यंत गरजेचे असेच आहे तथापि शाळेत आले की दिवस-रात्र अभ्यासाला जूंपुन घेणे हे धोरण सद्यस्थितीत योग्य नसून प्रथमतः सद्यस्थितीतील धोरण हे मुलांना निरोगी राहण्याचे तंत्रज्ञान शिकवण्याचे आरोग्य साक्षरतेचे असावे असे सुचवावेसे वाटते.
कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या पर्यावरण जनजागरण व आरोग्य साक्षरता प्रसार अभियानांतर्गत उपक्रमात सहभागी होऊन प्रसार करा.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने देशभक्तकोशकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

